

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १९ : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला तापमानाचा यलो व ऑरेंज अलर्ट आज तंतोतंत खरा ठरला. नागपूरच्या कमाल तापमानाने ४५.५ अंशांपर्यंत उसळी घेतली. तर विदर्भासह राज्यात सर्वाधिक ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावतीत झाली. अकोला व वर्धा येथेही उन्हाचे चटके बसले.
नवतपा जसजसा जवळ येत आहे, तसतसा सूर्याचा प्रकोप वाढत आहे. मंगळवारीही विदर्भात उष्णलाटेचा प्रभाव जाणवला. लागोपाठ दुसऱ्या दिवशी अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये ४६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत अमरावतीचा पारा अर्धा अंशाने वाढून उच्चांकी ४६.८ वर गेला. येथील तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक राहिले. वर्धा येथे ४६.५, तर अकोला येथे ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूरच्याही कमाल तापमानात १.१ अंशांची वाढ होऊन पारा यंदाच्या उन्हाळ्यात चौथ्यांदा ४५ अंशांच्या पार गेला. बुलडाणा वगळता विदर्भातील सर्वच शहरांचा पारा ४३ पार गेला. विशेषतः पूर्व विदर्भात उन्हाचा सर्वाधिक कहर सुरू आहे.
हवामान विभागाचा आणखी तीन-चार दिवस यलो व ऑरेंज अलर्ट असल्यामुळे उन्हाचा तडाखा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः अमरावती, वर्धा आणि अकोल्यात असेच चित्र राहणार आहे.
अंगाची लाहीलाही, जीव कासावीस
अंगाची लाहीलाही करणाऱ्या भीषण उष्णलाटेमुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील जनजीवन प्रभावित झाले आहे. उन्हाचे चटके व असह्य उकाड्याने जीव कासावीस होत आहे. सकाळी आठ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसणे सुरू होते. सूर्य डोक्यावर येतो तशी उन्हाची तीव्रता वाढत जाते. सूर्यास्तानंतरही उन्हाच्या गरम झळा जाणवत आहे.
..
विदर्भाचा पारा
शहर तापमान
अमरावती ४६.८
वर्धा ४६.५
अकोला ४६.०
यवतमाळ ४५.४
नागपूर ४५.५
चंद्रपूर ४५.२
गडचिरोली ४४.०
गोंदिया ४३.८
वाशीम ४३.५
भंडारा ४३.०
बुलडाणा ४१.६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.