सर्च रिसर्च  : मायक्रोवेव्ह वापरताना तारतम्य हवेच 

microwave
microwave

अन्नपदार्थ तयार करण्याच्या अनेक पद्धतींचे फायदे व तोट्यांबद्दल या सदरात आपण चर्चा केली आहे. त्यात मायक्रोवेव्हमधील स्वयंपाकाचाही उल्लेख झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, "मायक्रोवेव्हमधील रेडिएशन्सची काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, त्यामुळे पदार्थातील पोषणमूल्ये कमी होतात काय व प्लॅस्टिकच्या भांड्यात पदार्थ शिजवल्याने हार्मोन्सच्या समस्या निर्माण होतात काय, हे पुरेसे स्पष्ट नाही.' 

अमेरिकेच्या कृषी विभागातील संशोधक झिनाली व्यू यांच्या मते, "मायक्रोवेव्हच्या वापराने भाज्यांतील पोषणमूल्ये कमी होतात. उदा. ब्रोकोलीमधील फ्लाव्होनॉइड्‌स हा जळजळ कमी करणारा घटक 97 टक्के कमी होतो. त्याचबरोबर मायक्रोवेव्हमध्ये भाज्या शिजवण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी वापरल्यासही फ्लाव्होनॉइड्‌सचे प्रमाण कमी होते. मात्र, शिजवण्याच्या इतर पद्धतींपेक्षा मायक्रोवेव्हमध्ये भाज्यांतील इतर पोषणमूल्ये अधिक प्रमाणात कायम का राहतात, याचे उत्तर देणे अवघड आहे. याचे कारण प्रत्येक अन्नघटकाचे टेक्‍श्चर व त्यातील पोषणमूल्यांचे प्रमाण वेगळे असते, हेही असेल. मायक्रोवेव्ह वापरणे काही भाज्यांसाठी योग्य आहे, मात्र सर्वच भाज्यांसाठी नाही.' आणखी एका पाहणीत भाज्यांमधील आरोग्यास उपयुक्त फोनोलिसचे प्रमाण तपासल्यावर मायक्रोवेव्ह आणि उकडण्याच्या प्रक्रियेत भोपळा, मटार व कांद्याच्या पातीतील फोनोलिसचे प्रमाण घटले, तर पालक, ब्रोकोली व फरसबीमधील कायम राहिले. या भाज्यांची अँटिऑक्‍सिडंट प्रक्रिया तपासल्यावर, ती भाज्या उकडण्यापेक्षा मायक्रोवेव्ह केल्यावर अधिक टिकल्याचे दिसून आले. त्यामुळे पदार्थाला योग्य प्रमाणात उष्णता देणे काही भाज्यांमध्ये त्यांच्यातील पोषणमूल्ये टिकवण्यासाठी योग्य असल्याचे संशोधकांचे मत बनले. 

प्लॅस्टिकची भांडी नकोतच  
"मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजवताना प्लॅस्टिकच्या भांड्याचा उपयोग होतो व त्यामुळे थॅलेट्‌स हा प्लॅस्टिकचा लवचिकपणा वाढवणारा घटक वेगळा होऊन अन्नामध्ये मिसळतो. प्लॅस्टिकची काही भांडी मायक्रोवेव्हमध्ये वापरासाठी बनवलेली नसतात. मायक्रोवेव्हचे तापमान 100 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास त्यातील घातक रसायने पदार्थात उतरतात,' असा इशारा वॉशिंग्टन विद्यापीठातील फूड इंजिनिअरिंगचे प्राध्यापक ज्युनिंग टॅंग देतात. संशोधकांनी 2011मध्ये पदार्थ साठविण्यासाठीच्या 400 विविध भांड्यांचा अभ्यास केला असता, त्यातील बहुतांश भांड्यांतून हार्मोन्सचे संतुलन बिघडवणारी रसायने बाहेर पडत असल्याचे आढळले. थॅलेट्‌समुळे लहान मुलांना रक्तदाब व मधुमेहाचा धोका असतो. प्लॅस्टिकमध्ये बिस्फेनॉल (बीपीए) मोठ्या प्रमाणात वापरले जाते व त्यामुळेही हार्मोन्सचे संतुलन बिघडते. ऍरिझोना विद्यापीठातील संशोधक रॉल्फ हेल्डन यांच्या मते, "मायक्रोवेव्हच्या वापराने पदार्थातील दूषित घटक वाढतात. प्लॅस्टिकमध्ये अन्न शिजवण्याबरोबरच भांड्यावर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या झाकणामुळेही घातक रसायने पदार्थांत मिसळतात. त्यामुळे प्लॅस्टिकऐवजी मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित भांडीच वापरावीत. आकार बदलत असलेली किंवा जुनी भांडी मायक्रोवेव्हमध्ये वापरू नयेत, तसेच भांड्याच्या खाली "व्ही' किंवा "पीव्हीसी' लिहिलेले व "3' हा क्रमांक लिहिलेली भांडी पदार्थात थॅलेट्‌स सोडत असल्याने ती वापरू नयेत.' 

अतिउष्णतेमुळे धोका 
जॉर्जिया विद्यापीठातील प्रोफेसर फ्रान्सिस्को गोन्झालेस यांच्या मते, "प्लॅस्टिकप्रमाणेच मायक्रोवेव्हमध्ये उच्च तापमान आणि असमान भाजण्यानेही धोके निर्माण होतात. त्यामुळे मायक्रोवेव्हचा उपयोग पदार्थ शिजवण्याऐवजी शिजवलेला पदार्थ पुन्हा गरम करण्यासाठीच करावा. पदार्थ केवळ एकदाच व 82 अंश सेल्सिअस तापमानाला गरम करावा व पुनःपुन्हा तसे करू नये. कडधान्ये व बटाट्यासारखे स्टार्चचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये शिजवल्यास ऍक्रालामाइडसारखे कर्करोगाचा धोका निर्माण करणारे रसायन तयार होण्याचा धोकाही असतो. त्यासाठी बटाटे काही वेळ पाण्यात भिजवून मायक्रोवेव्हमध्ये ठेवणे हा पर्याय आहे.' एकंदरीतच, मायक्रोवेव्हमधील इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक लहरी घातक नाहीत, मात्र त्यात अप्रमाणित प्लॅस्टिकचा वापर आणि अतिरिक्त तापमान या गोष्टी घातक असल्याचे सिद्ध होते. तेव्हा मायक्रोवेव्हचा वापर तारतम्याने करणेच योग्य. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com