ढिंग टांग : ड्रेस कोड!

ढिंग टांग : ड्रेस कोड!

सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी-
ज्याअर्थी कोविड साथरोग कायद्याअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य झाले आहे व अनेक कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात संबंधित कचेऱ्यांमध्ये उपस्थिती दर्शविण्यात वेळोवेळी उदासीनता दाखवली आहे, तसेच ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया दिवसेंदिवस वेग घेऊ लागली असून कोविड साथरोगाचा फैलाव काहीसा नियंत्रणात येत असल्याचे निष्पन्न होत असून व सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थिती अनिवार्य करणेत आली असून व त्यासंदर्भात आचारसंहिता लागू करणे प्रस्तावित करणेत येत आहे. त्याअर्थी यापुढील काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेत विशिष्ट पोशाख संहितेचे पालन करणे अनिवार्य करणेत येत आहे. उपरिनिर्दिष्ट पोशाख संहिता (पक्षी : ड्रेस कोड) व त्याची काही ढोबळ कलमे खालीलप्रमाणे :

कोविड काळात लॉकडाऊनमध्ये काही कर्मचारी व त्यांचे नातलग घरात अथवा संबंधित वास्तूत अडकून पडले होते. त्या काळात सरकारी कर्मचारी अर्धी विजार व फाटका गंजिफ्राक अशा विशिष्ट व अशिष्ट पोशाखात राहण्यास सरावले, असे निदर्शनास आले आहे. उपरोक्त पोशाख सरकारी कार्यालयात येताना वापरु नये, असे सक्त आदेश जारी करणेत येत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्याने कार्यालयीन काळात स्वच्छ धुतलेली पाटलोण व इस्तरीचा सदरा परिधान करावा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गणवेष निश्‍चितीसाठी एक उपसमिती गठित करणेत आली असून उपसमितीच्या शिफारसींनुसार गणवेष ठरवला जाईल व तो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असेल, याची संबंधितांनी नोंद घेणेची आहे.

काही सरकारी कर्मचारी हेतुपुरस्सर पांढराशुभ्र सदरा व पांढरीशुभ्र पाटलोण, खिशाला फाऊंटन पेन व बगलेत नस्ती (पक्षी : फाइल) अशा वेषात कार्यालयात येतात असे निदर्शनास आले आहे. उपरोक्त पोशाख राजकारणी व्यक्ती प्राय: करीत असले कारणाने तसाच पोशाख करुन सरकारी कर्मचाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करु नये, असे आदेश जारी करणेत आले आहेत.

काही सरकारी कार्यालयांमध्ये सरकारी कर्मचारी पब्लिकप्रमाणेच पोशाख करत असल्यामुळे अनेकदा गैरसोय होते. संबंधित कर्मचाऱ्याचे टेबल रिकामेच राहाते, व कर्मचारी जवळच टंगळमंगळ करीत असतो व ते जनतेच्या लक्षात येत नाही. जनतेने एका सरकारी कर्मचाऱ्याऐवजी दुसऱ्याच एका निरपराध व्यक्तीच्या तोंडास काळे फासल्याची घटना घडल्याचे नोंद झाले आहे. अशा घटना टाळल्या पाहिजेत.

सरकारी कार्यालयात टेबलावर डोके ठेवून झोप काढणे ऐच्छिक असले तरी पोशाख संहितेचे पालन कडकपणाने करणेत येईल, याची संबंधितांनी नोंद घेणेची आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

निळी जीन प्यांट आणि टीशर्ट अशा फाइनाबाज वेषात सरकारी कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्याने वावरु नये. तसे करताना आढळल्यास दोषी कर्मचाऱ्याच्या गोपनीय अहवालात ही बाब नमूद करावी, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणेत आले आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सरकारी कार्यालयात व कार्यालयीन वेळेत पोशाख संहितेचे पालन करणेचे आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 पोशाख संहिता लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कोठल्याही प्रकारचा धुलाईभत्ता व कापडभत्ता मिळणार नाही. हा खर्च सरकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या वेतनातूनच करावयाचा आहे, याची नोंद घेणेत यावी. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात कोठलेही आंदोलन वा संप व निदर्शन वा विरोध प्रकट करावयाचा झाल्यास त्याकाळात काळा रंग वापरण्यास सक्त मनाई आहे.

जनतेची कामे, कार्यक्षमता आणि उपस्थिती सातत्य यापेक्षा पोशाख संहितेच्या अंमलबजावणीस प्राधान्य देण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com