ढिंग टांग : कमलॅक्‍सिन आणि इतर लसी!

ढिंग टांग : कमलॅक्‍सिन आणि इतर लसी!

‘हम कमलवालों का टीका नहीं लगवाएंगे, नही लगवाएंगे, नहीं लगवाएंगे!,’ सायकलच्या पुढ्यात उकिडवे बसून पडलेली चेन लावता लावता बबुआ ऊर्फ आमचे समाजवादी मित्र अखिलेशजी यांनी जाहीर केले, तेव्हा आम्ही बुचकळ्यात पडलो, चक्रावलो, गोंधळलो! म्हटले हे काय नवीन? एकीकडे आमच्या वैज्ञानिकांचे कौतुक वाटले. इतक्‍या कमी वेळात त्यांनी विषाणूचा नायनाट करणारी लस शोधून काढली, शिवाय प्रत्येक पक्षासाठी वेगवेगळ्या गुणधर्माच्या लसीही शोधून काढल्या, म्हंजे कमालच झाली!!

बबुआ यांनी दिलेली टिप आम्ही लक्षात ठेवली आणि अन्य राजकीय लसींचा शोध घेऊ लागलो. या शोधमोहिमेत वेगळीच माहिती हाती लागली. त्याखातर श्री बबुआ यांचे मन:पूर्वक आभार मानले पाहिजेत! कां की, अन्यथा, अशा काही राजकीय लशी अस्तित्वात आहेत, हे आम्हाला कळलेच नसते. त्यांच्या सायकलची पडलेली चेन पुन्हा चढो, हीच सदिच्छा!!

खऱ्याखुऱ्या विषाणूविरुध्दच्या लढाईत वैज्ञानिकांनी बाजी मारली असली, तरी विविध राजकीय पक्षांच्या लसीही निघाल्या आहेत, हे कळल्याने आम्हाला हर्षवायू झाला. या विविध राजकीय लशींचे गुणधर्म आणि साइड इफेक्‍ट वेगळाले असतात, हेही आम्हाला कळले आहे. त्यासंदर्भात आम्ही तांतडीने काही माहिती जमा केली. आमच्या माहितीनुसार, श्री.बबुआ यांनी उल्लेख केलेले कमलॅक्‍सिन ऊर्फ कमलवालोंका टीका सहा वर्षापूर्वीच शोधण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या प.बंगालात ही लस टोचण्यासाठी मोठा कार्यक्रम राबवण्यात येत आहे, असे कळते. या लसींबद्दल थोडक्‍यात :

कमलॅक्‍सिन : ही लस टोचून घेतली असता साधारण बुटासकट चोवीस किलो वजन असलेला किरकोळ इसमदेखील छप्पन्न इंची छाती असल्यागत वागू लागतो. एरवी मुखदुर्बळ म्हणून पडेल चेहऱ्याने ऐकून घेणारा इसम भेटेल त्याला मन की बात सांगू लागतो. राष्ट्रभक्तीची मात्रा तर इतकी वाढते की त्यास समोर येईल तो शत्रूच वाटू लागतो. या लसीचा परिणाम बराच काळ टिकतो, असाही अनुभव आहे. असो!

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

काँग्रॅक्‍सिन : या लसीचा प्रभाव मर्यादित आहे, असे दिसते. ही लस टोचून घेतलेल्या इसमावर एक प्रकारचा मानसिक परिणाम होतो व निवडणुकीतील ‘जय-पराजय’ ही अत्यंत फिजूल गोष्ट असून सच्चाई, भाईचारा, किसान, मजदूर या गोष्टींनाच खरे महत्त्व आहे, असे वाटू लागते. किंबहुना कमलॅक्‍सिनमुळे जे काही परिणाम घडतात, ते सर्वच्या सर्व भयंकर आहेत, अशी काहीतरी धारणा होते. या लसीचा प्रसार व्हायला हवा, तितका होताना दिसत नाही. असोच!

धनुष्यशील्ड : ही एक अत्यंत प्रभावी लस आहे. एकदा टोचली की विषय संपला!! परंतु, त्यात एक मेख आहे. ही लस फक्त मराठी लोकांनाच टोचल्यास परिणाम होतो. मात्र एकदा धनुष्यशील्ड टोचून घेतली की आपण राष्ट्रीय पातळीवरही काहीच्या काहीच पराक्रमी आणि कर्तृत्ववान आहो व देशात सध्या जे काही चाललेले आहे, ते आपल्याशिवाय होऊच शकले नसते, असे वाटू लागते. असो असो!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वॉचव्हॅक्‍स : ही एक वेगळी लस आहे. नावही आगळेवेगळे आहे. नावातील वॉच म्हणजे घड्याळ! आणि व्हॅक्‍स म्हणजे व्हॅक्‍सिन!! आश्‍चर्य म्हणजे ही लस बहात्तर रोगांवर अक्‍सीर इलाज म्हणून कामी येते, असा आजवरचा अनुभव आहे. कुठलाही रोग बरा करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या लसीचे साइड इफेक्‍ट मात्र इतके टेरिफिक आहेत की मूळ रोग पर्वडला असे वाटावे!! पुन्हा असो!

(अन्य लशींबाबत अन्यवेळी!)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com