esakal | Vidhan Sabha 2019 : असे असेल पिंपरी-चिंचवडमधील 4 मतदारसंघांचे राजकीय गणित !
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 Pimpri Chinchwad bhosari and Maval constituencies analysis

- महायुतीविरोधात राष्ट्रवादीने एकवटली ताकद
-पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ मतदारसंघातील चित्र

Vidhan Sabha 2019 : असे असेल पिंपरी-चिंचवडमधील 4 मतदारसंघांचे राजकीय गणित !

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ या मतदारसंघात महायुती विरोधात महाआघाडी अशाच लढती रंगणार आहेत. मागील पाच वर्षापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य असणाऱ्या या मतदारसंघांमध्येच आता त्यांना विजयासाठी झगडावे लागत आहेत. त्यासाठी त्यांना उमेदवारी देताना चारही ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या आहेत. यात अपरिहार्यता असली तरीही जिंकण्यासाठी केलेल्या खेळ्या आहेत. त्यामध्ये कितपत यश मिळते हा औत्सुक्‍याचा विषय आहे.

असे असेल लातूर जिल्ह्यातील 06 मतदारसंघाचे राजकीय चित्र !

श्रीमंत अशा महापालिका हद्दीतील पिंपरी, चिंचवड व भोसरी हे तिन्ही मतदारसंघ शहरी आहेत. याठिकाणी अनुक्रमे शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार, भाजपचे लक्ष्मण जगताप व महेश लांडगे आमदार आहेत. शहरालगतच्या मावळ मतदारसंघात भाजपचे बाळा भेगडे आहेत. या निवडणुकीसाठी पुन्हा हेच आमदार उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात आघाडीतर्फे राष्ट्रवादीने दोघांना उमेदवारी दिली आहे, तर दोघा अपक्षांना पुरस्कृत केले आहे. कॉंग्रेसचा एकही उमेदवार रिंगणात नाही. वंचित बहुजन आघाडीचे मात्र चारही ठिकाणी उमेदवार आहेत. "मनसे' आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेसनेही सुरूवातीला नाराजी व्यक्त केली; पण त्यांनीही पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सध्या युती विरोधात बाकी सर्व पक्ष असे चित्र आहे.

अशी असतील बीड जिल्ह्यातील 06 मतदारसंघाची राजकीय गणितं !

पिंपरीत आजी विरोधात माजी आमदार
पिंपरी हा राखीव मतदारसंघ असून सर्वाधिक 18 उमेदवार रिंगणात आहेत. युती होणार नाही, असे गृहीत धरून भाजपकडून इच्छुकांची संख्या अधिक होती. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेकडेच राहिला. साहजिकच या ठिकाणी अद्याप नाराजी आहे. सेनेने विद्यमान आमदार चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असेल, याबाबत उत्सुकता होती. मात्र, आज एका नावाची, तर उद्या दुसऱ्याच नावाची घोषणा करावी लागली. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी हा घोळ घालण्यात आला. शेवटी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी उमेदवारी मिळविली. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड, बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड यांच्यासह भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी या पक्षांसह भाजपचा एक बंडखोर आणि अकरा अपक्ष उमेदवार आहेत. मात्र, प्रमुख लढत राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात होईल, असे वाटत असले तरी वंचितला किती मते मिळतात यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सभा झाल्या आहेत.

असे असेल साताऱ्यातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र !

चिंचवडमध्ये जगताप विरूद्ध पुन्हा कलाटे
चिंचवड मतदारसंघ सुशिक्षित व उच्चभ्रुंचा आहे. भाजपचे विद्यमान आमदार जगताप तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. यापूर्वी एकदा राष्ट्रवादीकडून व एकदा अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत. त्याच्या अगोदर विधान परिषद आमदारही होते. त्यामुळे मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. साहजिकच त्यांच्याविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीला प्रबळ उमेदवार हवा होता, मात्र तो न मिळाल्याने अखेरीस शिवसेनेतील बंडखोर राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले. कलाटे यांना राष्ट्रवादीची ताकद मिळाली आहेच, शिवाय भाजप, शिवसेनेनमधील नाराज कार्यकर्ते आणि जगताप विरोधकांची मदत मिळेल असा उमेदवारीमागील होरा आहे. त्यामुळे जगतापांविरोधात कोण? हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीपर्यंतचा प्रश्‍न निकालात निघाला आहे. तसेच तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मतदारसंघात भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना या मतदारसंघातून मोठे मताधिक्‍य मिळाले होते.

जाणून घ्या औरंगाबादमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं !

भोसरीत लांडगे-लांडे पारंपरिक लढत
भोसरी विधानसभा मतदारसंघातून वीस जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दोघांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे रिंगणात 18 जण होते. पैकी सहा जणांनी माघार घेतली. यात तुल्यबळ समजले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर दत्ता साने आणि माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे बारा जण रिंगणात राहिले आहेत. त्यात महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार विलास लांडे आहेत. ते अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यांना महाआघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केले आहे. यामुळे 2014 च्या लढतीच्या पुनरावृत्तीचा योगायोग घडून आला आहे. फरक फक्त पक्षांचा आहे. त्या वेळी लांडगे अपक्ष व लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आता लांडगे भाजपचे व लांडे अपक्ष आहेत. शिवाय त्यांच्यात कौटुंबिक नातेसंबंध आहेत. लांडगे हे लांडे यांचे भाचे जावई आहेत.

पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं!

मावळात चुरस
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही मावळ विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत असून दोन्ही बाजुंनी ती प्रतिष्ठेची करून प्रचार मोहीम सुरू असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघात सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, महायुतीचे उमेदवार कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे व आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्यातच प्रामुख्याने लढत दिसून येत आहे. दोन्ही बाजूंनी सुरवातीपासून जोरदार प्रचार यंत्रणा राबवून तालुका ढवळून काढला आहे. विभागवार गावभेटीचे नियोजन करून मतदारांशी संपर्क साधला जात आहे. रंगीत-संगीत प्रचाराच्या गाड्याही दिवस उजाडल्यापासून मतदारसंघात फिरत आहेत. मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभांनीही तालुका ढवळून निघाला आहे. भेगडे यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तर शेळके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभा झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसातही काही सभा होण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top