

Dialogue Over Conflict
esakal
लेखक - गौरव बाळे
जागतिक राजकीय अनिश्चितता आणि वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शांघाय सहकार्य संघटनेची २६ वी शिखर परिषद किर्गिज प्रजासत्ताकची राजधानी बिश्केक येथे पार पडली. संघटनेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या औचित्याने झालेल्या या परिषदेत आशिया आणि युरोपमधील प्रमुख देशांचे नेते सहभागी झाले. भारताच्या पंतप्रधानांनी या परिषदेत सहभाग नोंदवून प्रादेशिक सुरक्षा, व्यापार, सीमापार दळणवळण, ऊर्जा पुरवठा आणि शांततापूर्ण संवादाबाबत भारताची स्पष्ट, संतुलित आणि ठाम भूमिका मांडली. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताच्या भूमिकेकडे प्रमुख राष्ट्रांचे आणि वृत्तपत्रांचे विशेष लक्ष होते.
या वेळी पंतप्रधानांनी भारताच्या धोरणाचा मुख्य गाभा सुरक्षा, संपर्क यंत्रणा आणि संधी या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित असल्याचे स्पष्ट केले. कोणताही संघर्ष लष्करी कारवायांनी किंवा युद्धभूमीवर सुटू शकत नाही, तर तणावपूर्ण प्रश्न संवाद आणि राजनैतिक वाटाघाटींच्या माध्यमातून सोडवले पाहिजेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. युद्धाचे परिणाम संबंधित देशांपुरते मर्यादित न राहता जागतिक अन्नधान्य पुरवठा, इंधन सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर होत असल्याने युद्ध टाळून संवादाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे भारताने प्रतिपादन केले.