निजामपूरच्या महिलेच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून दखल

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मंगलाबाई शिंदे यांचे पती उत्तम शिंदे यांचे सन 2008 मध्ये निधन झाले असून धुणीभांडी व मोलमजुरी करून त्या एकट्याच कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. त्यांना 3 मुली व 1 मुलगा असून त्यांनी काबाडकष्ट करून तिन्ही मुलींची लग्ने केली. मुलगा राकेश शिंदे अविवाहित असून तो आईला संसार सावरण्यासाठी हातभार लावतो. परंतु आता वय झाल्याने काम होत नाही.

निजामपूर : जैताणे (धुळे) माळमाथा परिसरातील निजामपूर(ता.साक्री) येथील नाभिक समाजातील वयोवृद्ध व कष्टकरी महिला मंगलाबाई उत्तम शिंदे यांनी 7 जुलै 2017 रोजी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळणेसंदर्भात पाठविलेल्या विनंती अर्जाची दखल घेत पंतप्रधान कार्यालयातील कक्ष अधिकारी अलोक सुमन यांनी नुकतेच 2 ऑगस्ट 2017 रोजी पत्रान्वये राज्याच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाही करणेबाबत आदेश दिले असून पत्राची एक प्रत मंगलाबाई शिंदे यांनाही पाठविली आहे. त्यामुळे मंगलाबाई शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

मंगलाबाई शिंदे यांचे पती उत्तम शिंदे यांचे सन 2008 मध्ये निधन झाले असून धुणीभांडी व मोलमजुरी करून त्या एकट्याच कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. त्यांना 3 मुली व 1 मुलगा असून त्यांनी काबाडकष्ट करून तिन्ही मुलींची लग्ने केली. मुलगा राकेश शिंदे अविवाहित असून तो आईला संसार सावरण्यासाठी हातभार लावतो. परंतु आता वय झाल्याने काम होत नाही. म्हणून आहे त्याच जागेवर घर व शौचालय बांधून मिळावे अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात निजामपूर ग्रामपंचायतीने घरकुल योजनेचा लाभ मिळणेसंदर्भात 15 ऑगस्ट 2016 रोजीच्या ग्रामसभेत ठराव करून पंचायत समितीकडे मंजुरीसाठी तसा प्रस्ताव पाठवला होता. पण पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरून त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली नाही. पंतप्रधानांचे पत्र तर मिळाले परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असेही त्या सकाळशी बोलताना म्हणाल्या. याबाबत त्यांना निजामपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते ताहीरबेग मिर्झा, तय्यबबेग मिर्झा, तन्वीर शेख आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याने गेल्या सहा महिन्यांपासून मंगलाबाई यासाठी पाठवूरावा करत होत्या. मंगलाबाई शिंदे यांच्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्याने याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मंगलाबाई शिंदे यांनी आपल्या पत्रात खालील गोष्टी नमूद केल्या आहेत : "मी विधवा व गरीब महिला असून मोलमजूरी करुन पोट भरते. मी गेल्या 30 वर्षांपासून 'बीपीएल' कार्डधारक असून मला शासनाकडून आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. माझ्या कुटुंबाचा सन 2002/07 च्या द्रारिद्रयरेषेखालील यादीत समावेश असून माझी निजामपूर गावात कोणत्याही प्रकारची मालमत्ता वा शेतजमीन नसून मी भूमिहीन आहे. मी वयोवृद्ध असल्याने माझेकडून कोणतेही काम होत नाही. मी लोकांची धुणीभांडी करून उदरनिर्वाह करत आहे. मी राहत असलेले 6 बाय 30 चे घर अत्यंत जुने झाल्यामुळे पावसाळ्यात केव्हाही पडू शकते. त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे व अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत अनेकदा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज करुनही दखल घेतली गेली नाही. तरी मला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा. ही नम्र विनंती..."

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Dhule news gharkul scheme in nijampur