शाब्बास रे पठ्‌ठे ! आधी जि.प.साठी मतदान, नंतर लग्न !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

उमरेड (जि.नागपूर) : साडे सात वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हयात जि.प., पं.स.निवडणुका मंगळवारी (ता.7) मोठया उत्साहात व शांततेत पार पडल्या. यादरम्यान जिल्हयातील कानाकोप-यांत अनेक घडामोडी घडल्या. कुठे मतदारयादयांमध्ये घोळ, कुठे मतदारयादीतून नावे गहाळ तर कुठे मतदानप्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. युवक व ज्येष्ठांमधील उत्साह नजरेत भरण्यासारखा होता. उमरेड तालुक्‍यातील बेला येथे चक्‍क लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवाने मतदानाचा हक्‍क बजावून समाधान मानल्याची घटना घडली. 

क्‍लिक करा : दिव्यांगांना घर, पाणी करात 50टक्‍के सवलत 

लोकशाहीत मतदानाचा अधिकार पार पाडण्यासाठी बाशिंग बांधून एक नवरदेव चक्‍क बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचले व मतदानाचा हक्‍क बजाविल्यानंतरच त्यांना कर्तव्याचे समाधान वाटले, अशी घटना जि.प.निवडणुकीसाठी झालेल्या मतदानादरम्यान घडली. मंगळवारी उमरेड तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेच्या एकूण चार सर्कलच्या 23 उमेदवार व पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये 38 अशा एकूण 61 उमेदवारांनी नशीब आजमाविले. सकाळी सातपासून सुरू झालेले मतदान शांततेत पार पडले.  तालुक्‍यातील मकरधोकडा, वायगाव, बेला आणि नव्याने निर्मित झालेल्या सिर्सी सर्कलच्या एकूण 74 हजार 307 मतदारांपैकी 22 हजार 596 पुरुष व 21 हजार 532 महिला मतदारांनी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत केलेल्या मतदानाची आकडेवारी 59.39 टक्‍के नोंदविण्यात आली. बेला येथे मतदान केंद्र क्रमांक 48 वर बोहल्यावर चढण्याआधी एका नवरदेवाने बाशिंग बांधूनच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्‍क बजाविला. याशिवाय सेव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या याशिवाय सेव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या आंबोलीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर पायाने पंगू असलेले वामन भोयर हे गृहस्थ मतदानासाठी आले होते. तालुक्‍यात भाजप व कॉंग्रेसमध्ये दुहेरी लढत होणार असून, याचे अधिकृत परिणाम बुधवारी दुपारपर्यंत सर्वांसमोर येतील. 

क्‍लिक करा :  जि.प.निवडणुकीसाठी नागपूर जिल्हयात दारूबंदी 

 "यंग ब्रिगेड' चा उत्साह 
गुमगाव :  हिंगणा तालुक्‍यातील पंचायत समिती सदस्यपदासाठी गुमगाव सर्कलमध्ये मतदान शांततेत पार पडले. परिसरात पहिल्या चार तासांत मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला. यावर्षी युवावर्ग मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आणि मित्रपक्षाकडून पंचायत समिती सदस्यपदासाठी सुरेखा प्रमोद फुलकर आणि भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात असलेल्या शोभा धनराज आष्टणकर या दोन्ही महिला उमेदवार पूर्ण शक्तिनीशी मैदानात उतरल्याने अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

क्‍लिक करा :  निघाल्या तलवारी आणि झाले सपासप वार 

मतदारयादीतील घोळ आणि गोंधळ 
रामटेक  :  मतदारयादीतील घोळांमुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित व्हावे लागले, तर हातोडी या गावातील 110 मतदारांची नावे लोहडोंगरी या पाच किलोमीटर अंतरावरील गावाच्या मतदारयादीत तर लोहडोंगरी गावातील 50 जणांची नावे हातोडी गावाच्या मतदारयादीत असल्याने अनेकजण मतदानापासून वंचित राहिलेत. परसोडा-शीतलवाडी येथीलही अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून गहाळ झाली आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारांनी मतदान केले होते. सायंकाळी साडेतीनपर्यंत तालुक्‍यात 55.55 टक्‍के मतदानाची नोंद झाली होती. 

क्‍लिक करा : video : बावनकुळे म्हणतात, वडेट्‌टीवारांचे भाजपमध्ये स्वागतच आहे 

निवडणूक कर्मचारी अस्वस्थ 
कामठी :  येरखेडा ग्रा. पं. मतदान केंद्रावरील 33/13 मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचारी पथक कर्तव्यदक्ष भूमिका बजावून कामठी तहसील कार्यालयात परत आले असता त्यातील एका कर्मचाऱ्याचा सायंकाळी सातच्या सुमारास रक्तदाब वाढल्याने प्रकृती बिघडली. या अस्वस्थ कर्मचाऱ्याचे नाव रमेश पांडे (वय 55, आजनी) असे आहे. घटना घडताच त्वरित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, संदीप शिंदे यांनी उपचारार्थ नजीकच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vote for a Z.P. first, then marry!