छावण्या झाल्या वेगळ्या; फ्लेक्‍सवर अजूनही सरदारांचा डेरा!

leader
leader

मानोरा (जि.वाशीम) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शत्रूच्या गोटातील अनेक सरदारांची पळवापळवी झाली, आमिषे दाखविल्या गेली, निवडणुकीनंतर शहरात मोठमोठे फ्लेक्‍स लागले. या फ्लेक्‍सवर या सरदारांची छायाचित्रे झळकली. मात्र, आता जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक सरदार उसण्या घेतलेल्या छावण्या सोडून पळाले असून, काहींनी दुसऱ्या मनसबदारांचा आश्रय घेतला. तर काहींचे तंबू स्वतंत्रपणे उभे राहिले. मात्र, शहरात लागलेल्या फ्लेक्‍सवर अजूनही त्यांची छायाचित्रे झळकत असल्याने तालुक्‍यातील मतदार मात्र संभ्रमात आहे.

जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ‘इनकमींग’ व ‘आउटगोईंग’ची लागण झाली होती. यामध्ये वर्षानुवर्षे ठरावीक पक्षात सरदारकी भोगणारे अनेक नामवंत सरदार स्वतःच्या विचारधारेच्या शत्रू पक्षाच्या गोटात गेले. यामध्ये काहींना सुभ्याची मनसबदारी देण्याचे आमिष दाखविल्या गेले. तर काहींचा कायापालट करण्याचे प्रलोभणे दाखविल्या गेली. निवडणूक झाल्यानंतर सगळे वातावरण पुन्हा शांत झाले. 

आमदार पाटणींनी घडविली होती मेगा भरती 
कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये आमदार राजेंद्र पाटणी यांनी अशीच मेगा भरती घडवून आणली. ते विजयी झाल्यानंतर त्यांच्या कौतुकाच्या फ्लेक्‍सवर नामवंत सरदारांची छायाचित्रे झळकली. यांना भाजपकडून उमेदवारी पक्की, असे चित्र त्यावेळी निर्माण झाले. मात्र, उमेदवारी वाटपानंतर हे फ्लेक्‍सवरील सरदार वेगवेगळ्या छावण्यांमध्ये पळाल्याचे चित्र समोर आले आहे. 

फ्लेक्सचा भुलभुलैय्या संभ्रमात टाकणारा
फ्लेक्‍सवर असलेले डॉ. संजय रोठे हे सध्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. दिलीप चव्हाण काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती अरविंद पाटील इंगोले हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. अनिल राठोड यांची मुलगी काँग्रेसकडून नशीब अजमावीत आहे. त्यामुळे या फ्लेक्‍सचा भुलभुलैय्या मतदारांना संभ्रमात टाकणारा ठरत आहे.

आचारसंहिता सुरू; फ्लेक्‍स कायम!
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणीही सुरू केली आहे. मात्र, या आचारसंहितेच्या काळातही ज्या पंचायत समितीची निवडणूक आहे. त्या पंचायत समितीच्या आवाराबाहेर राजकीय पुढाऱ्यांचे फ्लेक्‍स झळकत आहेत. हे फ्लेक्‍स शहरीभागात जरी असले तरी, या फ्लेक्‍समुळे ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव पडत नाही काय? किंवा शहरी भागात आचारसंहिता नाही का? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

उमेदवारीवरून महाभारताचा अंक सुरू
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी वाटपामध्ये भाजपकडून उमेदवारीकरिता सर्वाधीक मागणी होती. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. काहींनी जिल्हा परिषदेसाठी विधानसभा निवडणुकीत जीव तोडून मेहनत घेतली. मात्र, तालुक्‍यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारी वाटपावरून त्या पक्षांत महाभारताचा पहिला अंक चांगलाच रंगत आहे. मालेगाव तालुक्‍यातून रत्नप्रभा घुगे, मानोरा तालुक्‍यातील अरविंद पाटील इंगोले, वाशीम तालुक्‍यातून अनिल कांबळे, मोहन चौधरी हे शिलेदार भाजपच्या वर्तुळाबाहेर फेकल्या गेले. 

अन् त्यांनाही खुंटीवर टांगले
रत्नप्रभा घुगे व अनिल कांबळे हे भाजपचे विद्यमान सदस्य होते हे विशेष, तर कारंज्या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आले. त्यांनी दोन गटांतून उमेदवारी अर्जही भरला. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारीच कटल्याची जादू झाली. त्यामुळे आता त्यांना अपक्ष निवडणुकीत उतरल्याशिवाय पर्याय नाही. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात भाजपचा एक गट व केवळ दोनच मित्रपक्ष असताना त्यांनाही खुंटीवर टांगून ठेवल्याने निर्माण झालेली नाराजी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडते? याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com