तुरीला हमीभावापेक्षा ९०० रुपये कमी, भाव वाढण्याचे नाहीत संकेत

toor selling rates are decreases in amravati
toor selling rates are decreases in amravati

अमरावती : खरीप हंगामातील अखेरचे पीक असलेली नवी तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने तुरीला 6 हजार रुपये हमीभाव दिला आहे. मात्र, नव्या तुरीचे स्वागत केवळ 5100 ते 5850 रुपयांनी होऊ लागले आहे. भविष्यात भाव वाढण्याचे संकेत सध्या नाहीत. शासनाने नोंदणी करण्याचे आदेश जारी केले असले तरी खरेदीचे आदेश मात्र काढण्यात आलेले नाहीत.

यंदा खरीप हंगाम अवकाळी व अतिपावसाने वाईट गेला. मूग, उडद, कापूस व सोयाबीन पिकाची हानी झाल्याने शेतकऱ्यांची आशा तुरीवर आहे. अशातच तुरीवर दवाळ गेल्याने हानी झाली. अशा स्थितीतही तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असले तरी पावसाने त्यावरही आक्रमण करून उत्पादनाची सरासरी घसरविली आहे. प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. आता तुरीचे सोंगणी जवळपास पूर्ण झाली असून नवी तूर बाजारात येऊ लागली आहे. शासनाने गतवर्षीच्या हमीदरात वाढ करून सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव दिला आहे.

बाजार समितीत या आठवड्यात तुरीचे आगमन होऊ लागले आहे. शनिवारी (ता.9) 485 पोत्यांची आवक नोंदविल्या गेली. कमी उत्पादनामुळे भाव वधारलेले राहतील ही अपेक्षा मात्र फोल ठरली. नव्या लाल तुरीस प्रतिक्विंटल 5100 रुपयांपासून भाव मिळाले. कमाल भाव 5850 रुपये मिळाला. हा भाव फार अल्प शेतकऱ्यांच्या पदरी पडला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना 5100 रुपयांना तूर विकण्याची वेळ आली. आगमनातच तुरीचे बाजार समितीत भाव कोसळले आहेत.

शेतकऱ्यांनी परत नेली तूर -
मोठ्या अपेक्षेने बाजार समितीत तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने त्यांनी तूर परत नेली. येण्याजाण्याचा व हमाली, मापारीचा खर्च असा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला. हमीदराच्या तुलनेत तब्बल नऊशे रुपयांची तफावत आल्याने शेतकरी आल्या पावली घरी परतले.

शासकीय खरेदी सुरू करा -
शासनाने नोंदणीचे आदेश काढले असले तरी खरेदीचे आदेश मात्र अद्याप निघालेले नाहीत. त्यामुळे बाजार समितीत खरेदीदार व व्यापाऱ्यांची मनमानी सध्या सुरू झाली आहे. शासकीय खरेदी सुरू केल्यास स्पर्धा होऊन भाव वधारतात हा अनुभव असल्याने शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com