ग्रामीण भागात नियम धाब्यावर, पॉस मशीनआडून युरियाचा काळाबाजार?

urea selling without pos machine in wardha
urea selling without pos machine in wardha
Updated on

वर्धा : शासनाने खत विक्रीसाठी पॉस मशीन सक्‍तीची केली आहे. असे असताना ग्रामीण भागात मशीन बंद असल्याचे कारण काढून सर्रास युरियाची विक्री सुरू असल्याची ओरड आहे. यातून मोठ्या प्रमाणात युरियाचा काळाबाजार होण्याची शक्‍यता असताना याकडे मात्र कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. 

जिल्ह्यात एकूण 773 कृषी सेवा केंद्र आहेत. या सर्वच कृषिसेवा केंद्रांना पॉस मशीन सक्‍तीची करण्यात आली आहे. मशीनचा नियम लावून तीन वर्षांचा काळ होत आहे. यात मशीनमध्ये बिघाड येणे साहजिकच आहे. यात कोरोना काळ असल्याने या मशीनचा वापर होणे कठीण झाले. यात अनेक गावात मशीन खराब झाल्याचे सांगून थेट विक्री सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. 

कारंजा तालुक्‍यात शंभर युरियाच्या बॅगचे बिल एकाच्याच नावावर फाडल्याची चर्चा झाली. याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी या संदर्भात चौकशी केली असता चुकीने बिल फाडण्यात आल्याचे बयान व्यावसायिकाने नोंदविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशा विक्रीकडे लक्ष देत चौकशी करण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांसाठी आलेल्या या युरियाचा यातून काळाबाजार होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. अनेक दुकानात पॉस मशीन नाही. जिथे आहे तिथे बिघाड झाल्याचे सांगण्यात येते. असे असताना या दुकानांतून मोठ्या प्रमाणात युरियाची विक्री सुरू आहे. याकडे कृषी विभागाच्या गुणनियंत्रक पथकाने लक्ष देत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. 

ऍक्‍नॉलेजमेंटमुळे होतो नोंदीला विलंब -
कृषी व्यावसायिकाकडे युरियाची खेप आल्यानंतर कंपनीकडून त्याचे ऍक्‍नॉलेजमेंट येण्यासाठी सुमारे 15 दिवसाचा काळ जातो. यामुळे या दिवसात जर कोणी शेतकरी युरियाची मागणी करण्यासाठी आला तर त्याला परत पाठविणे योग्य नाही. यामुळे स्थानिक पातळीवर काही ठिकाणी असा प्रकार घडतो. यामुळे यात काळाबाजार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

मशीन बिघडल्यास संगणक, मोबईलवर सुविधा - 
पॉस मशीनमध्ये बिघाड आला हे कारण सांगून अनेक कृषी व्यावसायिक थेट विक्री करीत आहेत. पण, यावर शासनाने यापूर्वीच पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कृषीकेंद्र मालकाकडे असलेल्या संगणकासह त्याच्या मोबाईलवर तसे अ‌ॅप देण्यात आले आहे. यात तो दुकानमालक विक्रीची नोंद करू शकतो. 

पॉस मशीन बंद असणे हे कारण नाही. मशीन बंद असली तरी शेतकऱ्याची नोंद करण्यासाठी कृषीकेंद्र चालकांना एक अ‌ॅप दिले आहे. यात ते नोंद करू शकतात. 
- संजय बमनोटे, कृषी अधिकारी, वर्धा 

खत विक्री करताना शासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. यात पॉस मशीन सक्‍तीची आहे. यामुळे विनामशीन विक्री होणे अवघड आहे. बऱ्याच वेळा खताचा साठा आल्यानंतर त्याची पोचपावती येण्यास विलंब होतो. यामुळे कुठे शेतकऱ्यांना खत देण्याचे प्रकार घडले. 
- रवी शेंडे, अध्यक्ष, कृषी केंद्र संघटना 

खताची विक्री पॉस मशिनने करायची आहे. मात्र, अनेक कृषी दुकानातील मशिन खराब झाल्याने त्यांनी खताची विक्री केली नाही. अनेक व्यावसायिकांनी पॉस मशिन दुरुस्तीला पाठविले. मात्र, कोरोनामुळे त्या दुरुस्त होऊ शकल्या नाही. 
- विशाल देवकर, गुण नियंत्रक अधिकारी, पंचायत समिती कारंजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com