
देशात सर्वत्रच नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होत आहेत. नागपूर-नागभीड मार्गाच्या गेज परिवर्तनाची कामे सुरू आहेत. पण, कामाची गती लक्षात घेता तो कधीपर्यंत पूर्ण होईल त्याबाबत साशंकताच आहे.
नागपूर : भारतीय रेल्वेने पायाभूत विकासावर सर्वाधिक भर दिला. त्यात विदर्भावरही बऱ्याच अंशी ‘प्रभुकृपा’ झाली. पुन्हा रेल्वेमंत्रीपद महाराष्ट्राच्याच वाट्याला असल्याने विदर्भासह महाराष्ट्रातील घोषणेनंतर खोळंबलेल्या प्रकल्पांचा मार्ग मोकळा होण्यासह नव्या प्रकल्पांचीही घोषणा होऊ शकेल, अशी आशा व्यक्त होत आहे. बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे भिजत घोंगडे कायमच आहे. या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त निधी मिळणे गरजेचे आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक म्हणून विकसित करण्याची घोषणा झाली पण या स्थानकाचा चेहरा-मोहरा फारसा बदललेला नाही. मुख्य स्थानकावरील भार कमी करण्यासाठी इतवारी, अजनी, गोधनी ही शहरातील अन्य स्थानके विकसित होण्याची गरज आहे. पण, अजनी वगळता अन्य स्थानकांच्या बाबतीत फारशा हालचाली नाहीत. देशात सर्वत्रच नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होत आहेत. नागपूर-नागभीड मार्गाच्या गेज परिवर्तनाची कामे सुरू आहेत. पण, कामाची गती लक्षात घेता तो कधीपर्यंत पूर्ण होईल त्याबाबत साशंकताच आहे.
नक्की वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप
महाराष्ट्राची उपराजधानी असणारे नागपूर संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठीही महत्त्वपूर्ण आहे. येथून पुणे, मुंबईसाठी थेट रेल्वेसेवा असली तरी राजधानी दिल्लीसाठी मात्र एकही ओरिजीनेटींग गाडी नाही. यामुळे आरक्षण मिळविण्यात बऱ्याच अडचणी येतात.
दिल्लीहून नागपूर ओरिजिनेटींग थेट रेल्वे सुरू करण्याची जुनी मागणी आहे. याशिवाय गोव्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविली जाते. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही आशादायक आहे. यानंतरही नियमित गाडी सुरू करण्याचे धाडस रेल्वेला अद्याप दाखवता आले नाही. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही गाडी नियमीत करण्याची मागणी जोरावर आहे.
थर्ड-फोर्थ लाईन
नवनवीन रेल्वेगाड्यांसाठी नागपूर- सेवाग्राम थर्ड- फोर्थ लाइन ही काळाची गरज आहे. बुटीबोरी - सिंधी या २० किमी सेक्शनमध्ये कामे पूर्ण झाली आहेत. पण, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया खोळंबल्याने प्रकल्पावरही परिणाम झाला आहे. अजूनही २२ हेक्टर जागा अधिग्रहीत करणे शिल्लक आहे. जागा मिळेल तसे काम पुढे नेण्याची तयारी रेल्वेने ठेवली आहे.
२०१३- २०१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर येथे इलेक्ट्रॉनिक टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ती पुढेच जाऊ शकली नाही. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना नागपुरात रेल्वे मेडिकल कॉलेजचीही घोषणा करण्यात आली होती. तीसुद्धा हवेतच विरली. मध्य व दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय मुख्यालय असणाऱ्या नागपूरचा व्याप चांगलाच विस्तृत आहे. देशाच्या मध्यभागी असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी नागपूर स्वतंत्र झोन होण्याची गरज आहे. तशी मागणीही अनेकदा करण्यात आली.
नागपूर स्थानकावरून दररोज जवळपास दीडशे गाड्या जातात. सारा भार नागपूर स्थानकावर पडतो. तो कमी करण्यासाठी अजनी, गोधनी, इतवारी, कळमना या स्थानकांचा टर्मिनस म्हणून विकास केला तर नागपूर स्थानकावरील भार हलका होईल आणि काही गाड्या तेथून सोडता येतील, असा जुनाच प्रस्ताव आहे. अजनीला इंटर मॉडेल स्टेशन स्वरूपात विकसित करण्यात येत आहे. पण, अन्य स्थानकांचे काय हा प्रश्न कायमच आहे.
व्यापारी महत्त्व लक्षात घेता मध्यप्रदेश, छत्तीसगडसहच विदर्भातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना माल ठेवण्यासाठी मोठे वेअरहाऊस नाही. रेल्वेकडे कळमना भागात मोठी जागा आहे. तेथील १५ एकर जागेवर वातानुकूलित वेअरहाउसच्या निर्मितीचा प्रस्ताव दपूमरे व सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशनने रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. तो पुढे जाऊ शकला नाही.
नागपूरमार्गे रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेक गाड्या रात्री उशिरा सुटतात. अशावेळी बाहेरील प्रवाशांना लॉजचा सहारा घ्यावा लागतो. त्याऐवजी रेल्वेने बजेट हॉटेल किंवा लाऊंज सुरू केल्यास प्रवाशांना कमी दरात तेथे राहण्याची सोय उपलब्ध होईल. याबाबतचा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. आवण्याक पाहणीही झाली. तरीही प्रकल्प रखडला.
यवतमाळच्या विकासात विमानतळ आणि रेल्वे लाईन नसने हा प्रमुख अडथळा आहे. यवतमाळ- मूर्तिजापूर शकुंतला रेल्वेचा भारतीय रेल्वेत समावेश करून तिला पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. वर्धा- नांदेड व्हाया यवतमाळ मार्गासाठी निधी मिळणे अपेक्षित आहे. तसेच अकोट ते खंडवा गेज परिवर्तनाचे काम करण्यात येत आहे. परंतु हे काम सध्या थांबले आहे. त्याला गती देण्याची गरज आहे. देसाईगंज ते गडचिरोली दरम्यान नवीन रेल्वे मार्गाची मागणी आहे. मध्यंतरीच्या काळात यासाठी आवश्यक भूसंपादनाबाबत बैठकी झाल्या. जागा वन विभागाची असल्याने भूसंपादनाचा प्रश्न आहे.
अधिक वाचा - गडकरींशी पंगा नको म्हणून आमदार पडळकरांना भाजप नेत्यांनी सोडले वाऱ्यावर; अद्याप ‘वंचितच'
नागपूर स्टेशनचाही भार कमी होईल
ब्रॉडगेज मेट्रोमुळे रेल्वेस्थानकांवरील गर्दी वाढणार आहे. अशा स्थितीत इतवारी, अजनी, गोधनी, कळमना यासारख्या स्थानकांचा टर्मिनस स्वरूपाच विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपूर स्टेशनचाही भार कमी होईल. सोबतच विदर्भातील सर्वच स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास स्वतःत वीजनिर्मिती होई शकेल. पारंपरिक विजेचा इतरत्र उपयोग करता येईल.
- डॉ. प्रवीण डबली,
माजी सदस्य, प्रादेशिक रेल्वे सल्लागार समिती
जिल्ह्याचा विकासही रखडला
मागील अनेक वर्षांपासून देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रखडला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकासही रखडला आहे. जिल्ह्यात फक्त देसाईगंज येथेच रेल्वे स्टेशन आहे. पण जिल्ह्याच्या सीमेवरून जाणारी रेल्वे जिल्ह्यात धावत नाही. म्हणून या प्रकल्पातील अडथळे दूर करून हा प्रकल्प सरकारने पूर्ण करावा.
- सतीश त्रिनगरीवार,
व्यावसायिक, गडचिरोली
अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी
अकोला रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिना व प्लॅटफॉर्म क्रमांक पाच व सहा या दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वे लाइनची कनेक्टिव्हिटीमध्ये रेल्वेच्या भुसावळकडे जाणाऱ्या मार्गावर करण्यात यावी. याशिवाय अचलपूर- मूर्तिजापूर-यवतमाळ या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. अकोट ते खंडवापर्यंत रखडलेल्या रेल्वेमार्गाचे कामही तातडीने होणे गरजेचे आहे. नांदेड ते वाराणसी दरम्यान विदर्भातील प्रवाशांसाठी नवीन रेल्वे गाडी सुरू होणे ही अनेक वर्षापासून प्रवाशांची मागणी आहे. वाशीम- नरखेड व शेगाव-जालना हा रेल्वे मार्गही तातडीने होणे आवश्यक आहे.
- रवी आलमचंदानी,
अध्यक्ष, विदर्भ रेल्वे यात्री संघ