महाराष्ट्रात मध्यावधी झाली, तर लढू आणि जिंकूही : शहा

टीम ई सकाळ
शनिवार, 17 जून 2017

शहांची मुंबई वारी...पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत देशाला विश्वास दिला
  • महाराष्ट्र सरकार पाच वर्षे टिकेलच; मध्यावधी झाल्याच तर आम्ही लढू
  • राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवाराचे नाव सर्व मिळून ठरवू
  • काश्मीर प्रश्न सुटण्याच्या दिशेने सुरूवात

शहांची मुंबई वारी...पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्षांत देशाला विश्वास दिला
  • महाराष्ट्र सरकार पाच वर्षे टिकेलच; मध्यावधी झाल्याच तर आम्ही लढू
  • राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवाराचे नाव सर्व मिळून ठरवू
  • काश्मीर प्रश्न सुटण्याच्या दिशेने सुरूवात

राजकारणात दोन वर्षे हा काही फार मोठा काळ नसतो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हे पक्के ठावूक आहे. मुंबईत आज (शनिवार) शहा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याची थेट प्रचिती आली. दोन वर्षांवर असलेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या आणि सुरू असलेली कामांची जंत्रीच शहा यांनी मांडली आणि भाजप येत्या लोकसभा निवडणुकीला याच बळावर सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. 

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात शहा यांनी कोणतेही थेट विधान टाळले; त्याचवेळी 'महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर भाजप लढवेल आणि जिंकेल,' असे विधान त्यांनी केली. मात्र, 'महाराष्ट्र सरकारचे काम चांगले चालले आहे आणि ते सरकार पाच वर्षे टिकेल,' असेही शहा यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शहा म्हणाले, 'आमच्याकडे काही पर्याय आहेत. सहकारी पक्षांशी चर्चा करून, सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवार ठरवला जाईल.' शहा यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले. शिवसेनेने सुचविलेल्या नावांसंदर्भात विचारले असता, शहा यांनी हसत हसत प्रश्न बाजूला ठेवला आणि थेट उत्तर देणे टाळले. 'प्रत्येक नावाचा विचार करू,' असे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने आधी उमेदवार जाहीर केला असता तर चालले नसते का, या प्रश्नावर ते म्हणाले, की आम्ही उमेदवार जाहीर केला, तर विरोधी पक्षांना ते नाव रुचेलच असे नाही. 

अमित शहा यांनी आज सकाळी केलेले ट्विट

काश्मीर प्रश्न पाच-सहा-सात महिन्यांत सुटणारा नाही, असे शहा यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. 'खूप वर्षांपासून चिघळलेला हा प्रश्न आहे. मात्र, आम्ही येत्या काही काळातच तो नियंत्रणात आणणार आहोत. त्याची सुरूवात झालेली आहे,' असे शहा यांनी सांगितले. सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण असताना पाकिस्तानशी त्रयस्थ ठिकाणीही क्रिकेट खेळणे योग्य आहे का, या प्रश्नावर शहा यांनी 'आंतरराष्ट्रीय सामने खेळावेच लागतील,' असे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन देवेंद्र फडणवीस सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळले असल्याचे सर्टिफिकेटही शहा यांनी दिले. 

शहा यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मोदी सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामांचा पाढा वाचला. 'सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या सरकारने पाच कोटी गॅस सिलिंडर्स ग्रामीण भागात आणि महिलांना दिले. अर्थव्यवस्थेला आमच्या सरकारने वेग दिला. देशाविषयी जनतेची मानसिकता सजग केली. तीन वर्षांत भरघोस कामगिरी केली. आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही,' असे शहा यांनी सांगितले. 

'जीएसटीवर आतापर्यंत निव्वळ चर्चा होत होती. जीएसटी आम्ही प्रत्यक्षात आणले. देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. महिला, आदिवासी, गरीबांसाठी नव्या योजना आणल्या. वन रँक वन पेन्शन योजना आणली,' असेही त्यांनी सांगितले. 

'सर्जिकल स्ट्राईक'चा संदर्भ घेऊन शहा म्हणाले, 'देशाच्या राजकीय नेतृत्वाकडे असलेली दृढ इच्छाशक्ती आम्ही सर्जिकल स्ट्राईकमधून दाखवून दिली आहे.'

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या 
नगरजवळ 1 कोटींचा गांजा जप्त
कुमार विश्वासांविरोधात 'आप' कार्यालयाबाहेर पोस्टर्स
लग्नाच्या नाट्याची मनोरंजक कहाणी टी टी एम एम (तुझं तू माझं मी)
पानसरे हत्या: 21 महिन्यांनी समीरला जामीन

पुणे: उरूळीकांचनजवळ महिलेवर गाडीमध्ये सामुहिक बलात्कार
लातूर जिल्ह्यात एटीएसचे छापासत्र; टेलिफोन एक्‍सेंजचा अड्डा उद्ध्वस्त
काश्मीर: बीजबेहरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला
नाशिक: जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू
मुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात
इंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये