बैलगाडी उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू

बालाजी घायकर
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

आधीच पायाला अपंगत्व आले असल्याने अनिल उमाजी जोंधळे यांना उडी मारता आली नाही. परिणामी बैलगाडी अंगावर पडली.

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या पुलाजवळ सोमवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजता घडली. तीत बैलगाडा चालक शेतमजूर अनिल उमाजी जोंधळे (रा. चितळी, वय ३२) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर एक शेतमजूर किरकोळ जखमी झाला.

या बाबत माहिती अशी की, लोहा तालुक्यातील चितळी येथील शेतमजूर अनिल जोंधळे आणि भारत गायकवाड हिप्परगा शिवारातून बैलगाडीत वैरण घेऊन चितळी गावाकडे परत येत होते. हिप्परगा नदीच्या पुलाजवळ बैल बिथरले असता जखमी भारत गायकवाड याने उडी मारून जीव वाचवला, मात्र अनिल उमाजी जोंधळे यांना यापूर्वी पायाला अपंगत्व आले असल्याने उडी मारता आली नाही. परिणामी बैलगाडी अंगावर पडली. जखमींना लोह्याच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असताना अनिल उमाजी जोंधळे यांचा मृत्यू झाला.

अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने ते रोजंदारी करून संसाराला हातभार लावत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा व आई वडील असा परिवार आहे. शोकाकूल वातावरनात मंगळवारी चितळी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nanded news loha farmer dies as bullock cart overturns