कल्याण डोंबिवलीमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई

रविंद्र खरात 
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर मध्ये बेशिस्त रिक्षा चालकामुळे रस्ते अडले होते त्यांना शिस्त लावण्यासाठी सर्वच स्तरामधून मागणी होत होती. मागील आठवड्यात पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्या दालनात आरटीओ, वाहतुक पोलिस आणि पालिकेची संयुक्त बैठक झाली होती.

कल्याण : कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरमधील रिक्षामुळे होणारी वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वाहतुक पोलिस आणि आरटीओच्या बैठकीनंतर आज (बुधवार) सकाळपासून बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे.

कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर मध्ये बेशिस्त रिक्षा चालकामुळे रस्ते अडले होते त्यांना शिस्त लावण्यासाठी सर्वच स्तरामधून मागणी होत होती. मागील आठवड्यात पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्या दालनात आरटीओ, वाहतुक पोलिस आणि पालिकेची संयुक्त बैठक झाली होती. यात कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरामधील रिक्षा चालक बेशिस्तपणे रांगा लावत असल्याने चारही बाजूने वाहतुक कोंडी होत असल्याच्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली. यावेळी आरटीओनेही अहवाल सादर केला होता. त्याची अंमलबजावणी करण्याअगोदर बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाईचे ठरले होते. त्या धर्तीवर आजपासून डोंबिवली आणि कल्याणमध्ये धड़क कारवाई सुरु करण्यात आली.

डोंबिवलीमधील ईगल ब्रिगेड कार्यकर्त्यांनी वाहतुक कोंडी होवू नये म्हणून मदत केली. रिक्षामध्ये ओळखपत्र न लावणे, गणवेश न घालणे, रिक्षात चौथे सीट घेणे, 16 वर्ष पूर्ण होवून ही बेकायदेशीर रिक्षा रस्त्यावर काढत प्रवासी वर्गाचा जीव धोक्यात घालणे आदी विषयावर कठोरपणे कारवाई सुरु केली आहे. यामुळे बेकायदा रिक्षा चालविणाऱ्याचे धाबे दणाणले असून यामुळे दोन्ही शहरातील रिक्षाची संख्या सकाळी कमी दिसत होत्या.

मागील आठवड्यात पालिकेत बैठक झाली होती. त्यानुसार आज कल्याण डोंबिवलीमध्ये आरटीओ आणि स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. आगामी काळात ही कारवाई सुरु राहणार असून भंगार रिक्षा चालविण्याऱ्याची गय केली जाणार नाही, अशी माहिती वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी सकाळला दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :