खरिपासाठी पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर

गणेश बोरुडे
मंगळवार, 25 जुलै 2017

चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा कृषी विभागातर्फे २३ जुलैला पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर झाली असून,अन्नधान्य आणि गळीत धान्यासाठी केवळ २ टक्के तर नगदी पिकांसाठी केवळ ५ टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा असून, उर्वरित विमा हप्त्याची रक्कम शासन भरणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली.

तळेगाव स्टेशन : खरीप हंगाम २०१७-१८ साठी पुणे जिल्हा कृषी विभागातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना अध्यादेश काढण्यात आला असून, नैसर्गिक आपत्ती, किड रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे.नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती अथवा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये यासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै पर्यंत आहे.

चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा कृषी विभागातर्फे २३ जुलैला पंतप्रधान पीक विमा योजना जाहीर झाली असून,अन्नधान्य आणि गळीत धान्यासाठी केवळ २ टक्के तर नगदी पिकांसाठी केवळ ५ टक्के विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा असून, उर्वरित विमा हप्त्याची रक्कम शासन भरणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली. पुणे जिल्ह्याकरिता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबवली जाणार आहे. योजनेमध्ये समविष्ट पिकनिहाय आणि तालुकावार विमा संरक्षित रक्कम आणि प्रति हेक्टरी भरवयाचा विमा हप्ता यासंबंधात माहिती देणारा तक्ता आपल्या अध्यादेशात कृषी विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार कमीतकमी ७८० रुपये तर जास्तीत जास्त २७५० रुपये विमा हप्ता प्रतिहेक्टरी भरावा लागणार आहे.

सर्वात कमी विमा संरक्षित रक्कम बाजरी-नाचणी साठी प्रति हेक्टरी २० हजार रुपये तर सर्वात जास्त विमा संरक्षित रक्कम कांद्यासाठी प्रति हेक्टरी ५५ हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे.पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पन्नात येणारी घट,हंगामातील प्रतिकूल परिस्थतीमुळे झालेले नुकसान,काढणी पश्चात नुकसान अथवा चक्रीवादळ आणि यावेळी पावसामुळे झालेले नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पीक विमा योजना लागू राहील.पिक विमा धारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत हप्ता भरल्याच्या रसदीसह पंचनामा करुन घेणे आवश्यक आहे.३१ जुलैपर्यंत पिक विमा हप्ता भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण २६२ शाखा सोबतच इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या १,२५६ शाखांमध्ये सोय करण्यात आली असून यावर्षी प्रथमच महा ई सेवा केंद्र आणि ५१४ सामाईक सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.विमा हप्त्याच्या अर्जासोबत आधारकार्ड अनिवार्य असून,अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

योजनेची वैशिष्टे
●कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक
●बिगर कर्जदारांसाठी पीक विमा ऐच्छिक
●पिकाच्या मंजूर कर्जमर्यादे इतकाच विमा
●खास टोल फ्री क्रमांक : १८००२३३११४६

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: