हा शाप कधी सुटेल? मंगरुळपीरात भीक मागणाऱ्या मुलांमध्ये वाढ!

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 9 November 2020

खेळण्या-बागडण्याचं, शाळेत जाण्याचं त्यांचं वय. या वयात त्या चिमुकल्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर फिरविले जात असल्याचे चित्र शहरात दररोज पाहायला मिळते.

मंगरुळपीर (जि.वाशीम)  ः खेळण्या-बागडण्याचं, शाळेत जाण्याचं त्यांचं वय. या वयात त्या चिमुकल्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर फिरविले जात असल्याचे चित्र शहरात दररोज पाहायला मिळते.

चार ते बारा वयोगटातील ही मुले हातात ताट घेऊन रस्त्यावर दिसेल त्या व्यक्तीकडे भीक मागताना दिसतात. ही मुले कुणाची? त्यांना ज्यांनी जन्माला घातले ते कुठे आहेत? ते काय करतात? असे प्रश्न या मुलांना पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाहीत.

ही मुले स्वत:च्या चैनीसाठी किंवा कुटूंब चालविण्याची जबाबदारी म्हणून भीक मागतात असे नाही तर, त्यांच्या माध्यमातून भीक मागणे सुलभ होते म्हणून त्यांचा वापर केला जातो का? असा सवालही सदर मुलांना बघितल्यावर होतो.

मंगरुळपीर शहरात अनेक सामाजिक संस्था आहेत. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत तसेच शासनाचे विविध सामाजिक उपक्रम आहेत. मात्र, तरीही बालभिकाऱ्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यास कुणाला वेळ नाही.

भीक मागणाऱ्या मुलांची भाषा सुद्धा शहरातील लोकांना समजत नाही. मग ही मुले परप्रांतीय तर नाहीत! थंडीचा कडाका वाढला असताना मुलांच्या अंगावर स्वेटरही नसतो. या मुलांची भेट घेऊन चौकशी केली तर, ते शिकवल्यासारखे ठराविक उत्तर देतात.

यामध्ये ते शाळेला जातात काय की नाही, हे समजनेही कठीणच आहे. आई किंवा वडील कुठे राहतात तर, ते वेगळ्याच भाषेत बोलतात. ही मुले एकमेकांची फार काळजी घेतात. चार वर्षाचं लेकरू सोबत असेल तर, त्याची आपुलकीने काळजी घेतात. या मुलांच्या बाबत मंगरुळपीर पोलिसांनी ‘ऑपरेशन स्माईल’ ही मोहीम राबविणे व एक पथक तयार करणे आवश्यक आहे.

पोलिसांनी ‘ऑपरेशन स्माईल’ या मोहिमेंतर्गत वाट हरविलेल्या मुलांचा शोध घेतला पाहिजे. पण भिकेसाठी त्यांचा वापर केला जात असेल तर, त्याचीही दखल घेतली जावी. भीक मागणाऱ्या मुलांकडे पाहिले तर, डोळ्यात अश्रू उभारतात. अंगावर धड कपडे नाहीत, केस वाढलेले, पायात चप्पल नाही, शर्टाची बटणे तुटलेली, डोळ्यावर प्रचंड ताण, पोट खपाटीला गेलेले असते.

या मुलांना पाहून अनेकांना दया येते. यामुळे काहीजण भीक देतात तर, काहीजण भिकेचा फंडा म्हणून त्यांना झिडकारतात. या कोवळ्या मुलांना भीक मागायला कोण लावतो, या मागचे अर्थकारण काय, याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही. जर मंगरुळपीर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पोलिस, बालविकास अधिकारी यांनी पुढाकार घेतला तर, निश्चितच काही फायदा होईल.

बळजबरीने बालकांकडून भीक मागून घेणे कायदेशीर गुन्हा आहे. जिल्ह्यात अशा बालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या सुपूर्द करीत त्यांना सतर्क करावे. महिला बालकल्याण विभाग व पोलिस विभागाने या समस्येची दखल घेणे आवश्यक आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
- सचिन कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, मंगरूळपीर

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Increase in children begging in Mangrulpeer!