esakal | कोरोनाचा आलेख घसरता,  २८ दिवसांत आढळले सहाशेवर रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Six hundred patients found in 28 days

जिल्ह्यात गत पाच, सहा महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख ऑक्टोबर महिन्यात घसरला असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात दोन हजारांवर कोरोनाबाधित आढळल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या २८ दिवसांत मात्र सहाशेच नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा आलेख घसरता,  २८ दिवसांत आढळले सहाशेवर रुग्ण

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला  ः जिल्ह्यात गत पाच, सहा महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख ऑक्टोबर महिन्यात घसरला असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात दोन हजारांवर कोरोनाबाधित आढळल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या २८ दिवसांत मात्र सहाशेच नवे रुग्ण आढळले आहेत.

याव्यतिरीक्त गत महिन्यात ६०वर रुग्णांचा जीव घेणाऱ्या कोरोनाने या महिन्यात मात्र ३९ रुग्णांचाच जीव घेतला आहे. म्हणजेच कोरोनाचा कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.


कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला.

सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारावर पोहचली. त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर झाले होते. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा ६० वर जावून पोहचली होती.

त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण १३ ऑक्टोबररोजी आढळले. यादिवशी ३३ रुग्णांची नोंद झाली.

परंतु यापूर्वीच्या महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या प्रतिदिवशी शंभरावर जावून पोहचली होती. मृत्यूचा दर सुद्धा सप्टेंबर महिन्यासह इतर महिन्यात सर्वाधिक असल्याचे दिसून आले होते. सप्टेंबर महिन्यात ६० रुग्णांपेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु ऑक्टोबरमध्ये मात्र आतापर्यंत ३९ रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्याचे आवाहन आरोग्य विभागासमोर आहे.


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.६ टक्के
कोरोनाबाधिकांवर उपचार केल्यानंतर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात वाढल्यामुळे सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८६.६ टक्के झाला आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात जिल्ह्यात वाढ झाली असली तर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मात्र जिल्हा माघारलेला आहे. सध्या धुळे, जळगावाच रिकव्हरी रेट राज्‍यात सर्वाधिक असल्याची माहिती आहे.

मृत्यूदर तीन टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन आरोग्य विभागासमोर कायम आहे. सध्या कोरोनाचा मृत्यूदर ३.२ टक्के आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपाययोजना मृत्यूदर कमी करण्यासाठी अपूऱ्या असल्याचे दिसून येत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)