Holi-Celebrations esakal
जळगाव

Holi 2023 : ‘बेरंग’ बरसे... भरकटलेल्या ‘युवा’शक्तीचे बीभत्स वर्तन!

सचिन जोशी

जळगावातील काव्यरत्नावली चौकात मंगळवारी (ता. ७) रंगांचा पवित्र उत्सव साजरा करताना ‘युवा’शक्तीने आपल्या वर्तनाचे बीभत्स, अश्‍लील वर्तन करत जो उच्छाद मांडला तो केवळ निंदनीयच नाही, तर निषेधार्हही आहे.

आपल्या सण-उत्सवांचे मांगल्य आपणच जपायला हवे हे भानही न राहिलेल्या, दिशाहीन व भरकटलेल्या तरुणाईची सळसळती ऊर्जा, अशी नकारात्मक वर्तनाकडे वळत असेल, तर ते गंभीरच. एरवी काही चांगले उपक्रम राबविले जातात, म्हणून या चौकावर मक्तेदारी गाजविणाऱ्या संस्थेनेही अशा अनुभवातून भानावर यावे, ही अपेक्षा.

तरुणांचा देश म्हणून भारत ओळखला जातो. किंबहुना हीच तरुणाई आपल्या राष्ट्राची खरी शक्ती अन्‌ ऊर्जाही... ही ऊर्जा सकारात्मक, विधायक आणि रचनात्मक कामांसाठी वापरली जात असेल, तर राष्ट्राच्या उभारणीत युवाशक्तीचे योगदान अव्वलच ठरेल किंवा ठरतेय.

अर्थात, वयाच्या या उंबरठ्यावर वाट चुकण्याचीच जास्त भीती, म्हणून तरुणांच्या या शक्तीला योग्य दिशा देण्याचीही हीच योग्य वेळ, पण दुर्दैवाने समाजात असे काही प्रकार घडतात, की तरुणाई त्या प्रकारांच्या आहारी जाते आणि आपले भान हरपून स्वत:चे अस्तित्व गमावून बसते.

मंगळवारी धूलिवंदनच्या पवित्रदिनी काव्यरत्नावली चौकात बेभान तरुणाईने रंगाचा बेरंग कसा करावा, याचा नकारात्मक ‘आदर्श’च घालून दिला. निमित्तं होते, युवाशक्ती फाउंडेशनने भरविलेल्या ‘रंग बरसे’चे. सकाळी साडेनऊपासून दुतर्फा रस्ते अडवून, डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात नव्या-जुन्या गाण्यांच्या रिमिक्सवर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई, असे या चौकातील चित्र...

बघता-बघता चौकात होणारी गर्दी प्रचंड वाढली, तशी तेथील नकारात्मक ऊर्जाही वाढत गेली. नशा करून आल्यासारखे तरुण वागू लागले. महिला-मुलांसाठी वेगळ्या व्यवस्थेचा युवाशक्ती फाउंडेशनचा दावा धुळीस मिळाला.

महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकत्रित येत नाचू लागले. केवळ नाचू लागले नाही, तर नशा केल्यागत अंगातील शर्ट, टी-शर्ट फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. काहींचे शर्ट थेट वीजतारांवर लटकले, तर काहींनी आपल्या कथित मैत्रिणींना खांद्यावर घेत उच्छाद मांडला. इथेच नाही, तर अन्य रस्त्यांवरही उघडे-नागडे दुचाकी फिरवणारे तरुण टोळक्याने दिसत होते.

हे दृश्‍य इतके अश्‍लील आणि बीभत्स होते, की या तरुणांना त्यांचीही शुद्ध राहिली नव्हती. विशेष म्हणजे इव्हेंट सुरू झाल्यापासून पोलिस तैनात असूनही ‘बुरा न मानो’, म्हणून ते बोलायला तयार नव्हते. अखेरीस तरुणाईची नकारात्मक शक्ती अनियंत्रित झाली आणि पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा, सर्वसामान्यांचे हाल या दृश्याने रंगोत्सवाला चौकातील उत्सवाचा ‘बेरंग’ झाला.

अशा मोठ्या इव्हेंटने तरुणाईची दिशा भरकटत असेल, तर संस्थांनाही अशाप्रकारचे इव्हेंट घेण्याची हौस टाळावी लागेल. जळगाव जिल्ह्यातील साहित्याच्या गौरवशाली स्मृतींचा साक्षीदार असलेला काव्यरत्नावली चौक बदनाम होऊ नये, ही काळजी ‘युवा’शक्तीने आणि या शक्तीला दिशा देणाऱ्या सर्वांनीच घ्यायला हवी, हे मात्र खरे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: कारंजा लाड येथे २३.६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त,दोघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT