Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held on Friday. Neighborhood Commissioner Vidya Gaikwad, Deputy Mayor Kulbhushan Patil, Municipal Secretary Sunil Gorane.
Mayor Jayashree Mahajan speaking at the General Assembly held on Friday. Neighborhood Commissioner Vidya Gaikwad, Deputy Mayor Kulbhushan Patil, Municipal Secretary Sunil Gorane. esakal
जळगाव

तुम्ही घ्या पगार अन् आम्ही खातो शिव्या ! महासभेत सुस्त प्रशासना वर नगरसेवकांची आग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आम्ही मंत्रिमहोदयांना विनंती करून निधी मंजूर करून आणतो, जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी तासन् तास बसतो, तुम्ही मात्र कामाचे कार्यादेश होऊनही काम करीत नाहीत. त्यामुळे निधी परत जाण्याची वेळ येते, तुम्ही केवळ पगार घेण्यासाठीच येतात काय? जनतेची कामे होत नसल्यामुळे ते आम्हाला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहतात.

तुमचे करायचे तर काय, असा संतप्त सवाल उपस्थित करीत नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत प्रशासनावर आगपाखड करत अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली. ‘चुकीला माफी नाही’ असे सांगत आयुक्त विद्या गायकवाड यांनी कारवाईचे आश्‍वासन देत पावसाळा संपला, आता तातडीने कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही देत वातावरण शांत केले.

महापालिकेची महासभा शुक्रवारी (ता. ७) सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झाली. महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसचिव सुनील गोराणे व्यासपीठावर होते.(Municipal Corporation General Assembly corporators asked questions administration Jalgaon News)

नगरसेवक बरडे कडाडले

नगरसेवक नितीन बरडे यांनी विकासकामांची दिरंगाई आणि निधी परत जाण्याबाबत सभागृहात आवाज उठविला. ते म्हणाले, की शहराच्या विकासकामांसाठी ६८ कोटी रुपयांचा निधी आला. त्यातील निधीच्या कामाचे आपल्या प्रभागात कार्यादेश झाले; परंतु तब्बल सोळा महिने झाले त्याचे काम सुरू झाले नाही. आज तो निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे याला आता जबाबदार कोण? निधी परत गेल्यास या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पैसे कापून काम करून घेणार काय, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण अधिकाऱ्यांवर विलंब कायद्यानुसार कारवाईचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक बंटी जोशींचे आसूड

नगरसेवक बंटी ऊर्फ अनंत जोशी यांनी तर अधिकाऱ्यावर थेट आसूडच ओढले. ते म्हणाले, की आम्ही निधी मंजूर करून आणायचा, तीन-तीन तास बसून जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासाठी फिरायचे, तुम्ही अधिकारी मात्र त्या निधीचे कामही करीत नाही, तुम्ही करता काय? पगार घेता तरी कशाचा? वॉर्डात कामे झाले नाहीत, तरी लोक आम्हाला नको ते बोलतात. तुम्ही साधे मक्तेदाराकडून कामे करून घेत नाहीत, हे योग्य नाही. कामचुकारावर कारवाई झालीच पाहिजे.

नगसेवक त्रिपाठींनी दिला दणका

नगरसेवकाच्या प्रश्‍नाला अधिकारी उत्तर देत असताना पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बांधकाम विभागाला पत्र दिल्याचे सांगत होते, तर बांधकाम विभागाचे अधिकारी तिसऱ्या विभागाकडे बोट दाखवीत होते, त्या वेळी भाजपचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी उपहासात्मक स्वरूपात टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘वा..रे..व्वा... काय अधिकारी आहेत! यांचा कामाचा समन्वयही नाही. एकदुसऱ्याकडे बोट दाखवून नामानिराळे होताहेत मग काम करणार तरी कोण? यांच्या या वागण्यामुळे शहरातील जनतेची कामे होत नाहीत. आम्हाला जनतेची बोलणी खावी लागत आहेत. याचा बंदोबस्त झालाच पाहिजे.’’

कैलास सोनवणेंचा कारवाईचा बडगा

भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की अधिकारी कामचुकारपणा करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे.

Incumbent and opposition accusing each other.

सभागृहात नगरसेवक संतप्त

अधिकाऱ्यांच्या या कामचुकारपणावर सभागृहातील सर्वच नगरसेवक संतप्त होत त्यांनी कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, नगरसेवक प्रशांत नाईक, इब्राहिम पटेल, नगरसेविका गायत्री शिंदे, नगरसेविका सरिता नेरकर, ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे यांच्यासह सर्वच नगरसेवक संतप्त झाले आणि सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. नगरसेवक अनंत जोशी यांनी, आयुक्तांनी यावर आपले मत व्यक्त करावे, असे मत मांडले.

महापौर, उपमहापौरही संतप्त

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटीलही संतप्त झाले. शहरातील समस्यांमुळे नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे सभागृहाच्या भावनाही तीव्र आहेत. प्रशासनाने त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत व संबंधितांवर, कामचुकार लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कामे वेगाने करणार : आयुक्त

आयुक्त विद्या गायकवाड यांनी उत्तर देताना ‘चुकीला माफी नाही,’ असे म्हणत जो अधिकारी व कर्मचारी चुकला असेल त्याच्यावर कारवाई होईलच, असे स्पष्ट करून वातावरण शांत केले. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, की आपण चूक झालेल्यांवर कारवाई करणारच आहोत. मात्र दुसरीकडे आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. पूर्वी दोन लाख लोकसंख्येसाठी ४० अभियंते होते. आज सहा लाख लोकसंख्येसाठी केवळ २० अभियंते आहेत. एकेकाकडे पाच ते सहा विभागांचा कारभार आहे, हेही आपण पाहिले पाहिजे. आपण शासनाकडे कर्मचारी भरतीचा आकृतिबंध पाठविला आहे, त्याला मंजुरी मिळून आपण भरतीची प्रतीक्षा करीत आहोत. आता पावसाळा संपला आहे, शहरातील सर्व भागातील कामांचे सर्वेक्षण करून रस्त्याचे काम वेगाने करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

An angry Bunty Joshi while asking the authorities for answers in the Mahasabha.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT