खारेपाटण (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण चेकपोस्ट परिसरात आज सकाळी अकराच्या सुमारास मधमाश्यांनी चाकरमान्यांवर हल्ला केला. यात सात जण जागीच बेशुद्ध पडले; तर एकूण 24 जण जखमी झाले. या सर्वांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तिघांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमध्ये सात चिमुकल्यांचाही समावेश आहे.
खारेपाटण चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची तपासणी तसेच प्रत्येक व्यक्तीची नोंद केली जात आहे. त्यामुळे चेकपोस्ट, लगतचा खारेपाटण पूल आणि परिसरात एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. आज दुपारी अकराच्या सुमारास खारेपाटण पुलावर अवजड वाहन आल्यानंतर पुलाच्या आठव्या कमानीखाली असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याला हादरा बसल्याचे स्थानिकांतून सांगण्यात आले. यानंतर चौफेर उधळलेल्या मधमाश्यांनी त्या परिसरातील नागरिकांवर हल्ला केला. यात चेकपोस्टवर असलेल्या चाकरमान्यांसह पोलिस, महसूल कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अनेक चाकरमान्यांनी मधमाश्यांपासून वाचण्यासाठी नदीपात्रात डुबकी घेतली. तरीही त्यांना मधमाश्यांचा डंख बसला.
घटनेनंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी धावपळ करून गवत पेटविले आणि त्या परिसरातून मधमाश्यांना पिटाळून लावले. या दरम्यान डंख बसल्याने सात चाकरमाने बेशुद्ध पडले; तर 17 जण जखमी झाले होते. या सर्वांना चेकनाक्यावरील दोन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक अशा तीन रुग्णवाहिकांतून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे या सर्व जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, डॉ. पूजा ताडे, डॉ. इंगवले आदींनी उपचार केले. तीन प्रवाशांना अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
जखमींमध्ये सात चिमुकले
मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये सचिन शांताराम देसाई (वय 42), श्यामल सचिन देसाई (39), श्रेया देसाई (7, सर्व रा. पनवेल), दीपक यशवंत भिंगारे (39), सीमा दीपक भिंगारे (35), आर्या दीपक भिंगारे (8), शीतल दीपक भिंगारे (4), विद्या विठ्ठल लाड (49), नारायण सर्जेराव देशमुख (42), जितेश चंद्रकांत माळकर (25), मानसी सखाराम घाडीगावकर (10), योगिता घाडीगावकर (3), मैत्री घाडीगावकर (5), प्रवीण सखाराम घाडीगावकर (34), प्रिया प्रवीण घाडीगावकर (32), ईश्वरी प्रवीण घाडीगावकर (8), अरुण अंकुश गुरव (30), दत्तात्रय नारायण गुरव (42), सागर सदानंद कांडर (30), सारिका सागर कांडर (26), विघ्नेश विठ्ठल लाड (21), तुषार विठ्ठल लाड (23) यांचा समावेश आहे.
खारेपाटण चेकपोस्टवर प्रचंड ताण
मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्याने शेकडो चाकरमान्यांनी सिंधुदुर्गकडे धाव घेतली आहे. त्यामुळे खारेपाटण चेकपोस्टवर प्रचंड ताण आला. एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. चेकपोस्टवर प्रत्येक प्रवाशाची नोंद आणि आरोग्य तपासणीही केली जाते. याखेरीज परराज्यांत पायी जाणारे मजूरही मोठ्या संख्येने थांबलेले आहेत.
माणुसकीचे दर्शन
मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची स्थानिकांनी सोशल डिस्टन्स ठेवत विचारपूस केली. काहीही मदत लागल्यास सहकार्य करण्याचीही ग्वाही दिली. दरम्यान, आज मधमाश्यांच्या हल्ल्यानंतरच्या मदतकार्यात सरपंच रमाकांत राऊत, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. खंडागळे, पोलिस नाईक नितीन बनसोडे, पोलिस सुशांत हिर्लेकर, वाहतूक पोलिस तांबे, हवालदार रावराणे, साबळे, पोकळे, रवींद्र बाईत, तलाठी रमाकांत डगरे, ग्रामविकास अधिकारी वेंगुर्लेकर यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.