नाराज गटाचे पदाधिकारी निव्वळ प्रदेशाध्यक्षांच्या प्रेमापोटी तेथे आले होते.
रत्नागिरी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केलेले नियोजन आणि धावपळ फुकाचा खटाटोपच ठरला. मोर्चासाठी जमलेल्या जेमतेम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतही गट-तट दिसून आले. जिल्हाध्यक्ष अविनाश लाड (Avinash Lad) यांच्या गटाने रमेश कीर गटाला या प्रक्रियेतून बाजूला केल्याचे स्पष्ट दिसत होते. नाराज गटाचे पदाधिकारी निव्वळ प्रदेशाध्यक्षांच्या प्रेमापोटी तेथे आले होते. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांनीही एवढ्या गर्दीतून त्यांची विचारपूस केली. रत्नागिरी शहराध्यक्षपदावरून झालेल्या राजकाणाबाबत त्यांना सांगितले. तेव्हा पटोले यांनी नाराज गटाला तुम्ही घाबरू नका, मी आहे, लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे आश्वासन दिले.
राज्यातील महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामुळे आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य नसतानाही जिल्ह्यात काँग्रेसला महत्त्व आले आहे. त्यात जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी पक्षाची मरगळ झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी गट-तट केल्याने जिल्ह्यात काँग्रेस (Congress) वाढलीच नाही, अशी परिस्थिती आहे. लाड हे भेदभाव न करता पक्षाची चांगली बांधणी करतील, अशी अपेक्षा सर्वांची आहे. मात्र, पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती तयार करण्यात येणार होत्या. मात्र, जिल्हाध्यक्षांची परवानगी न घेता तत्कालीन शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांनी समित्या नेमल्या.
पक्षाच्या बैठकीत जेव्हा हा विषय पुढे आला, तेव्हा याबाबत जिल्हाध्यक्षांना अवगत करणे आवश्यक असल्याचे जिल्हाध्यक्ष लाड म्हणाले. तेव्हा ओघाओघात राहून गेले, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे चव्हाण यांनी सांगितले. कोणतीही पूर्वसूचना न देता पक्षाकडून नवीन समिती स्थापन करण्यात आली. चव्हाण यांना तडकाफडकी पदावरून बाजूला करून पक्षाचा सदस्यही नसणाऱ्या एका व्यक्तीची नियुक्ती केली. या सर्व राजकारणामुळे रमेश कीर गटातील राकेश चव्हाण, बाळा मयेकर, काझी, उपळेकर आदींच्या गटाला निर्णय प्रक्रियेतून बाजूला करण्यात आले. मात्र, ते काँग्रेसचे निष्ठावान असल्याने आजच्या कार्यक्रमात सामील होते. हे गटातटाचे राजकारण पक्षवाढीला अडथळा ठरणारे असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
कार्यकर्त्यांच्या गराड्यातही ओळखले
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यात पक्षातील दोन गटांमधील मतभेद स्पष्ट दिसत होते. नाराज गटाने प्रदेशाध्यक्ष पटोले आल्यावर त्यांचे स्वागत केले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यातही प्रदेशाध्यक्षांनी चव्हाण आणि बाळा मयेकर यांची आवर्जून विचारपूस केली. तेव्हा चव्हाण यांनी शहराध्यक्षपदावरून झालेल्या राजकारणाचा पाढा वाचला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.