Rare Indian skimmer bird found at Shiroda Beach
Rare Indian skimmer bird found at Shiroda Beach esakal
कोकण

Sindhudurg : थंडीची चाहूल लागताच कोकणात देशी-विदेशी पक्ष्यांचं आगमन; शिरोड्यात आढळला दुर्मिळ 'पाणचिरा'

नीलेश मोरजकर

हिवाळी वातावरण सुरू झाल्याने व थंडीची चाहूल लागताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक देशी, विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे.

बांदा : अतिशय दुर्मिळ व धोक्यात आलेली प्रजाती म्हणून संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या ‘इंडियन स्कीमर’ (Indian Skimmer Bird) म्हणजेच ‘पाणचिरा’ या पक्ष्याचे शिरोडा समुद्रकिनारी (Shiroda Sea) दर्शन झाल्याने सिंधुदुर्गची किनारपट्टी ही दुर्मिळ जैवविविधतेसाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.

येथील पक्षी निरीक्षक प्रवीण सातोसकर यांनी या पक्ष्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. महाराष्ट्रात या पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही ही पहिलीच नोंद आहे. अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

हिवाळी वातावरण सुरू झाल्याने व थंडीची चाहूल लागताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक देशी, विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणथळ पक्ष्यांचा समावेश आहे. फ्लोमिंगो, उचाट्या, हळदीकुंकू बदक, वारकरी बदक, थापट्या बदक, सीगल, पाणटिवळा, तुतारी टिळवा, चिखल्या या पक्ष्यांच्या विविध प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यावर दिसत आहेत.

अशातच अतिशय दुर्मिळ अशा ‘पाणचिरा’ या हिवाळी स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिरोडा समुद्रकिनारी झाल्याने पक्षी निरीक्षक व अभ्यासक यांच्यासाठी ही आनंदाची व आश्चर्यची बाब ठरली आहे. ‘पाणचिरा’ या पक्ष्याच्या वीण वसाहती प्रामुख्याने मध्य प्रदेशातील चंबल नदीचे खोरे आणि ओडिशामध्ये आहेत. अगदी तमिळनाडूमधूनही त्यांच्या नोंदी असल्या तरी, त्या एक किंवा दोन पक्ष्यांचा आहेत.

त्यामुळे या पक्ष्याच्या हिवाळी स्थलांतराचा विस्तार मोठा असला तरी, संख्येने एक दोन पक्षी स्थलांतरित झालेले दिसतात. त्यामुळे त्यांच्या क्वचितच नोंदी होतात. मुंबईनजीकच्या उरण येथील पाणजे पाणथळ क्षेत्रामध्ये दोन ‘पाणचिरा’ पक्षी दिसल्याच्या नोंदी आहेत. पालघरच्या किनाऱ्यावरून देखील या पक्ष्याच्या नोंदी असून, नाशिकमधील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, अमरावती आणि यवतमाळ येथील पाणथळ प्रदेशातही हा पक्षी दिसल्याच्या मोजक्याच नोंदी या महाराष्ट्र राज्यातील आहेत.

पाणचिरा या दुर्मिळ पक्ष्याचे प्रजनन स्थळ बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्यात वनखात्याला काही महिन्यांपूर्वी आढळले होते. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने ‘धोक्यात आलेली प्रजाती’ ठरवलेल्या पाणचिरा प्रजातीचे सात पक्षी या अभयारण्यात आढळले होते. त्यांच्यावर वनखात्याने बारकाईने लक्ष ठेवले होते.

‘पाणचिरा’विषयी

‘पाणचिरा’ पक्षी चंबल नदी आणि ओडिशामधील काही भागात वाळूच्या बेटांवर आपली घरटी तयार करतात. साधारण फेब्रुवारीपासून ते या वीण वसाहतीमधील ठिकाणी परतायला सुरुवात करतात. ओडिशामध्ये एप्रिलमध्ये त्यांची वीण आढळते. ऑगस्टमध्ये ते वीण वसाहती सोडून हिवाळी स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. चंबल येथे टॅग करण्यात आलेले ‘पाणचिरा’ पक्षी हे गुजरातचा किनारा, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील गंगेच्या खोऱ्यात आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी आढळून आले आहेत.

जल प्रदूषण आणि वाळू उपसा हे त्यांच्या वीण वसाहतीला असलेले धोके आहेत. यामुळे त्यांची संख्या घटली असून ‘आययूसीएन’च्या लाल यादीत त्याला ‘संकटग्रस्त’ श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. पाणचिरा हा दुर्मिळ पक्षी भारतासह बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि व्हिएतनाम येथे आढळतो. आययूसीएन रेडलिस्टनुसार, जैवविविधतेचा जैवनिदर्शक असलेल्या या प्रजातीचे अवघे दोन हजार ४५० ते दोन हजार ९०० पक्षी शिल्लक आहेत. भारतात काही मोजक्याच ठिकाणी याआधी पाणचिराचे अस्तित्व आढळले आहे. या पक्ष्याचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.

शिरोडा किनाऱ्यावर मी नेहमीप्रमाणे पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो. त्याठिकाणी हा ‘पाणचिरा’ कुरव पक्ष्यांच्या थव्यामध्ये वावरताना आढळला. छायाचित्र टिपल्यानंतर या पक्ष्याची ओळख पटली. सध्या हिवाळी हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यांवर अनेक स्थलांतरित पाणपक्षी दाखल झाले आहेत. अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा यामध्ये समावेश असल्याने पक्षी निरीक्षकांना अभ्यास करण्यासाठी हा हंगाम योग्य आहे.

-प्रवीण सोतासकर, पक्षी निरीक्षक व अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT