Konkan Tourism
Konkan Tourism esakal
कोकण

Konkan Tourism : कोकणात पर्यटनाचा खजिना; रोजगार-व्यवसायाला मोठ्या संधी

सकाळ डिजिटल टीम

कोकणात अनेक गडकिल्ले आहेत. त्यात अगदी प्रबळ गडासारखा वनदुर्ग पण आहे आणि मुरूड जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पूर्णगड, जयगड, सिंधुदुर्गसारखे समुद्री किल्लेसुद्धा आहेत.

-राजीव लिमये कर्ले, रत्नागिरी Rajeev.limaye१९५७@gmail.com

वारसा पर्यटन यशस्वी करण्यासाठी कोकणाकडे वारसा पर्यटनाविषयक (Konkan Tourism) मोठा खजिना असून, त्यातील विविध पैलूंचा वापर करण्यासाठी मोठी संधी आहे. वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या मूर्त आणि अमूर्त संकल्पना किंवा गोष्टी. अलीकडेच कोकणात, अश्मयुगीन मानवाने मांडलेला एक मोठा पट, कातळखोद चित्रांच्या रूपाने जगासमोर आला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg) सड्यावर, जांभ्या दगडाच्या पठारावर ११० गावांमध्ये १५० ठिकाणी २ हजारांहून अधिक एकशिंगी गेंडा, हत्ती, हरीण वर्गातील प्राणी, मनुष्याकृती, अनेक भौमितिक आकृत्या असलेली चित्र आढळून आली आहेत. यातीलच ९ साइटस् आता जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत नोंदवल्या गेल्या आहेत. या माहितीचा संधीचा वापर व्यावसायिकदृष्टीने केला गेला पाहिजे.

रत्नागिरीजवळच्या उक्षी गावातील तत्कालीन सरपंचांनी गावातील कातळशिल्प (Katal Shilp) सुरक्षित केल्यावर त्या ठिकाणी आता पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत आहेत. कोकणाबाहेरील व्यावासायिकांनी अशा संधींचा लाभ उठवण्याआधी, कातळशिल्पे असलेल्या जमीनमालकांनी, तेथील तरुणांनी केवळ गाईड बनण्यासाठी नव्हे तर पर्यटन उद्योजक होण्यासाठी रत्नागिरीमधील राधाकृष्ण थिएटर समोरच्या कातळशिल्पसंशोधन केंद्राला त्वरित भेट द्यायलाच हवी. माहिती घेऊन केवळ आनंद किंवा अभिमान न बाळगता आपल्या नजीकच्या वारसास्थळांचा उपयोग आपल्या गावात, आपल्याच जागेत पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी कसा करता येईल याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. याबरोबरच असा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी व्यावहारिक विचारही हवा हे नक्की!

उदाहरणच घायचे तर कान्हेरी लेण्या, एलिफंटा लेणी, रायगड जिल्ह्यातील कुडा, रत्नागिरीमधील पन्हाळेकाजी, खेडच्या लेण्या, लांजातील कातळ गांव सोबतच सिंधुदुर्गात असलेलं विमलेश्वर ही वारसा पर्यटनाचीच उदाहरणे आहेत. राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी जांभा दगडातील एकाश्म मंदिरेसुद्धा समोर येत आहेत. लेण्यांबरोबरच अनेक काळ्या पाषाणात विविध राजवटीत बांधलेली कसबा संगमेश्वर कुणकेश्वर, कशेळीचे कनकादित्य मंदिर ही ठळक मंदिरे समोर येतात. उतरत्या छपराची जवळपास १ हजार छोटी-मोठी मंदिरे पर्यटकांना आवडू शकतात. या मंदिरातील लाकडावरील सुंदर अशी शिल्पे आहेत. याची माहिती देण्यासाठीचे हेरिटेज वॉक अनेक ठिकाणी लोकप्रिय होत आहेत.

शहरातून येणारे पर्यटक चोखंदळ असतातच शिवाय त्यांना अशा प्रकारच्या मूलभूत अचूक माहितीविषयी कुतूहल असते म्हणून मंदिरांचे वेगळेपण त्यातील इतिहास समजून घेण्यासाठी आशुतोष बापट, प्र. के. घाणेकर यांची तसेच इतर लेखकांचीही या विषयीची पुस्तके जरूर अभ्यासावी. कोकणाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाविषयी सखोल अभ्यास असणारे चिपळूणचे प्रकाश देशपांडे सांगतात त्याप्रमाणे अभ्यासू पर्यटकांसाठी लोकमान्यांच्या जन्म्स्थळ, राणी लक्ष्मीबाईचे मूळ गाव, सानेगुरूजींचे जन्मस्थान, कवी केशवसुतांचे जन्मस्थान अशा अनेक पवित्र स्थळांची मोठी जंत्रीच उपलब्ध आहे.

कोकणात अनेक गडकिल्ले आहेत. त्यात अगदी प्रबळ गडासारखा वनदुर्ग पण आहे आणि मुरूड जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पूर्णगड, जयगड, सिंधुदुर्गसारखे समुद्री किल्लेसुद्धा आहेत. स्थापत्यासोबतच कोकणाला कलेची, लोककलेचीसुद्धा एक वेगळी जाण आहे. त्यात दशावतार, नमन खेळे, जाखडी नृत्य हेही येतात. अशा कलावंतांना त्यांच्या कौशल्याचे व्यावसायिक सादरीकरण करण्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रवृत्त करायला हवे जेणेकरून पर्यटकांना रात्री अशा कला सशुल्क सादर करता येईल. राजस्थान, केरळ, आसामसारख्या भागात पर्यटकांसाठी अशा लोककलांचेच थिएटर शो करून व्यावसायिकरित्या सादरीकरण केले जाते.

आर्थिकदृष्ट्या पर्यटन व्यवसायात यश मिळवायचे तर प्रकल्प तयार करणाऱ्या जाणकार अनुभवी मंडळींचा सल्ला जरूर घ्यावा. पर्यटन व्यवसायासाठीचे भांडवलाची अडचण सोडवण्यासाठी मध्यवर्ती सहकारी बॅंकेसारख्या विविध स्थानिक पातळीवरील संस्था आहेतच. याचा अर्थ लगेच मोठी गुंतवणूक करून मोठे रिसॉर्ट काढावे, असे आजिबात नव्हे तर माफक गुंतवणूक करून आपल्या राहत्या घरातही पर्यटकांना आवश्यक सुविधा निर्माण करून होमस्टेसारख्या घरगुती व्यवस्था अशा वारसास्थळांचे आधाराने उभ्या करता येतील.

ग्रामीण पातळीवर पर्यटक आल्यावर अतिथींच्या स्वागतासाठी लागणारी एक साखळी व्यवस्था ग्रामीण पातळीवर उभी करणे गरजेचे असून त्यासाठी सहकार्याची वृती बाणवली पाहिजे. गेल्या काही वर्षात यासाठी विविध संस्था, अनेक अभ्यासक काम करताना दिसतात. अगदी ग्रामपंचायतींनीसुद्धा त्यांचे कार्यक्षेत्रातील अशा वास्तू, मंदिरे, शिल्पे यांचे ठिकाणी माहितीपूर्ण फलक लावणे, गावाच्या प्रवेशद्वाराजवळ दिशादर्शक फलक लावून गावाचे ब्रॅन्डिंग करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित असून यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

पर्यटनक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था, शासकीय संस्था काही ठिकाणी हेरिटेज महोत्सव भरवत असल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये वारसास्थळांचे जतन करण्याबद्दल जागृतता वाढत असून पर्यटकांमध्येही उत्सुकता निर्माण होत आहे. येणारा भविष्यकाळ हा कोकणातल्या वारसा पर्यटनासाठी उपयुक्त ठरायचा असेल तर ग्रामीण भागातील तरुणांनी वारसा पर्यटनक्षेत्रातील संधींचा अभ्यास करून पर्यटनक्षेत्रात आपले आगळे स्थान मिळवावे.

(लेखासाठी पुरातत्त्व संशोधक ऋत्विज आपटे यांचे सहकार्य लाभले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT