Ratnagiri News
Ratnagiri Newsesakal

Ratnagiri News : आमचं आयुष्य नशिबाच्या दानाशी बांधलेलं

एकदा या अर्कट मंडळींना एका मुंबईकराने डोंबिवलीत सोंगट्या खेळायला बोलावले.
Summary

नशिबाने हवालदारसुद्धा मूळ कोकणातलेच होते त्यामुळे ते सुद्धा हसतहसत पोहे चहा घेऊन ‘आवाज जरा कमी ठेवा,’ सांगून गेले.

-राजा बर्वे, चिपळूण

गणपती, होळी आणि दिवाळी अशा सणांना काही मुंबईकर (Mumbai) मंडळी गावात अवतरली की, मग रोज रात्री जागरणे होत. यात रमी, मेंढीकोट, झब्बू असा पत्त्यांचा सोवळा डाव तर कधी ५ पैसे पॉईंट किंवा तीनपत्ती असे व्यसनी डावसुद्धा बसत. ज्यामुळे महाभारत (Mahabharata) घडले तो द्युत म्हणजे सोंगट्यांचा डावदेखील बसे. पहाटे २/३ पर्यंत हा जलसा रंगत जाई. रोज काहीतरी चमचमीत खाणेदेखील असे.

जोडीला सतत संभाजी विडी, कधी पिवळा हत्ती, कधी तंबाखू किंवा गांजाची चिलीम. बैठक उठली की, आजूबाजूला विड्या, सिगरेट, चिलीमतली राख याचा सगळीकडे सडा पसरलेला असे. यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी आमच्यासारखे स्वयंसेवक असत. त्यांना खाणेपिणे, चहा देणे अशी कामे करत असताना हा सगळा माहोल जगणे, ही आमच्यासाठी एक मोठी पर्वणीच असे.

Ratnagiri News
लहान मुलांच्या 'या' बाबी कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडवायला ठरतात कारणीभूत!

मी जिथे गेली ४० वर्षे राहतो ते एक छोटेसे, पण शहरानजीकचे खेडेगाव. पूर्वीची खोती असल्याने जमीनजुमला, शेतीचे उत्पन्न, दुधदुभते आणि या जोडीला इथे राहून आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये भिक्षुकी करणारी अनेक मंडळी इथे राहणारी. यात कुणी खोत, कुणी भिक्षुक, कुणी मिलिटरी रिटायर्ड फौजी, तुकारामी व्यापार करणारे किरकोळ दुकानदार तर कुणी प्राथमिक, माध्यमिक शिक्षकसुद्धा. सुधारणांचे वारे कोकणात न घुसलेला हा काळ सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वीचा.

Ratnagiri News
Hornbill Birds : धनेशाच आयुष्य एकदम रंगतदार अन् रोमँटिक

त्या काळी मोरूअप्पा, रंगूतात्या, नानाभाऊ, सावळ्याखोत, रत्नाकरकाका, माधवदादा, जयाभाऊ, रघुनाथ विजयकाका, सदाभाऊ, बाबा सोमण, सोमण गुरुजी असे एकापेक्षा एक इरसाल या बैठकीला हटकून येत. खेळताना एकमेकांची टिंगलटवाळी सुरूच असे. आबाला बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला. त्याच दरम्याने चिपळूणला सर्कस आली होती. "आब्या, इतकी वर्षे ढोपरे झिजवलीस, आता मेहनत फळाला आलीय तर सर्कशीतला हत्ती आणून साखर तरी वाट गावात हो", अशी शेलकी मुक्ताफळे इथेच अशा मैफलीत हमखास ऐकू येत. सोंगट्यांचा डाव बसला की, मग तर बघायलाच नको.

लाल रंगाच्या कापडाचा तो अधिकच्या आकाराचा पट, हिरव्या, लाल पिवळ्या रंगाने रंगवलेल्या लाकडी सोंगट्या आणि हस्तिदंती दोन फासे. दोन पार्ट्यांचा तो खेळ मग सुरू होई. प्रत्यक्ष चाली खेळणारे कमी आणि दान पडले की दोन बाजूने आरडाओरडा करणारेच जास्त. या खेळातली तीन काणे, पंचमी, षष्ठी, पाच दोन, पाच तीन, छत्तीन, दशमी, पो बारा, कच्चे बारा, वाकडे तेरा अशी अगम्य दानांची नावे घेत जो गलका आणि आरडाओरडा होई तो ऐकणे ही एक पर्वणी असे.

Ratnagiri News
मन हरवलेली सुमन : उद्या पोरीनं काही बरं-वाईट करून घेतलं, तर गळ्याशी फास कोणाच्या लागे?

एकदा या अर्कट मंडळींना एका मुंबईकराने डोंबिवलीत सोंगट्या खेळायला बोलावले. त्या मुंबईकराचा फ्लॅट भरचौकात, पहिल्या मजल्यावर. रात्री खेळ बसला आणि रंगायला लागला तसा आरडाओरडा सुरू झाला. काही शेजारी नापसंती आणि त्रासिक चेहरा करून डोकावून गेले; पण हे अर्कट तसेच. रात्री एकच्या सुमारास बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आणि मागोमाग कुणीतरी दार ठोठावले. उघडून बघतात तो दारात दोन पोलिस उभे. एकाने दरडावून विचारले, ‘काय भानगड काय? आणि आरडाओरडा कसला चाललाय?’.

लगेच बाबा सोमण पुढे सरसावून बंडीत हात घालत, ‘ या, या, तुमचा हो काय दोष? हुकुमाचे ताबेदार तुम्ही.. गडबड वाटली की येणारच चौकशीस. आता आलेच आहात तर बसा आणि झकास चाच पोहे आणि फक्कड चहा घेऊन जा हो’.... ‘ आणि असली तसली काही भानगड नाही हो, उगाच अंमळ दोन सोंगट्यांचे डाव टाकतोय आणि सोंगट्या म्हटलं की, तोंडात चूळ भरून का कोणी बसणार सांगा बघू? अहो, महाभारतातल्या शकुनीमामाने नुसती आरोळी ठोकली की, फासेसुद्धा कापत असतं हो’.. ‘आणि खरं सांगू का, आम्ही कोकणातले लोक, कायमच आमचं आयुष्य हे असं.

Ratnagiri News
Konkan Business : बदलत्या बाजारपेठांकडे हवे वेळीच लक्ष्य, कशी घ्याल काळजी?

नशिबाच्या दानाशी बांधलेलं. नशिबाचे फासे नीट पडणं कठीणच, मग अशी घटकाभर दंगल झाली की, आयुष्यात जरा चुकीची पडलेली दाने विसरतो हो आणिक काय हो दुसरं? बाबा सोमणांचा आवाज शेवटी शेवटी घोगरा होत गेला. नशिबाने हवालदारसुद्धा मूळ कोकणातलेच होते त्यामुळे ते सुद्धा हसतहसत पोहे चहा घेऊन ‘आवाज जरा कमी ठेवा,’ सांगून गेले. अशी ही माणसे कायम आयुष्याशी दोन हात करत जगलेली..अनुकूल दान पडेल या वेड्या आशेवर जगत आलेली..त्यात भल्या बुऱ्या अनुभवाचा अर्क स्वतःत जिरवत, मुरवत आणि पचवत स्वतःच एक अर्क बनून राहिलेली.

(लेखक कोकणवर मनस्वी प्रेम करणारा व कोकण टिपणारा आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com