Belgaum
Belgaum esakal
महाराष्ट्र

Belgaum : वैद्यकीय कचऱ्याने शहराचे आरोग्य धोक्यात

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात रुग्णालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दररोज वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. वैद्यकीय कचरा विघटनासाठी जुने बेळगाव येथे कचरा निर्मूलन प्रकल्प सुरू होता. मात्र, तेथील नागरिकांच्या विरोधामुळे तो बंद केल्याने गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत वैद्यकीय कचरा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

मात्र, याबाबत महापालिका किंवा आरोग्य प्रशासन कोणत्याही प्रकारची कठोर भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. कचरा कोठेही आणि कसाही अस्ताव्यस्तरीत्या फेकला जात असल्याने आरोग्य समस्या वाढण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यालाही बाधा येत आहे. महापालिकेने अनेक ठिकाणी वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जागेचा शोध घेतला. मात्र, नागरिकांकडून सर्वच ठिकाणी प्रकल्पाला विरोध होत आहे. प्रकल्प वेळीच सुरू न झाल्यास नागरिकांबरोबरच शहराचे आरोग्यही धोक्यात येण्याची वेळ आली आहे.

- मिलिंद देसाई

जुने बेळगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय कचरा प्रकल्प सुरू होता. मात्र, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने हा प्रकल्प बंद करण्याची मागणी तेथील रहिवाशांनी सातत्याने केली होती. मात्र, प्रकल्प सुरूच ठेवल्याने महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर जुने बेळगाव येथील प्रकल्प बंद केला होता. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी प्रकल्प सुरू झालेला नाही. त्यामुळे शहरातील वैद्यकीय कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. जुने बेळगाव येथील प्रकल्प बंद झाल्यानंतर विविध ठिकाणी नवीन प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सुरू करू देणार नाही, असा इशारा दिल्याने सध्या वैद्यकीय कचरा हुबळी येथे पाठविला जात आहे. मात्र, आठवड्यातून दोनवेळाच कचरा उचल होते. त्यामुळे अनेक रुग्णालयांतील वैद्यकीय कचरा जागा मिळेल त्या ठिकाणी टाकण्याचे प्रयत्न वाढले आहे.

सावगाव रोड, यरमाळ रोड, जुना धारवाड रोड, सांबरा रोड आदी भागातील वैद्यकीय कचरा रस्त्याशेजारी टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी कचरा नाल्यांशेजारी टाकला जात असल्याने तो शिवारातही पसरत आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे याची दखल घेत वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे. अनेकदा वैद्यकीय कचरा जाळला जातो, त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. महापालिकेकडूनही वैद्यकीय कचऱ्याची उचल होत नसल्याचे अनेक ठिकाणी कचरा साचून राहिला आहे.

कणगलातील प्रकल्प होणे गरजेचे

हुक्केरी तालुक्यातील कणगला गावाजवळ वैद्यकीय कचरा प्रकल्प सुरू करण्याची योजना हाती घेण्यात येणार आहे. तसेच याबाबतचे कंत्राटही दिले आहे. मात्र, अद्याप प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत वैद्यकीय कचरा प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याकडे लक्ष दिले तरच वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई हवी

शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्याबरोबर शहरात निर्माण होणारा वैद्यकीय कचरा कोठे जाळावा, हा प्रश्न काही महिन्यांपासून उपस्थित झाला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. नागरिकांच्या विरोधानंतर जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प बंद केल्याने शहरातील वैद्यकीय कचरा सौंदत्तीजवळील हरगुप किंवा हुबळी येथील वैद्यकीय कचरा प्रकल्पाकडे पाठवावा लागत आहे. मात्र, हा कचरा वेळेत नेला जात नसल्याच्या तक्रारी अनेक रुग्णालयांच्या आहेत.

या सर्व गोष्टींकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जुने बेळगावजवळील नाक्यापासून ते हलगा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर आणि धामणे रोड, सावगाव रोड यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला जातो. त्यामुळे महापालिका प्रशासन व आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तेथील वैद्यकीय कचरा तत्काळ हटवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्याकडेला पडलेल्या या कचऱ्यामध्ये इंजेक्शन, औषधांची पाकिटे, सलाईन्स, औषधाच्या बाटल्या आदींचा समावेश आहे. हा कचरा कोण टाकते, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. वैद्यकीय कचरा आरोग्यासाठी धोकादायक असल्याने याठिकाणी ‘मॉर्निंग वॉक’ला तसेच सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वैद्यकीय कचऱ्यामुळे त्यांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रकल्पाबाबत महापालिकेची अनास्था

जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर आयएमएचच्या माध्यमातून वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनेकदा जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयानेही वैद्यकीय कचरा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना महापालिकेला केली आहे. त्यामुळे जागा उपलब्ध करून दिली असती तर प्रकल्प सुरू करण्यास मदत झाली असती. मात्र त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यातून महापालिकेची अनास्था दिसून येत आहे. वैद्यकीय कचऱ्याचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी आयएमएच्या माध्यमातून नेहमीच सूचना केल्या जातात. तसेच वैद्यकीय कचरा प्रकल्प लवकर सुरू झाल्यास सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.

दृष्टिक्षेपात

शहरातील दररोजचा वैद्यकीय कचरा : ८०० किलोहून अधिक

शहरातील लहान-मोठे दवाखाने : १३००

आयएमएचचे सभासद ः ८००

क्षमतेपेक्षा अधिक वैद्यकीय कचरा जाळला जात असल्याने जुने बेळगाव येथील प्रकल्प बंद

दर दोन दिवसांतून एकदा वैद्यकीय कचऱ्याची उचल

केएलई व जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प कार्यरत

जागेअभावी कचरा निर्मूलन प्रकल्पाचे काम रखडले

प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयएमएचतर्फे केलेल्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे

वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जागा लवकर मंजूर करावी

वैद्यकीय कचरा अधिक दिवस साचून राहणार नाही, त्यासाठी उपाययोजना कराव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT