roshan kude
sakal
Organ Trafficking Racket in India :सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकणाऱ्या रोशन कुडे प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच इतर दोन राज्यांतील पाच युवक कुडे यांच्यासोबत कंबोडियात गेले होते. मात्र महाराष्ट्रातील नाशिक येथील एक युवक कोलकाता विमानतळावरून पळून आला. किडनी विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील डॉ. कृष्णा आणि इतर दोघांच्या अटकेसाठी पोलिस पथक येत्या चोवीस तासांत रवाना होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी ब्रह्मपुरी येथील एका सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी पंधरा हजार रुपये ३१ मार्च २०२१ रोजी त्यांनी सावकाराला परत केले. मात्र उर्वरित ८५ हजार रुपयांची जमवाजमव झाली नाही. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी मुदतवाढ मागितली. कर्ज चुकविण्यासाठी कुडे यांनी वेगवेगळ्या सावकारांकडून व्याजाने मोठी रक्कम उचलली. आतापर्यंत त्यांनी तब्बल ४८ लाख ५३ हजार रुपये सावकारांना परत केले आहेत. अखेर कर्ज चुकविण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. फेसबुकवरील ‘किडनी डोनर कम्युनिटी’शी कुडे संपर्कात आले. त्यानंतर उर्वरित कर्ज फेडण्यासाठी ते कंबोडियाला गेले आणि किडनी विकली.
कंबोडियातील नोम पेन्ह शहरात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी कुडे यांच्यावर किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापूर्वी डॉ. कृष्णा यांच्या माध्यमातून कुडे यांच्यासोबत पाच युवक कंबोडियाला जाण्यासाठी कोलकाता विमानतळावर पोहोचले होते. तेथे त्यांची डॉ. कृष्णा यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथील एका युवकाचाही समावेश होता.या सर्वांना डॉ. कृष्णा यांनी विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरवर प्रत्येकी तीनशे डॉलर दिले. ते हातात पडताच नाशिकच्या युवकाचे मन बदलले आणि त्याने विमानतळावरून पळ काढला. उर्वरित युवकांची किडनी कंबोडियात काढण्यात आली.
दरम्यान, कुडे गावात परतल्यानंतर डॉ. कृष्णा व्हॉट्सॲपवर त्यांच्या संपर्कात होते. कुडे यांनी स्वतःच्या भावालाही किडनी विकण्यास प्रवृत्त केले होते. मात्र ऐनवेळी त्याने नकार दिल्याने पुढील अनर्थ टळला.शस्त्रक्रियेनंतर आठ लाख रुपये कुडे यांच्या पत्नीच्या खात्यात देशातील वेगवेगळ्या चार बँक खात्यांतून वळते करण्यात आले. कुडे यांच्या मोबाईलचा सीडीआर अहवाल पोलिसांच्या हाती आला असून त्यातून रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी दोन जणांची ओळख पटली आहे. काही छायाचित्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. डॉ. कृष्णा हाती लागल्यानंतर या किडनी तस्करीच्या रॅकेटचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, हे स्पष्ट होणार आहे.
तर उद्या प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू कुडे यांच्या मिंथूर येथे जाऊन भेट घेणार आहेत. दरम्यान, फरार आरोपी मनीष पुरुषोत्तम घाटबांधे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.दुसरीकडे, पोलिसांच्या चौकशीत लक्ष्मण उरकुडे यांची एक डायरी सापडली असून त्यात कुडे यांच्याकडून घेणे असलेली तसेच आलेल्या रकमेची नोंद आहे. या प्रकरणातील काही आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. प्रदीप बाळबुधे यांच्यावर हुंडाबळी आणि अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. किशोर बानकुळे यांच्यावरही गुन्ह्याची नोंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.