Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit Pawar  esakal
महाराष्ट्र

Satara : राष्ट्रवादीनं गाफीलपणा सोडायला हवा, चूक दुरुस्त करण्याची वेळ आता पवारांची!

राजेश सोळस्कर

आगामी काळात तरी आमचं दुखणं दादा समजून घेतील किंवा पवार साहेब त्‍याकडे दादांना लक्ष वेधायला भाग पाडतील, असं या कार्यकर्त्यांना वाटतं.

माझ्‍यासाठी माझा सर्वसामान्‍य कार्यकर्ता महत्त्‍वाचा. नेते काय... ते तर मी आजही शंभर घडवू शकतो. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्‍यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची ६३ वर्षांची राजकीय कारकीर्द समजून घेण्‍यासाठी हे एकच वाक्‍य पुरेसे आहे आणि याच कार्यकर्त्यांनी अगदी हट्टाला पेटून श्री. पवार यांना आपला राजीनाम्‍याचा निर्णय मागे घेण्‍यास भाग पाडले, हे साऱ्या देशाने पाहिले.

आजवर शरद पवारांना जसं महाराष्‍ट्राने (Maharashtra) नितांत प्रेम दिलं, तसंच ते सातारकरांनीही दिलं. खरेतर सातारा जिल्ह्याचं आणि पवारांचं एक वेगळं नातं आहे. पवारांसाठी हा जिल्‍हा नेहमीच हळवा राहिलेला आहे. म्‍हणूनच सत्ता असो अथवा नसो, जेव्‍हा कधी पवार सातारा जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर येतात, तेव्‍हा तेव्‍हा लोकांचं मोहोळ त्‍यांच्‍याभोवती असतं. हे या जिल्ह्याने अनेकदा अनुभवले आहे.

पावसातल्‍या सभेनेच पवारांच्‍या राष्‍ट्रवादीला पुन्‍हा सत्तेत नेलं

सातारा (Satara) जिल्‍ह्याने यशवंतरावांनंतर शरद पवार यांनाच असं भरभरून प्रेम दिलं. पवारांच्‍या राजकारणाला बळकटी देण्याचं काम या मातीनेच केलं. साताऱ्याच्या याच मातीत भरपावसात पवारांनी जनतेला आणि जनतेने पवारांना आपल्‍या प्रेमात न्‍हाऊ घातलं होतं. सातारकरांच्‍या प्रेमापोटीच पवार भरपावसात सभेला सामोरे गेले होते. चराचर ओथंबणं म्‍हणजे काय, हे त्‍या दिवशी साऱ्या महाराष्‍ट्राने पाहिले होते आणि एका रात्रीत सत्तेने कूस बदलली होती. इतिहास रचला गेला होता. पावसातल्‍या या सभेनेच पवारांच्‍या राष्‍ट्रवादीला पुन्‍हा सत्तेत नेलं होतं. ही ‘भीजकथा’ साताऱ्याच्या मातीत घडली होती, हा या तपशीलातील महत्त्‍वाचा भाग. सातारा जिल्‍हा पवारांसाठी किती हळवा होऊ शकतो, हे पटवून देणारा.

उदयनराजेंसारख्‍या बलाढ्य उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले

पावसातल्‍या याच सभेत पवारांनी इथल्‍या जनतेला ‘मी केलेली चूक तुम्‍ही दुरुस्‍त करा,’ असं जाहीर आवाहन केलं होतं. ‘सातारा जिल्हा शब्‍दाला पक्का,’ हे त्‍या भाषणातले पवारांचे शब्‍द होते. पवारांच्‍या या‍ प्रत्‍येक शब्‍दाला पक्की राहिलेल्‍या जनतेने पवारांचे हे आवाहनही उचलून धरलं आणि ‘ती’ लोकसभेची पोटनिवडणूक राष्‍ट्रवादी काँग्रेसला मोठा विजय मिळवून गेली. भाजपने दिलेल्‍या उदयनराजे भोसलेंसारख्‍या बलाढ्य उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागलेच; पण पुढे विधानसभेच्‍या निवडणुकीतही भाजपला या सभेचा मोठा फटका बसला, हे कोणीही नाकारणार नाही.

चुकांमुळं जिल्ह्यांत पक्ष अधोगतीकडं निघाला आहे

पवारांच्‍याच सांगण्‍यावरून त्‍यांनीच केलेली ती कथित चूक जनतेने दुरुस्‍त केली. पक्षाला त्‍याचा राजकीय लाभही झाला; पण त्‍यानंतरच्‍या चार वर्षांत पक्षाने केलेल्‍या असंख्‍य चुका कुणी दुरुस्‍त करायच्या, असा सवाल आता राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या जिल्‍ह्यातल्‍या जवळपास सर्वच मतदारसंघांतील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची खदखद आहे. या काळात पक्षाच्‍या नेत्‍यांनी केलेल्‍या चुकांमुळे जिल्ह्यात पक्ष अधोगतीकडे निघाला आहे, असं या कार्यकर्त्यांना वाटतं. नेत्‍यांनी केलेल्‍या या चुका आता पवारसाहेबांनीच दुरुस्‍त कराव्‍यात, अशी अपेक्षा हे कार्यकर्ते बाळगून आहेत.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्ह्यातला एकूण प्रवास जरी पाहिला, तरी कार्यकर्त्यांचं म्‍हणणं आणि दुखणं किती रास्‍त आहे, हे लक्षात येतं. पक्ष स्‍थापनेवेळी म्‍हणजे १९९९ मध्‍ये राष्‍ट्रवादीला या जिल्‍ह्याने नऊ आमदार आणि दोन खासदार एवढं प्रचंड बळ दिलं होतं. आज २०२३ चा विचार करायचा झाल्‍यास या जिल्‍ह्यात पक्षाकडे फक्‍त एक खासदार आणि तीन ‘इलेक्‍टेड’ आमदार एवढंच बळं उरलं आहे. अगदी मतदारसंघनिहाय विचार केला, तरी एकेकाळचा राष्‍ट्रवादीचा हा बालेकिल्‍ला आता किती खिळखिळा झाला आहे, याची प्रचिती येते.

शशिकांत शिंदे यांचा पराभव का झाला?

१९९९ पासून पवारांच्‍या विचारावर चालणाऱ्या कोरेगाव मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव का झाला? त्‍यांच्‍या पराभवासाठी घरातल्‍याच शक्‍ती कार्यरत होत्‍या का? या प्रश्‍‍नांची उत्‍तरे पवारांनी शोधली पाहिजेत, असे तिथल्या निष्‍ठावंत कार्यकर्त्यांना वाटतं. एस काँग्रेसच्या काळापासून पवारनिष्‍ठ असलेल्‍या पाटण मतदारसंघात पूर्वी स्‍वत: पवार यांचा सातत्‍याने संपर्क असायचा. मधल्‍या काळात पक्षातल्‍या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील किती राज्यस्तरीय किंवा स्‍थानिक नेत्यांनी तरी पाटणमध्‍ये दौरे करून पाटणकरांना ताकद देण्‍याचा प्रयत्‍न केला? खटाव मतदारसंघात प्रभाकर घार्गे यांना पक्षविचारापासून फारकत घ्‍यावी, असं का वाटू लागतं? माणमध्‍ये पाय घट्‍ट रोवण्‍यासाठी भाजपने तेथे जिल्‍हाध्‍यक्ष पद दिलं.

सत्ताकाळात भाजप आमदारांना भरभरून निधी

राष्‍ट्रवादीतील किती आणि कोणत्‍या नेत्‍यांनी प्रभाकर देशमुखांना पाठबळ देण्‍यासाठी कार्यक्रम राबवले? कऱ्हाड बाजार समितीसाठी कॅबिनेट मंत्रिपद भूषविलेल्या पक्षाच्‍या कऱ्हाड उत्तरच्‍या आमदारांना भाजप नेत्‍याशी साटंलोटं का करावं लागतं? विलासराव पाटील वाठारकरांच्‍या पश्‍‍चात कऱ्हाड दक्षिणमध्‍ये राष्‍ट्रवादीचं पुनरुज्जीवन करावं, असं पक्षाला कधीच का वाटलं नाही? कऱ्हाड दक्षिणसाठी पक्षाचं काही धोरण आहे का नाही? पक्षाच्‍या दृष्टीने याहीपेक्षा गंभीर बाब अशी, की साताऱ्यासारख्‍या जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयाच्‍या शहरात नाव घ्‍यावा, असा नेता राष्‍ट्रवादीकडे नाही. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्‍ये गेल्‍यानंतर सातारा-जावळी मतदारसंघात भक्‍कम पर्याय उभा करावा, असंही राष्‍ट्रवादीला वाटलं नाही. उलट महाविकास आघाडीच्‍या सत्ताकाळात भाजप आमदारांना भरभरून निधी दिला गेला.

चुका पवार साहेबांनी दुरुस्‍त कराव्‍यात

विरोधी आमदाराला निधी देणं हा गुन्‍हा नक्‍कीच नाही; पण निष्‍ठावंत दीपक पवारांनी अशा काळात कुणाच्‍या जिवावर पक्ष तोलून धरायचा? नाही म्हणायला अलीकडच्या काळात तिथे अमित कदमांचा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला; पण ते उशिराचं शहाणपणच म्हणावं लागेल. गेली अडीच वर्षे पक्षाने जावळीसाठी काय केले? फलटण आणि वाईमध्ये मात्र पक्षाची स्थिती चांगली दिसते. मात्र, ती कायम राहण्यासाठी गाफीलपणा सोडावा लागणार आहे. ही झाली मतदारसंघांतील स्‍थिती; पण पक्ष संघटनेच्‍या पातळीवरही उजेडच आहे. जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीनंतर पक्षाच्‍या जिल्‍हाध्‍यक्षांनी कोणते ‘पक्षकार्य’ केले, हे त्‍यांना कधी कोण विचारणार आहे, की नाही? हे सर्व राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांना पडलेले प्रश्‍‍न म्‍हणजे त्‍यांच्‍या मनातील खदखद आहे. राज्‍यस्‍तरावरच्या नेत्‍यांनी केलेल्‍या चुका आहेत, असं कार्यकर्त्यांचं प्रांजळ मत असून, या चुका पवार साहेबांनी दुरुस्‍त कराव्‍यात. इथंही भाकरी फिरवावी, असं त्‍यांना वाटतं.

कार्यकर्त्यांचं खच्‍चीकरण होतं, हे दादा लक्षात का घेत नाहीत

खरेतर, शरद पवार यांच्‍या पाठोपाठ सातारा जिल्‍ह्यात सर्वाधिक संपर्क असलेला राष्‍ट्रवादीचा नेता अजित पवार हेच आहेत. अजित पवारांनी जिल्‍ह्यात आपला दबदबाही ठेवलेला आहे आणि कार्यकर्त्यांनाही त्‍यांच्‍याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत; पण ‘सत्ता येईपर्यंत माझा पक्ष महत्त्‍वाचा... सत्ता आली, की विकासकामांच्‍या निधी वाटपात मी विरोधकांनाही समान पातळीवर ठेवणार,’ ही त्यांची भूमिका चुकीची नसली, तरी त्‍यामुळे आपल्‍याच कार्यकर्त्यांचं खच्‍चीकरण होतं, हे दादा लक्षात का घेत नाहीत, असा प्रश्‍‍न कार्यकर्त्यांना पडतो.

..तरी आमचं दुखणं दादा समजून घेतील

त्‍यामुळे आगामी काळात तरी आमचं दुखणं दादा समजून घेतील किंवा पवार साहेब त्‍याकडे दादांना लक्ष वेधायला भाग पाडतील, असं या कार्यकर्त्यांना वाटतं. तात्‍पर्य काय, तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पुन्‍हा एकदा जिल्‍ह्यात पक्षाला प्रवाही करावं लागेल. त्‍यासाठी मधल्‍या काळात तयार झालेला कचरा काठावर फेकावा लागेल. शरद पवार आणि अजित पवार यांच्‍या आजच्‍या एकत्रित दौऱ्यात त्‍यासाठी काही प्रयत्‍न केले गेले, तरच हा दौरा कार्यकर्त्यांच्या दृष्‍टीने सफळ संपूर्ण झाला, असं म्‍हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT