Actor kiran Mane latest Post
Actor kiran Mane latest Post Google
मनोरंजन

'तन ,मन,धन शिवसेना; बाकी विचारधारा गेल्या खड्ड्यात'; किरण माने पोस्ट चर्चेत

प्रणाली मोरे

सध्या राज्याच्या राजकारणात(Politics) मोठी उलाढाल सुरु आहे. उद्या काय घडणार आहे याचा काहीच अंदाज लागत नसतानाही अनेक स्तरावरुन व्यक्त होणारी मतं मात्र सामान्य जनतेला विचारांच्या खाईत ढकलून देतायत. मनोरंजन क्षेत्रात असूनही नेहमीच सामाजिक,राजकीय विषयांवर टोकदार भूमिका घेत आपलं मत मांडणाऱ्या किरण मानेंनी(Actor Kiran Mane) सध्याच्या राजकीय वादळावर विस्तृतपणे एक पोस्ट केलीय जिच्यात त्यांनी सर्वपक्षांच्या तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवलं आहे. काय म्हणालेयत किरण माने? चला जाणून घेऊया सविस्तर....

किरण माने यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे,वेगवेगळ्या पक्षाचे तळागाळातले निष्ठावान 'पक्ष कार्यकर्ते' ही लै इंटरेस्टिंग गोष्ट असते राव. माझं लै बारकाईनं केलेलं निरीक्षण सांगतो यांचं...

सामान्य तळागाळातले शिवसैनिक हे निष्ठावान असतात. कट्टर. त्यांचं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना संघटनेवर नितांत प्रेम आहे. सेनाप्रमुखांनी 'मराठी माणूस' हा मुद्दा घेऊ द्यात किंवा 'हिंदूत्वा'चा मुद्दा घेऊद्यात ते ठामपणे पाठीशी उभे असतात. त्यांना माहिती असतं, ही विचारधारा वगैरे नाही, हा संघटना टिकवण्यासाठी घेतलेला 'स्टॅंड' आहे हा. उद्या सेनाप्रमुखांनी प्रबोधनकार ठाकरेंचं पुरोगामीत्व पांघरलं तरी शिवसैनिक म्हणतील, 'बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी सेनाप्रमुख म्हणतील ती पूर्व दिशा.' ते बाळासाहेबांच्या 'शिवसेना' या संघटनेपुढे कशाचीही पर्वा करत नाहीत. तन शिवसेना, मन शिवसेना, धन शिवसेना. बाकी सगळ्या विचारधारा गेल्या खड्ड्यात.

भाजपाच्या कार्यकर्त्यांचं याउलट आहे. मी पक्ष कार्यकर्त्यांविषयी बोलतोय, संघस्वयंसेवक हा वेगळा प्रकार आहे. संघस्वयंसेवक हे पक्षकार्यकर्त्यांना 'ड्राईव्ह' करतात. संघस्वयंसेवकांनी या पक्ष कार्यकर्त्यांच्या मनामेंदूवर ठामपणे कोरलेलं असतं की "हिंदू धर्म धोक्यात आहे. आपला पक्ष धर्मरक्षणाचं महान कार्य करतोय." तो कार्यकर्ता बिचारा हिंदू धर्मावरील प्रेमापोटी मनापासून पक्षकार्याला वाहून घेतो. महागाई, बेरोजगारीनं त्रासलो तरी सहन करेन पण धर्माचं रक्षण करेन या भावनेनं पक्षाशी निष्ठा ठेवतो. कधीकधी एखाद्या पहाटे त्याला संशय येतो की आपल्या पक्षाचं नक्की चाललंय काय? पण त्याच्यावर बिंबवलं जातं 'धर्मरक्षणासाठी चाललंय हे.' मग तो बिचारा मुकाटपणे पक्षाचं काम करतो. पक्षाने ज्या माणसाला आयात करून उमेदवारी दिलीय तो मूळ पुरोगामी विचारधारेचा- अगदी काॅंग्रेस पक्षाचा असो, त्याचा वापर करून आपल्याला हिंदू धर्माचं रक्षण करायचंय, ही भाबडी आशा असते बिचार्‍याला. तो झटून तळमळून त्याचा प्रचार करतो. पण मी एक जवळून पाहिलंय, जे सगळ्या पक्षांनी शिकण्यासारखं आहे. इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मानानं भाजपाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांवर पक्षाचं जास्त लक्ष असतं. जातीनं लक्ष देऊन त्याच्या उदरनिर्वाहाची सोय केली जाते. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यासारखं नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता विरळाच.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या दोन्हीपलीकडं. 'साहेब' हा धर्म, साहेब ही जात, साहेब हाच मान, साहेब हाच अभिमान ! विषय कट. साहेब जो निर्णय घेतील तो पूर्ण विचारांती घेतला असणार याची मनापासून खात्री असते त्यांना. थोडं शिवसैनिकांसारखंच आहे हे, पण यात सूक्ष्म फरक आहे. शिवसैनिकांचं 'शिवसेना' या संघटनेवर प्रेम आहे. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं साहेबांवर. उद्या त्यांनी वेगळा पक्ष काढला किंवा पक्षाचं नांव बदललं तरी हे कार्यकर्ते साहेबांसोबत असतील. साहेबांची पुरोगामी विचारसरणी या कार्यकर्त्यांना आकर्षित करून घेते. वाचन, साहित्य कला क्रिडा क्षेत्रात मुशाफिरी, अनुभव, मुत्सद्दीपणा, राजकारणावरची पकड, वयाची पर्वा न करता अथक परीश्रम करणं या सगळ्या गोष्टींमुळे कार्यकर्त्यांच्या मनामेंदूवर साहेबांची असलेली जादू कणाकणाने वाढतच रहाते. साहेबांपुढे त्यांना देशातले सगळे नेते आणि देशातली सगळी महत्त्वाची पदं छाटछूट वाटतात. पक्षांतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांवर बर्‍याचदा अन्याय होतो, दुर्लक्ष केलं जातं, तरीही हे कार्यकर्ते फक्त साहेबांकडे पाहून अतिशय निष्ठेनं काम करतात.

सगळ्यात 'ओरीजीनल', संयमी आणि संवेदनशील कार्यकर्ते हे काॅंग्रेसचे ! भारतातल्या ९७% नागरीकांच्या रक्तात मूळ काॅंग्रेसी विचारसरणी आहे. नंतर त्यांच्यावर वेगवेगळे संस्कार होत ते वेगवेगळ्या पक्षाचे निष्ठावान झाले. पण यश मिळो अथवा अपयश, कितीही निराशा येवो. नि:स्वार्थीपणे आपली मूळ विचारधारा घट्ट धरून राहीलेले कुठले कार्यकर्ते असतील तर ते काॅंग्रेसचे. गांवाकडची घरं, वाडे आधी एकत्र कुटूंबव्यवस्थेत गजबजलेले असतात... नंतर हळूहळू बांधाला बांध लागत फाटाफूट होऊन वेगवेगळ्या चुली मांडल्या जातात... पण एक भाऊ मात्र गरीबीत रहातो, पण जुनं घर आणि आईवडीलांना सोडत नाही. तसा काॅंग्रेसचा कार्यकर्ता आहे !

या पक्षांविषयी माझे प्रेमद्वेष असतील पण सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते मात्र मला लै आवडतात. अगदी मनापासून पक्षकार्य करत असतात. राजकीय उलथापालथ झाली की मी लै लै लै बारकाईनं निरीक्षण करतो या सर्वांचं ! यांना होणार्‍या वेदना पाहून कधी खूप वाईट वाटतं, कधी यांचा आनंद पाहून आपल्याच चेहर्‍यावर हसू येतं !! मोठ्या पक्षांत एखादं वादळ झालं की इतर छोट्याछोट्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला जे उधाण येतं ते पाहून तर लै हसतो मी. कुणी त्यांना वेड्यात काढतं, कुणी सतरंजीउचल्या म्हणतं, कुणी शैणिक म्हणतं तर कुणी भक्त म्हणतं...पण ते न खचता पक्षकार्य करत रहातात.

मी एक सिनेमा लिहीतोय.. पोलीटिकल सटायर आहे. तो लिहीत असताना, त्यातल्या एका कार्यकर्त्यांच्या कॅरॅक्टरविषयी विचार करत होतो. त्यावेळी वरील सर्व पक्षांत माझे जवळचे मित्र कार्यकर्ते आहेत ते आठवले आणि ही पोस्ट तयार झाली. सगळ्या कार्यकर्त्यांसाठी लब्यू ❤️

- किरण माने.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : लखनौची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT