Valli_Marathi Movie review
Valli_Marathi Movie review 
मनोरंजन

PIFF : वल्ली : मुखवट्यांचं गाव अन् ग्लोरिफिकेशन मोडून काढणारा भाव

Amit Ujagare (अमित उजागरे)

गाव या संकल्पनेला आपल्याकडं कायमच ग्लोरिफाय केलं गेलं आहे. त्या तुलनेत शहराची सर्वांनाच भुरळ असली तरी अनेक समस्यांनी ग्रस्त ठिकाण म्हणून हिणवण्यातही आलं आहे. सामाजिक स्तरावरील या दोन्हींमधल्या फरकाचा कधी आपण सांगोपांग विचार करत नाही. पण 'वल्ली' हा मराठी सिनेमा आपल्याला तसा विचार करायला भाग पाडतो.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात पिफमध्ये या सिनेमाचं नुकतंच स्क्रिनिंग झालं. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये याचा प्रिमियर झाला होता. यामध्ये वल्लीच्या प्रमुख पुरुष आणि स्त्री कलाकारांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचं नामांकनही होतं. अजंता-एलोरा फेस्टिवलमध्येही याचं कौतुक झालंय.

असो 'वल्ली' सिनेमा एका व्यक्तीचं जगण आपल्याला सांगतो. स्त्री रुपातील 'वल्ली'चं पुरुष पात्र शब्दशः समाजाचे रितीरिवाज मोडून सर्वकाही झुगारुन देणारा या अर्थानंही आपल्या समोर येतं. 'वल्ली' हा सिनेमातील एक जोगत्या आहे. अपरिहार्यतेतून त्याला यल्लमाच्या सेवेसाठी सोडलं गेलंय. जोगतीनीसारखं साडी नेसून जगणं या पुरुषाच्या वाटेला आलं आहे. देवीच्या दरबारात असताना लोक त्याच्यापुढं लोटांगण घालतील, पण तोच जेव्हा आपल्या मूळ पुरुषी रुपात असेल तेव्हा त्याचा आत्मसन्मान ओरबाडतील. (Marathi Tajya Batmya)

गावकुसाबाहेर एकट्यानं जीवन जगणाऱ्या वल्लीच्या नशिबी देवत्व बहाल होणं हेच मुळात माणुसकी मारणारं आहे, हे खूपच भेदक पद्धतीनं सिनेमातून दिग्दर्शक मनोज शिंदे यांनी मांडलं आहे. देवा गाडेकरनं 'वल्ली' साकारताना भूमिकेतला प्रामाणिकपणा जपलाय, त्यामुळं ते काम कमाल झालं आहे.

मराठवाड्यातील जालन्यात चित्रित झालेला हा सिनेमा गावातील भयाण समाजवास्तव तुमच्या समोर मांडतो. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणं गावाचं कायमच ज्यासाठी कौतुक केलं जातं ते इथलं हवा-पाणी, खाणं-पिणं हे वरवर अगदीच ताजं-तवाणं वाटतं असलं तरी इथला जातीभेद, लिंगभेद अनं सामाजिक रुढी परंपरांचा कोंडमारा हा जीवघेणा अन् माणसातला आत्मसन्मान संपवणारा आहे. (Latest Marathi News)

आपल्यातील पुरुषार्थ दाखवण्याची संधी न मिळालेला 'वल्ली' हा एक पुरुष. पुरुषातील अनेक छटा तो आपल्यासमोर मांडतो. तो देवीचा भक्त आहे, स्त्री वेश करुन पोटासाठी गावात जागर करत फिरणारा वल्लीमामा आहे, आपल्या समकालीन तरुणांकडूनच छेडछाड सहन करणारा निरागस व्यक्ती आहे, नव्वदीत जन्मलेला तिशी-पस्तीशीतला एक असा तरुण आहे जो सुनील शेट्टी, संजय दत्त यांना आयकॉन मानतो. त्यांच्यासारखी पिळदार शरीरयष्टी कमावून अवहेलनेचं जीणं झुगारुन द्यायची तो केविलवाणी धडपड करतोय. यासाठी गावातल्या गोठावजा तालमीतला सुरुवातीचा सिन तुमच्या डोक्यातलं विचारक्र सुरु करतो. (Entertainment News in Marathi)

देवीच्या डोंगरावरचा आणखी एक सिन आपला मेंदू खाडकन उघडतो. आयुष्यभर देवीचा जागर केलेला एक म्हातारा जोगता, जो आता अंथरुणाला खिळला आहे. त्याच्या मदतीला ना देवी ना समाज...फक्त वल्लीच! गावातली एक बाई आपल्या शाळकरी मुलाला इथं देवीच्या सेवेसाठी घेऊन येते, पण इथं वल्ली तिला जे काही सांगतो, त्याचं गांभीर्य कळायला हवं. "देवीचं अन् मुलाचं खरंच काही कनेक्शन असेल तर त्यानं कसं जगायचं हे देवी बघून घेईन, पण त्याच भविष्य आता केवळ देवीच्या चरणीच आहे, हे ठरवण्याचा अधिकार ना मला, ना तुम्हाला" यातून आपण ओढवून घेतलेलं नशीब इतरांच्या वाटेला नको ही वल्लीच्या मनातली भावना गदगदू टाकते.

दुसरीकडं पळून गेलेली आई अन् मृत्यू पावलेला दारुडा बाप यांच्याशिवाय जगणाऱ्या एकट्या ताराशी वल्लीचं समदुःखीपणाचं घट्ट नातं आहे. त्यामुळं तिच्याशी आपलेपणानं, प्रेमाणं वागणारा एक पुरुष, अन् शेवटी गावगुंडांशी दोन हात करणारा अँग्री यंग मॅन आणि एक बंडखोर तरुण अशा वल्लीतल्या अनेक पुरुषी छटा आपल्याला दिसतात. एकटी स्त्री म्हणून जगणं जितकं कठीण आहे, त्याहून काहीसं अधिक कठीण अन् भेदक जोगता म्हणून जगणाऱ्या पुरुषाचं असतं, हे वल्लीचं पात्र आपल्याला सांगतो. त्याचबरोबर गावातील सरंजामी सखा पाटील अनिल कांबळेंनी उत्तम साकारला आहे. एलिझाबेथ एकादशी, म्होरक्या, कस्तुरी सिनेमातील भूमिकांपेक्षा त्यांची वेगळी अशी ही खलनायकी भूमिका लक्षात राहते. वल्लीमधून पहिल्यांदाच अनिल कांबळेंना एक चांगली आव्हानात्मक भूमिका मिळाली आहे, या संधीचं त्यांनी सोनं केलं आहे. तसंच वर्षा माळवदकर हीनं ताराच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

सिनेमाच्या तांत्रिकबाबींवर बोलायचं झाल्यास पार्श्वसंगीत ठीकठाक असलं तरी जगणं मांडणारी पूर्ण लांबीची काही गाणी असायला हवी होती. तसेच सिनेमास्कोप तंत्रज्ञान न वापल्यानं प्रेक्षकांच्या नजरेला गावाकडच्या सिन्सचा परिणाम जाणवत नाही. सिनेमा मध्यांतरानंतर काहीसा रेंगाळतो. अनेकदा पुढचा सिन काय असेल याचा अंदाज प्रेक्षक लावत राहतात. तसं घडत तर नाहीच पण तिथं धक्कातंत्रही वापरलेलं नाही, उगाचच ते सिन लांबवल्यासारखं वाटतं.

उदाहरण सांगायचं झाल्यास बंडखोरीची भावना मनात उत्पन्न झाल्यानंतर वेगानं कथा पुढे नेत वल्ली आणि ताराचं पात्र गावातून बाहेर पडताना दाखवायला हरकत नव्हतं. त्यानंतर जास्तीत जास्त फोकस शहरातील जगण्यावर केंद्रीत करता आला असता. पण गावातील हे सिन इतके ताणलेत की काही काळ ते कंटाळवाणे वाटायला लगतात. त्यामुळं सिनेमाची लांबी उगाचच वाढून क्लायमॅक्स अगदीच सरधोपटपणे होतो. त्यात कुठलीही उत्कंठा नसल्यानं वल्लीचा अख्खा स्ट्रगल प्रेक्षक विसरुन जातात. खरंतर असे काही अपेक्षित बदल आणि कट्स सिनेमात दिसले असते तर नक्कीच सिनेमा स्टँडिंग ओवेशनही घेऊ शकला असता.

असो सिनेमाचा शेवट हा पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर या उच्चभ्रू भागात चित्रित झाला आहे. गावातील विषमता अन् अपमानाचं जीवन झुगारुन शहरातील एक खुलं आणि समतेच जीवन जगण्यासाठी वल्ली अन् तारा शहरात दाखल होतात. गावापेक्षा शहर नक्कीच तुमच्या कष्टाला किंमत देणारं आणि तुम्हाला समान पातळीवर वागवणारं असलं तरी इथं मेहनत कोणालाही चुकत नाही. वल्लीलाही हा नवा अनुभव मिळतो. जो पुढे नक्कीच त्याला समाधानाच जीवन देऊ शकतो. शहरातल्या एका वेगळ्या समाजाचंही दर्शन त्याला घडतं.

इथं एका जोगतीनीसोबत देवीचा जागर करणाऱ्या सोन्यानाण्यानं मढलेल्या तृतीयपंथ्यांचं जगणही त्याला आपल्यापेक्षा वेगळं वाटतं नाही. पण त्यातून सुटल्याचं समाधान अन् चहाच्या रुपानं त्याच्यामध्ये आलेली नवी आशेची तरतरी वल्लीच्या मनातली चलबिचल जाणवू लागते. शेवटी सिनेमागृहातून बाहेर पडताना सामाजिक स्तरावर 'गाव की शहर' या भावनांच्या कोलाहालात तुम्ही तरंगत राहता हाच या सिनेमाचा परिणाम आहे.

-- अमित उजागरे

amit.ujagare@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT