संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : अण्णा भाऊ साठे यांनी उपेक्षितांचे, वंचितांचे जगणे उत्तम, उत्कटपणे आपल्या साहित्यातून मांडले. जगविख्यात लेखकाने लिहावे, असे हे लेखन आहे. तरी त्यांची दखल इथल्या साहित्यिकांनी, समीक्षकांनी घेतली नाही. त्यामुळे मराठी साहित्याचा लिहिला गेलेला इतिहास हा शापित इतिहास आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी शनिवारी टीका केली.
अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्षे आहे. या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनजाणीवा' या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे, मोतीराम कटारे, डॉ. ईश्वर नंदापुरे, शाहू पाटोळे, डॉ. वृंदा कौजलगीकर हे अभ्यासक सहभागी झाले होते.
कांबळे म्हणाले, उपेक्षितांचे, वंचितांचे दुखणे, त्यांचे जगणे, त्यांची भूक, त्यांच्या वेदना, त्यांचे शोषण अण्णा भाऊंनी शाहिरीतून मांडली. कथेतूनही कामगारांचे जगणे मांडले. पोटाला-भुकेला जात-धर्म नसतो, हे सूत्र घेऊन ते लिहीत राहिले. हा या जातीचा, तो या जातीचा असे लिहिले नाही. वास्तवावर बोट ठेवले. पाटोळे म्हणाले, अण्णा भाऊ यांचे साहित्यिक वैश्विक आहे. ते कुठल्या कप्प्यात आपल्याला बसवता येणार नाही. जातीबाबतचा अभिनिवेष त्यांनी कुठेही मांडला नाही.
नंदापुरे म्हणाले, दुःख टिपत असताना जग सुंदर करायचे आहे, ही भूमिका घेऊन लेखक लिहितात. तीच भूमिका अण्णा भाऊ यांच्या साहित्यात आहे. शोषणाला जात नसते. जिथे शोषण आहे, तिथे ते व्यक्त झाले आहेत. ते मानवतावादी होते. कवठेकर म्हणाले, अण्णा भाऊंची उपेक्षा झाली का नाही, यापेक्षा आजही त्यांची दखल घ्यावी वाटते, त्यांच्यावर लिहावे वाटते, हे अधिक महत्त्वाचे आहे. माणुसकीवरील ठाम विश्वास, परिवर्तनशील माणूस, माणसापेक्षा समाज मोठा, माणसाचे स्वातंत्र्य या जाणिवांचे चित्रण त्यांच्या साहित्यात दिसते. या दृष्टीने त्यांचे साहित्य समजून घेतले गेले नाही.
कटारे यांनी वर्ण जाणिवा, कौजलगीकर यांनी स्त्री-जाणिवा यावर प्रकाशझोत टाकला. प्रशांत चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता गुंजाळ यांनी आभार मानले.
जात लेखकांच्या मनातही
जात नसते असे म्हंटले जाते. पण हे उभं सत्य आहे की समाजातच नव्हे लेखकांच्या मनातही जातींचा सुप्त डोह असतो. त्यात ते तरंगत असतात. हे उघड सत्य आहे. जात ही बॉम्बपेक्षाही फार भयानक बाब आहे, असे कांबळे यांनी सांगितले. हाच धागा पुढे नेत नंदापुरे म्हणाले, धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र असते त्यावेळी अशांतता पसरते. सध्या समाजात हेच चित्र पहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.