ठाणे : सोमवारपासून मंत्रालय, शासकीय कार्यालयांसोबतच खासगी कार्यालयही सुरु होणार आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असल्याने, एसटी महामंडळाने या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी 250 अतिरिक्त बसेसची सोय केली आहे. परंतू याविषयी लेखी सूचना आली नसल्याने शहरातील बसचालक खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही अशी सूचना देत आहेत. सोमवारीही बसमध्ये प्रवेश मिळाला नाही तर कार्यालय गाठायचे कसे? या चिंतेत खासगी कर्मचारी आहेत.
जून महिन्यापासूनच टाळेबंदीच्या नियमांत शिथिलता करण्यात आली आहे. सोमवारपासून मंत्रालय, शासकीय कार्यालयांसोबतच खासगी कार्यालयेही 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु करता येतील याची चाहूल लागताच कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक खासगी कर्मचाऱ्यांनी बसस्थानक कार्यालय गाठून तेथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली गेली. सुरुवातीला ई पास असेल तर वाहतूक करता येईल, परंतू बसची सुविधा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आहे. खासगी कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही असे एसटी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आता ई पासची आवश्यकता नाही अशी बातमी कानावर येताच चाकरमान्यांनी पून्हा एसटी कार्यालय गाठले. यावेळीही खासगी कर्मचाऱ्यांसाठी सुविधा नाही, आम्हाला तसे कोणतेही आदेश आलेले नाहीत असे एसटी कर्मचारी सांगत आहेत.
मंत्रालय व शासकीय कार्यालयांत 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केल्याने एसटी महामंडळाने या कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त 250 बसेस सोडण्याचे नियोजन केले. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनीही खासगी कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे शनिवारी सांगितले. एसटी महामंडळाने यामध्ये बदल करीत आता खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही आयडी दाखवून प्रवेश करण्याची मुभा दिली आहे. परंतू या सूचनेविषयी एसटी कर्मचारी, चालक वाहक यांच्यामध्ये संभ्रम आहे. यासोबतच ज्या कर्मचाऱ्यांकडे आयडी नाही त्यांनी प्रवास कसा करायचा हा वेगळाच प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहे.
अत्यावश्यक सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी अतिरिक्त 250 बसेस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे, गरज भासल्यास जादा बसेसची सोयही महामंडळाकडून करण्यात येईल. खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवून या बसमधून प्रवेश करण्याची मुभा आहे.
अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ.
मी गेले दोन दिवस एसटी स्थानक परिसरात बससाठी चौकशी करत आहे. मंत्रालयमार्गे बस जात आहेत. परंतू खासगी कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही, आम्हाला अद्याप जीआर आलेला नाही असे उत्तर एसटी कर्मचारी देत आहेत. कार्यालय सुरु करण्याआधी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची काय सुविधा आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. लोकलचा प्रवासच आम्हाला परवडणारा प्रवास आहे.
दिपाली देवकर, खासगी कर्मचारी.
खासगी कर्मचाऱ्यांना बसेसमधून प्रवास करण्यास परवानगी नाही असे मला एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. आता एसटी महामंडळाने आयडी दाखवून प्रवास करण्यास मुभा दिली आहे, परंतू माझ्याजवळ आयडी नाही. छोट्या छोट्या कार्यालयांत, कारखान्यांत करारपद्धतीवर कर्मचारी काम करतात. त्यांना कंपनीकडून ओळखपत्र मिळत नाही. अशा कर्मचाऱ्यांनी काय करायचे.
स्वप्निल गुजर, खासगी कर्मचारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.