मुंबई

शांततेत आणि नियमांच्या चौकटीत यंदाचा नवरात्रोत्सव; मंडळांचा भर सामाजिक उपक्रमांवर, गरबा रसिकांमध्ये नाराजी 

भाग्यश्री भुवड

मुंबई : गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीदरम्यानही मुंबईत जल्लोष पाहायला मिळतो. नवरात्रोत्सवही धूमधडाक्‍यात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनाची गडद छाया असल्याने नियमांच्या चौकटीत राहूनच नवरात्रीचा सण मुंबईकर अगदी शिस्तीने, नियमात राहून आणि आवाजाशिवाय साजरा करत आहेत. विविध मंडळांनी गरबा आणि दांडिया रास टाळून सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. 

शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाल्याने घरोघरी घटस्थापना करण्यात आली. कोरोना महामारीमुळे एकत्र जमून खेळणाऱ्या गरब्यावरही निर्बंध आल्याने तरुणांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. मात्र, अशी परिस्थिती यंदाच्याच वर्षी असल्याचे म्हणत मुंबईकरांचा उत्साह कायम दिसतो आहे. मुंबईमध्ये जवळपास 12 ते 13 हजार गणेशोत्सव मंडळे आहे. त्या तुलनेत नवरात्रोत्सव मंडळे 2 ते 3 हजार आहेत. त्यात 60 टक्के मंडळे फक्त गरबा खेळण्यासाठी देवीची छोटी मूर्ती आणतात आणि उत्सव साजरा करतात. दरम्यान, यंदा अनेक मंडळांनी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत मूर्तीची उंची 4 फुटांपर्यंत मर्यादित केली आहे. ज्यामुळे मूर्ती आणखी सुबक आणि सुंदर दिसत असल्याचे नवरात्री मंडळाचे म्हणणे आहे. 

मंदिरांतील नवरात्रोत्सव भक्तांच्या गर्दीविना 
मुंबईत ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाची धूम मुंबईकरांना अनुभवायला मिळते. मात्र, यंदा उत्सवाचे स्वरूप अत्यंत साधे आहे. राज्यातील मंदिरे अद्यापही खुली नसल्याने भाविकांना घरबसल्याच ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमांतून देवीचे दर्शन घ्यावे लागत आहे. शिवाय, मुंबईतील महालक्ष्मी, मुंबादेवी, जरीमरी आणि शितलादेवीसारख्या महत्त्वाच्या मंदिरांमध्ये दरवर्षी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. मात्र, यंदा तिथे नवरात्रोत्सव भक्तांच्या गर्दीविना साजरा केला जात आहे. 

कर्तृत्ववान महिलांचा ओटी भरून सत्कार 
मोठमोठ्या नवरात्री मंडळांकडूनही सुरक्षेची सर्व खबरादारी घेण्यात आली आहे. यंदा गर्दी टाळण्यासाठी सर्व आयोजकांनी गरब्याचे कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे गरबाप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, काही सोसायट्यांच्या आवारात नियमांचे पालन करीत गरबा रास रंगत आहे. अनेक मंडळांचा कल मूर्ती बसवून फक्त जनजागृती आणि समाजपयोगी कार्यक्रम करण्याकडे आहे. यंदा ध्वनिवर्धकही तुलनेने शांत आहेत. दरवर्षी देवीची ओटी वगैरे भरली जाते, पण यंदा त्यावरही मर्यादा आली आहे. यंदा नारीशक्तीच्या सन्मानाचे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची ओटी भरून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे, असे सात रस्त्याची माऊली मंडळाचे सचिव आशीष नरे यांनी सांगितले. 

कलाकारांचे नुकसान 
सध्याच्या परिस्थितीत गरबा शक्‍य नाही. यंदा वादक आणि कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे घर लग्नसमारंभ किंवा अशा गरबा आयोजनावर चालते. नवरात्रोत्सवात त्यांची जास्त कमाई होते. एरवी लग्न समारंभात 2500 रुपये मिळतात. मात्र गरब्यात 5 ते 10 हजारांची कमाई होते. मात्र लॉकडाऊनपासून कलाकार घरीच बसून आहेत, असे घाटकोपरच्या गुजराती दांडियाचे आयोजक जिग्नेश खिलानी यांनी सांगितले. 

उत्सवादरम्यान सामाजिक भान 
कोरोना काळात रक्त आणि प्लाझ्मादानासारखे उपक्रमही काही मंडळांतर्फे राबवले जात आहेत. काही मंडळांनी कोविड फंडासाठी पंतप्रधान कार्यालयात निधीही जमा केला आहे. गरिबांना अन्नदान वगैरे उपक्रम नवरात्रोत्सव मंडळांनी राबवले आहेत. अनेक मंडळांनी वर्गणीही घेतलेली नाही. डेंगी, मलेरिया, कोरोना आदींविषयीही जनजागृती केली जात आहे. 

हजारोंचा झेंडूही वाया 
कोरोना संसर्गाच्या भीतीने ग्राहकांनीही मुंबईच्या बाजारात पाठ फिरवली आहे. दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे शेतातील झेंडू भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन नवरात्रोत्सवातही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नसल्याने व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे. रविवारी हजारो किलो झेंडू दादरच्या फुलबाजाराबाहेरील रस्त्यावर फेकून देण्यात आला. पाऊस पडल्याने झेंडू ओला येत आहे. दादरच्या फूल बाजारात दरवर्षीप्रमाणे गर्दी झालेली नाही. सध्या 30 ते 40 रुपये किलोने झेंडू विकला जात आहे. माल फेकून दिला तरी शेतकऱ्यांना किलोमागे 10 ते 15 रुपये द्यावेच लागतात. यंदा मोठे नुकसान झाले, अशी कैफियत स्वर्गीय मीनाताई ठाकरे फूलमार्केटचे संचालक अविराज पवार यांनी मांडली. 
------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT