Pankaj Tripathi success journey
Pankaj Tripathi success journey  sakal
साप्ताहिक

Pankaj Tripathi Interview: '...अजून मोठी इनिंग खेळायची आहे!'

संतोष भिंगार्डे

संतोष भिंगार्डे

‘आता हिंदी चित्रपटांना अच्छे दिन आले आहेत. तुम्ही प्रेक्षकांना चांगले चित्रपट दिले की प्रेक्षक आपोआप चित्रपटगृहात येतात आणि एन्जॉय करतात. ग्रूपने चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असते. एखादा विनोदी चित्रपट तुम्ही एकट्याने बसून पाहू शकत नाही, आणि पाहूही नये... अशा प्रकारचे चित्रपट एकत्र बसून चित्रपटगृहात पाहण्यातच खरी मजा असते.’

बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील एका गावामध्ये पंकज त्रिपाठी यांचा जन्म झाला. अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे ते दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकायला गेले. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली.

रंगभूमी तसेच छोट्या-मोठ्या जाहिराती आणि चित्रपट करीत असताना हळूहळू त्यांना मोठे ब्रेक मिळत गेले. त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोनेच केले. आज अनेक निर्माते व दिग्दर्शक त्यांना घेऊन चित्रपट बनवू लागले आहेत.

मोठमोठ्या स्टार कलाकारांच्या पंक्तीत जाऊन ते बसले आहेत. ओटीटीसारख्या नव्या प्लॅटफॉर्मवरही त्यांनी आपले अभिनयगुण दाखविले आहेत. त्यांची मिर्झापूर ही सीरीज आणि त्यातील त्यांची कालिन भैय्या ही भूमिका खूप लोकप्रिय आहे.

त्यांचे चित्रपट आता ‘हंड्रेड करोड’ क्लबमध्येही सामील झाले आहेत. सुरुवातीला छोट्या भूमिका साकारून आज मोठमोठ्या भूमिका साकारणारा हा कलाकार अतिशय शांत आणि नम्र स्वभावाचा आहे. त्यांच्याशी केलेली बातचीत...

हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच ओटीटीसारख्या नव्या प्लॅटफॉर्मवरदेखील तुम्हाला स्टारडम प्राप्त झाले आहे. या स्टारडमबद्दल तुम्हाला काय वाटते किंवा त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?

स्टारडम वगैरे काय असते हे मला माहीत नाही. मात्र एक गोष्ट निश्चित, की लोकांना आपले काम आवडू लागले की आपली जबाबदारी खूप वाढते. अधिक जागरूक राहून आणि अभ्यास

करून काम करावे लागते. चांगल्या कथा असलेले चित्रपट करावे लागतात आणि लोकांचे मनोरंजन कसे होईल याचा विचार करावा लागतो. स्टारडम मिळावे म्हणून मी काम करीत नाही. आपण केलेल्या कामाला लोकांनी पसंती द्यावी, आपल्या कामाची त्यांनी योग्य पोचपावती द्यावी या उद्देशाने आणि जबाबदारीने काम करावे लागते. आता माझ्यावरची जबाबदारी खूप वाढली आहे, असे मला वाटते.

तुम्ही अनेक चित्रपट केले आहेत आणि आणखी चांगले चित्रपट करताय. करिअरच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर तुम्ही आहात. पण कधीतरी एखादा चित्रपट तुम्ही नाकारला असणारच. मग नाकारलेल्या चित्रपटाबाबत कधी पश्चात्ताप होतो का?

मी एखादा चित्रपट नाकारल्यानंतर त्या चित्रपटाबद्दल नंतर कधीच विचार करत नाही. कारण आपल्या नशिबात एखादी गोष्ट लिहिलेली असली, तर ती कुठूनही आणि कशीही आपल्याला मिळतेच, यावर माझा ठाम विश्वास आहे.

त्यामुळे एखादा चित्रपट आपल्या हातातून गेला, तर त्याचा विचार करत बसायचे नाही हे धोरण मी पाळतो. मी नेहमी सकारात्मक विचार करणारा कलाकार आहे. शिवाय आपल्या जीवनात चढ-उतार नेहमीच येत असतात. आपल्या जीवनाचा तो एक भाग आहे. म्हणूनच गेलेल्याचा फार विचार न करता सतत पुढील विचार करायचा असतो.

प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतो, त्याप्रमाणे चित्रपटसृष्टीतही स्ट्रगल आहे. तुम्हीदेखील करिअरच्या सुरुवातीला स्ट्रगल केला असणार. मग त्यावेळी हे क्षेत्र सोडून अन्य दुसऱ्या क्षेत्रात करिअर करावे असे कधी वाटले का?

मी स्ट्रगल खूप केला. परंतु या क्षेत्राशिवाय अन्य कोणत्याही क्षेत्राचा विचार मनात कधीही डोकावला नाही. मी सुरुवातीलाच ठरविले होते, की करिअर करायचे ते मनोरंजन क्षेत्रातच. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असतानाच मनाचा निर्धार पक्का होता. मी रंगभूमीपासूनच सुरुवात केली.

रंगभूमीवर जवळपास दोन हजारहून अधिक शो केले. खरेतर रंगभूमीवर काम करीत असताना प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून आपल्याला अंदाज येतो, आपल्याला पुढे काय करायचे आहे ते समजते. नागपूरला केलेल्या नाटकाच्या एका प्रयोगानंतर हा विचार आणखी पक्का झाला. आमच्या विनोदी नाटकाचा प्रयोग तिथे होता. त्या प्रयोगाला प्रचंड गर्दी उसळली होती. प्रयोग हाऊसफुल्ल झाला होता.

प्रयोग सुरू झाल्यानंतर प्रेक्षक लोटपोट हसत होते. त्याच वेळी मला समजले, की प्रेक्षक आपल्या कामाला उत्स्फूर्त दाद देत आहेत. आपल्या विनोदबुद्धीने आपण प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतो याची प्रचिती आली. आपल्याला हेच काम येते आणि भविष्यात आपल्याला तेच करायचे आहे, हे मग मनाशी ठरवून टाकले.

त्यामुळे मला रंगभूमीवर काम करीत असतानाच आपल्याला आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, याची कल्पना आली आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला.

म्हणूनच अभिनयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्षेत्रात जाण्याचा विचार मनात कधीही डोकावला नाही. परंतु, या क्षेत्रात आल्यानंतर संधी कशी, कधी आणि कुठून मिळेल हे काही माहिती नव्हते. मात्र या क्षेत्रातच आता रमायचे, हे पक्के केले होते.

 ...मग पहिला ब्रेक कसा मिळाला?

अगदी अचानकच मिळाला. मी हॉस्टेलवर झोपलो होतो. तेथे एक कास्टिंग डिरेक्टर आले होते. आमच्यातीलच एकाने त्यांना सांगितले की तो पाहा, तो जो झोपलाय ना तिथे तो कलाकार चांगला आहे. तो काम करील.

उठवा त्याला... अशा पद्धतीने मला एक सीन.. मग दोन सीन.. असे काम मिळत गेले. कधीकधी गर्दीमध्ये उभे राहायचेही काम केले. कारण ती माझी सुरुवात होती आणि ही इंडस्ट्री माझ्यासाठी नवखी होती. त्यामुळे एखादा का होईना, पण जो सीन मिळेल तो मी करीत होतो. त्यामुळे मला सुरुवातीलाच मोठा ब्रेक मिळाला असे मी म्हणणार नाही.

खरेतर माझ्या करिअरला आता कुठे सुरुवात झाली आहे, असे मला वाटते. आतापर्यंत मी अनेक चित्रपट केले असले, तरी मला आत्ता खऱ्या अर्थी ब्रेक मिळाला आहे, असे मी म्हणेन.

ओ माय गॉड २, मै अटल हूं, खडकसिंग अशा काही चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे आता माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, असे मला वाटते. या चित्रपटांमध्ये मला मोठी भूमिका मिळाली आहे. माझी इनिंग आता सुरू झाली आहे आणि मला मोठी इनिंग खेळायची आहे.

तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. चित्रपट साईन करण्यापूर्वी त्या दिग्दर्शकाची काम करण्याची पद्धत, त्याने बनविलेले चित्रपट आणि त्यांना मिळालेले यश, त्याची विचारशैली वगैरे बाबींचा विचार करता का?

नक्कीच करतो. दिग्दर्शकाला तीन ते चार वेळा भेटतो आणि त्याला योग्य पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे लग्न करताना मुलगा आणि मुलगी यांचे किती गुण जुळतात हे पाहिले जाते.

तसाच मी कोणत्याही दिग्दर्शकाबरोबर काम करताना त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये विचारांची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते, तो आपल्याकडून कसे काम काढून घेऊ शकतो आणि मी त्याच्याबरोबर कसे काम करू शकतो याचा विचार करतोच. दिग्दर्शक आणि कलाकार यांचे ट्युनिंग छान जमले, की ते प्रॉडक्ट उत्तम बनते.

माझे सगळ्याच दिग्दर्शकांबरोबर चांगले ट्युनिंग जुळले आहे. अनुराग बसू, अनुराग चौधरी, रवी जाधव या काही दिग्दर्शकांबरोबर मी काम केले आहे. या दिग्दर्शकांबरोबर माझे छान ट्युनिंग आहे. त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. पुन्हा संधी मिळाली तर यांच्याबरोबर नक्कीच काम करायला आवडेल.

तरीही एखाद्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना त्याला दिग्दर्शनाची कितपत माहिती आहे किंवा तो हे प्रोजेक्ट कसे काय पुढे नेऊ शकतो, याची कल्पना काम करतानाच येत असेल ना?

हो, तर! एकदा काम करायला सुरुवात झाल्यानंतर दिग्दर्शकाला टेकिंगचे, तसेच स्क्रिप्टचे कितपत ज्ञान आहे याची आम्हाला कल्पना येते. तो या प्रोजेक्टला कितपत न्याय देऊ शकतो हे समजते. तसेच एखाद्या कलाकाराची अभिनय क्षमता काय आहे किंवा तो कितपत ती भूमिका साकारू शकतो हे दिग्दर्शकाला ठाऊक असते.

मग आपण हा चित्रपट चुकीचा निवडलाय, असा विचार कधी मनात आलाय का?

असा विचार काही वर्षांपूर्वी माझ्या मनात यायचा. मी चुकीच्या दिग्दर्शकाबरोबर काम करतोय, असे वाटायचे. परंतु अलीकडे दोन-तीन वर्षांत तसे काही वाटत नाही.

आता मी काम करीत असलेले सगळेच दिग्दर्शक मातब्बर आणि चित्रपटसृष्टीची उत्तम जाण असलेले आहेत. चित्रपट कसा बनवावा किंवा कसा असावा, याचे चांगले ज्ञान त्यांना आहे.

अगदी चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून संपू्र्ण चित्रपट त्यांच्या मनात वा डोक्यात फिट्ट बसलेला असतो. सेटवर ते पूर्ण अभ्यास करून येतात आणि आपला चित्रपट पूर्ण करतात.

आतापर्यंत तुम्ही विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत आणि आताही करत आहात. अशी कोणती भूमिका आहे, ज्या भूमिकेतून एक कलाकार म्हणून तुम्हाला काही शिकायला मिळाले?

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ओ माय गॉड २ आणि लवकरच येणाऱ्या मैं अटल हूं या चित्रपटांच्या कथानकांनी मला खूप काही शिकविले आहे.

ओ माय गॉड या चित्रपटामुळे सध्याच्या काळात लैंगिक शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि त्याबाबतीत आपल्या समाजात जनजागृती करणे किती आवश्यक आहे, हे समजले. तर मैं अटल हूं या चित्रपटाच्या कथानकाने लोकशाहीची मूल्ये किती आवश्यक आहेत ते शिकवले.

या चित्रपटांतील भूमिकांनी माझ्यातील एक कलाकाराला खूप काही शिकवले. एक व्यक्ती म्हणूनही शिकवले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा हा बायोपिक सगळ्यांना प्रेरणा देईल असाच आहे.

आतापर्यंत तुम्हाला विविध पुरस्कार मिळालेले आहेत आणि तुमच्या कामाचे कौतुक झाले आहे. परंतु, त्यातील असा कोणता पुरस्कार आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद झाला आणि मानसिक समाधान मिळाले?

आपल्या एखाद्या कलाकृतीचे आणि त्यातील भूमिकेचे जेव्हा कौतुक होते, तेव्हा निश्चितच आनंद होतो. परंतु त्यावेळी आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे, याची जाणीवदेखील होते. पुढील काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

त्यातच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर त्याचा आनंद खूप असतो. राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाची दखल घेतली जाते, त्यामुळे त्या पुरस्काराबद्दल खूप समाधान मिळते. कारण हा पुरस्कार कोणत्याही प्रायोजक कंपनीचा नसतो, तर तो सरकारतर्फे दिला जातो. मला आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

आतापर्यंत तुम्ही अनेक भूमिका साकारल्या आहेत. अशी कोणती भूमिका आहे जी तुम्हाला खूप कठीण वाटली?

प्रत्येक भूमिका साकारणे कठीणच असते. ओ माय गॉड २ या चित्रपटातील संवाद खूप मोठे होते. मला हे संवाद पाठ करून म्हणायचे होते. माझ्यासाठी ती बाब खूप अवघड होती. तरीही मी तसे संवाद म्हटले. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही संवाद कमी केले.

ते काम अगोदरच झाले असते, तर मला काम करणे अधिक सोपे गेले असते. एकेक सीन सात ते आठ मिनिटांचा होता आणि त्यातील सगळ्या ओळी मला पाठ करायच्या होत्या. मुळात माझे पाठांतर तसे कमी आहे. काही बाबी माझ्या लक्षात राहतात, तर काही अजिबात आठवत नाहीत. पण हे कधी कधी होते. त्यामुळे ती भूमिका साकारणे मला तसे कठीण काम वाटले.

मला असे वाटते, की अभिनय करणे ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. काम करीत असताना बरोबर संवाद म्हणणे, कॅमेरा आणि लाइट यांच्यासमोर बरोबर उभे राहून काम करणे, या सगळ्या प्रक्रिया एकाच वेळी कराव्या लागतात. त्यातच या सगळ्या प्रक्रिया बरोबर होणे आवश्यक आहे. म्हणूनच अभिनय करणे मेडिटेशन करण्यासारखे आहे, असे मला वाटते.

आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्टारडमला खूप महत्त्व दिले जाते. मोठमोठे स्टार घेतले की चित्रपट हमखास कमाई करतो असे समजले जाते. परंतु आपल्याकडे काही कलाकार असेही आहेत, जे स्वतःच्या हिमतीवर चित्रपट यशस्वी करून दाखवितात. त्यांचे चित्रपटही शंभर करोड क्लबमध्ये सामील होतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर परेश रावल यांचे देता येईल आणि त्याबरोबरच तुमचेही. हिंदी चित्रपटसृष्टीतील या बदलाबद्दल काय सांगाल?

काही वर्षांपूर्वी अशी पद्धत होती. मोठमोठ्या कलाकारांचे स्टारडम पाहून त्यांना साईन केले जात होते. ते मागतील तेवढे मानधन दिले जात होते. त्यांच्या साध्या साध्या गोष्टीचे कौतुक केले जात होते. परंतु, आताचा माहोल संपूर्णपणे बदलला आहे.

आता प्रेक्षकांची अभिरूची बदलली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना खूप महत्त्व आले आहे. आता माझे ओ माय गॉड २ आणि फुकरे ३ हे दोन्ही चित्रपट लागोपाठ हंड्रेड करोड क्लबमध्ये सामील झाले.

ही सगळी प्रेक्षकांची माझ्यावरील कृपा आहे. त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम आहे. माझ्या सोशल मीडियावर मला येणाऱ्या प्रतिक्रिया खूप छान असतात. त्यामध्ये टीकेचा वा नाराजीचा सूर कधीच नसतो. खूप चांगला चाहता वर्ग मी कमावला आहे, याचे समाधान वाटते. चाहत्यांच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत आहे.

आजचा प्रेक्षक हुशार आणि चाणाक्ष आहे. तुम्ही त्याला फसवू शकत नाही. त्यांची आवड आणि निवड बदलली आहे. इंटरनेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यामुळे झालेला हा सगळा बदल आहे.

मध्यंतरीच्या काळात प्रेक्षक चित्रपटगृहात फारसे येत नव्हते. दाक्षिणात्य चित्रपटांचाही ओव्हर डोस झाला होता. परंतु, आता हिंदी चित्रपट पाहायला प्रेक्षक चित्रपटगृहात येत आहेत. पठाण, जवान; तुमचे ओ माय गॉड २, फुकरे ३असे काही हिंदी चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी झाले आहेत. याबाबत तुम्ही काय सांगाल?

निश्चितच आता हिंदी चित्रपटांना अच्छे दिन आले आहेत. कोरोनाचा काळ भयानक होता. लॉकडाउन संपल्यावरही प्रेक्षक चित्रपटगृहात येत नव्हते. मात्र आता ते येऊ लागले आहेत आणि त्याला कारण चांगले चित्रपट येत आहेत.

तुम्ही प्रेक्षकांना चांगले चित्रपट दिले की प्रेक्षक आपोआप चित्रपटगृहात येतात आणि एन्जॉय करतात. ग्रूपने चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असते. एखादा विनोदी चित्रपट तुम्ही एकट्याने बसून पाहू शकत नाही, आणि पाहूही नये. अशा प्रकारचे चित्रपट एकत्र बसून चित्रपटगृहात पाहण्यातच खरी मजा असते.

कारण आपल्या बाजूला बसलेला हसायला लागला, की आपल्याला लगेच हसू येते. सतत आनंदी आणि हसत राहणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम टॉनिक असते.

एक काळ असा होता की समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा अशा दोन प्रकारात सिनेमाची विभागणी केली जात होती. परंतु, अलीकडच्या काळात दोन्ही प्रकारचे चित्रपट हातात हात घालून चालत आहेत असे मला वाटते. तुमचे याबाबतीतील निरीक्षण काय आहे?

सध्या समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांच्यातील दरी पूर्णपणे मिटलेली आहे. दोन्ही प्रकारचे चित्रपट बनत आहेत आणि ते चांगला व्यवसाय करीत आहेत. सध्या चांगला चित्रपट आणि वाईट चित्रपट असे दोन प्रकार आहेत.

बिग बजेट चित्रपट आणि कमी बजेट चित्रपट हा प्रकार वाढीस लागलेला आहे. परंतु, अलीकडे कधीकधी एखादा स्मॉल बजेटचा चित्रपटही शंभर कोटी वा दोनशे कोटी रुपयांचा व्यवसाय करीत आहे. त्यामुळे कोणता चित्रपट यशस्वी होईल आणि कोणता नाही, हे काही सांगता येत नाही.

कारण मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे सध्याचा प्रेक्षक हुशार आणि चाणाक्ष झाला आहे. पोस्टर, टीझर आणि ट्रेलर पाहून तो चित्रपट पाहायचा की नाही ते ठरवितो. त्यांच्या आवडीचा अंदाज बांधणे कठीण आहे.

प्रेक्षकांना आता मनोरंजनासाठी विविध साधने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे तो विचार करूनच चित्रपटगृहात येतो.

तुमचा आता मैं अटल हूं हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखा तुम्ही साकारत आहात. या भूमिकेसाठी तुम्ही काय तयारी केली होती?  

या भूमिकेसाठी मला खूप तयारी करावी लागली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची काही भाषणे मी ऐकली, तसेच त्यांचे काही व्हिडिओ मी पाहिले.

त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना भेटलो आणि त्यानुसारच ही भूमिका साकारण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्या करिअरमधील हा एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटातील भूमिकेमुळे मला खूप काही शिकायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT