George Brahe
George Brahe  Sakal
साप्ताहिक

टीको ब्राहेचे पदार्पण

अरविंद परांजपे

शर्मिष्ठा तारका समूहातल्या ताऱ्याच्या स्फोटामुळे खगोलशास्त्राला एक नवीन महान शास्त्रज्ञ मिळाला. हा स्फोट झाला नसता किंवा टीकोने बघितला नसता तर कदाचित टीको इतक्या हिरिरीने या विषयाकडे वळलाच नसता. आणि पुढे फक्त टीको आणि टीकोच्या निरीक्षणांमुळेच योहान्स केप्लरने ग्रहांची जी समीकरणे सोडवली ती सोडवलीच गेली नसती.

टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेपेक्षा कोपर्निकसची सूर्यकेंद्रित विश्वाची संकल्पना खूप सोपी आणि सुटसुटीत होती. पण सूर्यकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेत तेव्हा एक मोठा शास्त्रीय दोष दिसून येत होता.

पुढे जाण्यापूर्वी हा दोष काय होता, ते बघूया. रेल्वे किंवा रस्त्याने प्रवास करताना आपल्या जवळच्या वस्तू दूरच्या वस्तूंच्या तुलनेत वेगाने मागे जाताना दिसतात, तर खूप दूरचे डोंगर आपल्या बरोबरच प्रवास करत आहेत, असा भास होतो. आपल्याला सगळ्यांचा हा अनुभव असेल. याच धर्तीवर कोपर्निकसच्या सिद्धांताच्या विरुद्ध असणाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

पृथ्वी जर सूर्याची परिक्रमा करत आहे आणि नभोमंडळावरील तारे एकाच अंतरावर नसून वेगवेगळ्या अंतरावर आहेत तर आपल्याला जवळच्या ताऱ्यांची जागा दूरच्या ताऱ्यांच्या सापेक्षात बदलताना दिसायला पहिजे.

पण तसे आपल्या निरीक्षणात मात्र येत नाही, असा मुद्दा टीको ब्राहे (Tycho Brahe १५४६ -१६०१) या डॅनिश खगोलशास्त्रज्ञाने युक्तिवाद करताना उपस्थित केला. मुद्दा रास्त होता आणि कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सौरमालेच्या सिद्धांतावर बोट ठेवणारा होता.

जर या मुद्द्याचे उत्तर होकारार्थी देण्यात आले असते तर सूर्यकेंद्रित सौरमालेच्या सिद्धांताला खूप बळ मिळाले असते. पण याचे होकारार्थी उत्तर त्या काळातील शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडचे होते.

जवळच्या ताऱ्याची जागा दूरच्या ताऱ्यांच्या सापेक्षात खरंच बदलताना दिसते. हा शोध विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लागला. ताऱ्यांचे आपल्यापासूनचे अंतर इतके जास्त आहे, की त्या काळातील उपकरणांचा वापर करून अशा प्रकारची निरीक्षणे शक्य नव्हती.

कोपर्निकसच्या तर्कांवरून टीको ब्राहेला ग्रह सूर्याभोवती फिरतात हे मान्य होते, पण तो पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या बाजूने होता. इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात पण सूर्य स्वतः मात्र (इतर ग्रहांसकट) पृथ्वीची परिक्रमा करतो असा विचार त्याने मांडला.

टीकोच्या तर्कामुळे कोपर्निकसने प्रस्तुत केलेल्या प्रश्नांचाही उलगडा होण्यास मदत मिळत होती. पण या सर्व तर्कांना निरीक्षणांची जोड हवी होती. ती टीकोनेच दिली. दुर्बिणींच्या आधीच्या काळातल्या उपकरणांच्या मदतीने अत्यंत अचूक खगोलीय निरीक्षणे घेणारा हा शेवटचा शास्त्रज्ञ ठरला.

टीकोचे जीवन इतक्या विविध छटांनी रंगलेले होते, की कदाचित असे इतर कुठलेही व्यक्तिमत्त्व नसेल - खगोलशास्त्रात तर नाहीच.

ब्राहे परिवार, डेन्मार्कमधील मोठ्या प्रभावशाली परिवारांपैकी एक. डेन्मार्कमध्ये आजही ब्राहे परिवाराचे वंशज आहेत. टीकोचे वडील ऑट ब्राहे राजघराण्यातील खासगी सल्लागार होते. ऑट ब्राहेने आपल्या भावाला, जॉर्ज ब्राहेला, आपला पहिला मुलगा देण्याचे कबूल केले होते; कारण जॉर्जला मूलबाळ नव्हते.

पण टीकोच्या जन्मानंतर ऑटनी आपला शब्द पाळला नाही आणि जॉर्जनेही तसा आग्रह धरला नाही. टीकोचा भाऊ जन्माला आल्यावर मात्र जॉर्जने टीकोला पळवून नेले. पुढे टीको स्वतः लिहितो, की जॉर्जने त्याला नीट वाढवले आणि त्याला आपल्या मालमत्तेचा उत्तराधिकारीही केले.

तेरा वर्षांच्या टीकोला जॉर्जने कोपनहेगन विद्यापीठात दाखल केले. त्या काळात डेन्मार्कमध्ये मुलांच्या शिक्षणाची सुरुवात विद्यापीठांतून होत असे. टीकोने मुत्सद्देगिरीत किंवा राजकारणात प्रवेश करावा आणि त्यासाठी त्याने वक्तृत्व आणि तत्त्वज्ञान विषयात प्रावीण्य मिळवावे, अशी टीकोच्या काकांची इच्छा होती.

पण टीकोला या क्षेत्रात अजिबात रस नव्हता. त्याचे सगळे लक्ष होते खगोलीय पदार्थांच्या हालचाली समजावून घेण्याकडे. २१ ऑक्टोबर १५६० या दिवशी कोपनहेगनमधून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. ग्रहणांचे इतके अचूक भाकीत करता येते याचे त्याला खूप अप्रूप आणि आश्चर्य वाटले. आणि खगोलशास्त्राच्या संदर्भात मिळेल त्या पुस्तकांचा तो अभ्यास करू लागला.

खगोलशास्त्रावर टॉलेमीचे लॅटिन भाषेतील पुस्तक उपलब्ध आहे, हे कळल्यावर त्याने ते पुस्तक मिळवले आणि त्याचा कसून अभ्यास केला. तेरा-चौदा वर्षांच्या टीकोच्या हस्ताक्षरातल्या टिपांसह आजही हे पुस्तक प्राग विद्यापीठाच्या ग्रंथालयात जपून ठेवण्यात आले आहे.

कोपनहेगनमधील अभ्यास पूर्ण झाल्यावर, कुठल्याही सर्वसाधारण पालकाप्रमाणे, त्याच्या काकांनी टीकोला परदेशी पाठवण्याचा विचार केला. आणि १५६२साली त्याची रवानगी जर्मनीतल्या लिपझिग विद्यापीठात कायद्याच्या शिक्षणासाठी करण्यात आली. त्याच्या काकांच्या मते खगोलशास्त्राचा अभ्यास म्हणजे वेळेचा अपव्यय आणि म्हणून टीकोवर लक्ष ठेवण्याकरता त्यांनी टीकोपेक्षा चार वर्षांनी मोठ्या विडललाही पाठवले.

वयाची १७ वर्ष पूर्ण करण्याआधीच टीकोने आकाशात ग्रहांच्या जागांचे भाकीत करणारी अत्यंत जटिल अशी गणितीय पद्धत आत्मसात केली. गणितीय पद्धतीने शोधून काढलेल्या ग्रहांच्या जागा आणि खुद्द आकाशात त्यांचे दिसणे यात फार मोठा फरक आहे, असे ही गणिते सोडवताना त्याच्या लक्षात आले होते.

त्यामुळे ग्रहांच्या जागांचे अचूक भाकीत करण्यासाठी तितक्याच अचूकतेने निरीक्षणे घेण्याचीही गरज आहे, हे त्याला उमगले. अगदी साध्या उपकरणांचा वापर करून त्याने निरीक्षणे घेण्यास सुरुवात केली.

दोन ताऱ्यांमधील कोनीय अंतर मोजण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्याला परवडणारी उपकरणे अर्थातच अगदी सामान्य प्राथमिक स्वरूपाची होती. पण त्याचा प्रयत्न जास्तीतजास्त अचूक निरीक्षणे घेण्याकडे असायचा. त्याचे हे स्व-प्रशिक्षणच पुढे त्याला एक जगद्विख्यात निरीक्षक म्हणून ओळख मिळवून देणार होते.

टीकोने आकाशाचा नकाशा दाखवणारा एक गोल विकत घेऊन विडलपासून लपवून ठेवला होता. अर्थातच विडलची नजर चुकवून तो आपली निरीक्षणे घेत असे. टीकोला खगोलअभ्यासापासून परावृत्त करण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरणार आहेत हे नंतर विडलच्याही लक्षात आले. पुढे ते एकमेकांचे मित्रही झाले.

टीको एकोणीस वर्षांचा असताना त्याच्या काकांचा मृत्यू झाला. आता त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्यही मिळाले होते. त्याने मग जर्मनीतल्याच रॉसस्टोक विद्यापीठात प्रवेश घेतला. त्या काळात खगोलशास्त्रज्ञ फलज्योतिषाचाही अभ्यास करत असत.

टीकोनेही तेच केले. २८ ऑक्टोबर १५६६ रोजी चंद्रग्रहण होणार होते. त्याच दिवशी टर्कीच्या सुलतानाचा मृत्यू होईल असे भाकीत टीकोने केले होते. या भाकीतामुळे दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे तो अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला आणि सुलतानाचा मृत्यू ग्रहणाच्या आधीच झाला हे कळल्यानंतर त्याचे सार्वजनिक हसेही झाले.

टीकोचे व्यक्तिमत्त्व अशांत किंवा जरा शिरजोर प्रकारचे होते. एकदा दुसऱ्या एका सरदार घराण्यातल्या मुलाबरोबर त्याचे भांडण झाले. कारण क्षुल्लक होते. दोघांपैकी चांगला गणितज्ञ किंवा खगोल अभ्यासक कोण? खरेतर उत्तर मिळवणे फार काही अवघड नव्हते.

दोघांनीही काही गणिते सोडवायची आणि ज्याने सगळी गणिते अचूक सोडवली असती, तो श्रेष्ठ ठरला असता. पण हे दोघे पडले रईस सरदार घराण्यातले. त्यांनी या प्रश्नाचा निवाडा अंधाऱ्या रात्री ताऱ्यांच्या घुमटाखाली तलवारीचे द्वंद्वयुद्ध करून करण्याचे ठरवले.

या द्वंद्वात टीकोचे नाक छाटले गेले आणि द्वंद्वयुद्ध संपले. मग टीकोने सोने आणि चांदीच्या मिश्र धातूचे एक नाक तयार केले. असे म्हणतात, की ते नाक अगदी हुबेहूब मूळ नाकासारखे होते. पुढे आयुष्यभर तो हेच नाक वापरत होता.

११ नोव्हेंबर १५७२ रोजी टीकोच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. त्या रात्री त्याला शर्मिष्ठा तारका समूहात एक नवीन तारा दिसला. सुरुवातीला त्याला वाटले, की त्याला भ्रम होतो आहे. मग त्याने आपल्या नोकरांनाही तो तारा दाखवला आणि त्यांनाही तो दिसत होता. लगेच त्याने त्या ताऱ्याची जागा निश्चित केली.

पुढे इतर दूरच्या जागांवरूनही हा नवा तारा त्याच ठिकाणी दिसत होता, म्हणजेच हा तारा ग्रहांच्याही खूप पलीकडे होता -ताऱ्यांच्या गोलावर. ग्रीक लोकांच्या अपरिवर्तनीय ताऱ्यांच्या गोलाच्या संकल्पनेला हा एक मोठा धक्का होता. तो एका ताऱ्याचा स्फोट होता, असे आज आपण सांगू शकतो.

या घटनेमुळे खगोलशास्त्राला एक नवीन महान शास्त्रज्ञ मिळाला, असे मात्र म्हणता येईल. कारण हा स्फोट झाला नसता किंवा टीकोने बघितला नसता तर कदाचित टीको इतक्या हिरिरीने या विषयाकडे वळलाच नसता.

आणि पुढे फक्त टीको आणि टीकोच्या निरीक्षणांमुळेच योहान्स केप्लरने ग्रहांची जी समीकरणे सोडवली ती सोडवलीच गेली नसती...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT