Mansoon day
Mansoon day sakal
साप्ताहिक

Mansoon day : येती पाऊस धारा घेऊनी आजारा

डॉ. अविनाश भोंडवे

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे या पावसाळ्यात होऊ शकणाऱ्या आजारांबाबत प्रतिबंधक काळजी घेतल्यास, बहरलेल्या सृष्टीचे कौतुक जाणवेलच आणि आरोग्य आणखी द्विगुणित होईल.

माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार,

भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार

ग. दि.माडगूळकरांच्या या कवितेप्रमाणे उन्हाळ्याची तलखी संपवून पावसाच्या धारा हवेत गारवा, वातावरणात उल्हास आणतात आणि जनमानसातील पाण्याची चिंता दूर करतात.

कडाक्याच्या उन्हानंतर आभाळातून बरसणाऱ्या थंड पाण्याने मिळणारा दिलासा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, प्रत्येकजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो. उष्णतेने हैराण झालेले लोक पावसाच्या तुषारांचा वर्षाव सुरू होताच सुखावतात.

पावसात भिजण्याचा एक वेगळाच आनंद अनेकजण लुटतातही. सळसळत्या तरुणाईसाठी पावसाळा एखाद्या उत्सवापेक्षा किंवा सणापेक्षा कमी नसतो. पण या वर्षा ऋतूसमवेत अनेक आजारही स्वैरपणे पसरू लागतात.

आल्हाददायक पावसाळा कधी कधी त्रासाचे कारण बनतो. पाऊस कमी असो वा जास्त, वेळेवर येवो वा न येवो, पण पावसाळ्यातले आजार मात्र आपापल्या वेळी येतात आणि जनतेला पुरते पछाडतात. या आजारांपैकी काही नेहमीच्या, पण महत्त्वाच्या त्रासदायक आजारांबद्दल माहिती सर्वांनाच असते.

पण ते होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. बरसणाऱ्या श्रावणधारांच्या प्रसन्न वातावरणाला आजारामुळे दूषित होऊ द्यायचे नसेल, तर ही काळजी आपण घ्यायलाच हवी.

या ऋतूमध्ये अनेक आजार पसरतात. पण त्यांचे वर्गीकरण करायचे झाले तर-

ताप आणि खोकला येणारे आजार

१) सर्दी, एन्फ्लुएन्झा, दमा, जुना खोकला, सीओपीडी असे श्वसनसंस्थेचे आजार;

२) मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे कीटकांमार्फत पसरणारे आजार;

३) विषमज्वर, कावीळ, उलट्या-जुलाब, कॉलरा असे अन्नातून, दूषित पाण्यातून आणि माश्यांद्वारे पसरणारे आजार,

४) लेप्टोस्पायरोसिससारखा सस्तन प्राण्यांकडून पसरणारा आजार

त्वचेचे आजार

डोळ्यांचे आजार

कानाचे आजार

पावसामुळे गाड्या घसरून होणारे अपघात -

असे प्रकार दिसतात.

ताप-खोकल्याचे आजार

सामान्य सर्दी आणि फ्लू : हे आजार पावसाळ्यात होतातच. पावसाळी हवामानातील दमटपणा श्वसनमार्गाच्या विषाणूंना पोषक ठरतो. शरीरात जास्त वेळ आर्द्रता राहिल्याने सर्दी-खोकल्याच्या जीवाणूंचे फावते. आपल्या शरीरात शिरून ते आपल्याला अंथरुणाला खिळवून टाकतात. या काळातल्या दमट हवेमुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार वाढतात. ते टाळण्यासाठी पावसात भिजणे टाळावे.

गरज असेल तरच पावसात जावे. कोणत्याही कारणाने गेल्यास लगेच कपडे बदलून कोरडे कपडे घालावेत. अंगावर कपडे वाळवू नयेत, ओलेपणा सुकविण्यासाठी पंखा इत्यादीऐवजी हिटर किंवा शेगडी वापरावी. सर्दीची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर हात व्यवस्थित धुवावेत. सर्दी, खोकला, ताप दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मलेरिया : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने मलेरियाची साथ पसरण्याची दाट शक्यता असते. मादी अॅनॉफिलीस डास चावल्यामुळे होणारा हा आजार, संसर्गजन्य असतो. तो जगातील सर्वात प्राणघातक रोगांपैकी एक आहे.

म्हणूनच मलेरियाला हसण्यावारी नेऊ नये. ताप, अंग दुखणे आणि ताप येण्यापूर्वी खूप थंडी भरून येत असेल, तर ती मलेरियाची लक्षणे असू शकतात.

डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करणे हा मलेरिया प्रतिबंधाचा मूलमंत्र असतो. त्यासाठी रात्री झोपताना मच्छरदाणी वापरणे, घराभोवती पाणी, डबकी साचू न देणे, नाल्यांमध्ये डीडीटी फवारणी करून घेणे या गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते. काही डास प्रतिबंधक उपकरणे बाजारात मिळतात, ती जरूर वापरावीत. मात्र विजेवर चालणारी ही उपकरणे आपल्या डोक्याशी नसावीत. मलेरियाची लक्षणे दिसू लागताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे शहाणपणाचे ठरते.

डेंग्यू आणि चिकनगुनिया : हे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पसरतात. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या अळ्या थोडासा ओलावा मिळताच सक्रिय होतात.

स्वच्छ पाण्यात त्या जास्त वाढतात. अधिकतर जिथे बांधकाम किंवा घरदुरुस्ती सुरू असते, तिथे या जास्त आढळतात. ओलाव्यामध्ये पाणी जरी जमा झाले, तरी अळ्या सक्रिय होतात. डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रसार मादी एडिस इजिप्ती डासाच्या चावण्याने होतो.

डेंग्यू आणि चिकनगुनियाची सामान्य लक्षणे म्हणजे थंडी वाजून येणारा कडक ताप, सांधेदुखी, स्नायू आणि हाडे दुखणे, पुरळ, डोकेदुखी आणि हलका रक्तस्राव. रक्ताच्या चाचणीत याचे निदान पक्के होते. डेंग्यू आणि चिकनगुनियावरील औषधोपचारासाठी त्वरित डॉक्टरांना दाखवावे.

लेप्टोस्पायरोसिस : हा एक जीवाणूजन्य (बॅक्टेरियल) आजार आहे. लेप्टोस्पायरा नावाच्या मळसूत्राच्या आकाराच्या बॅक्टेरियांमुळे तो त्याचा संसर्ग पसरतो.

या आजाराचे जीवाणू माणसात थेट प्रवेश करत नाहीत. म्हैस, घोडा, बकरी, कुत्रा अशा पाळीव प्राण्यांच्या आणि विशेषतः उंदीर इत्यादी प्राण्यांच्या शरीरामध्ये तो असतो. त्यांच्या मूत्राद्वारे त्याचा प्रसार होतो.

खूप पाऊस झाल्यावर, मोठ्या शहरांमध्ये जमिनीखालची गटारे तुंबतात आणि त्यातले पाणी रस्त्यावर पसरते. लहान गावांत पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र मिसळते. अशा तुंबलेल्या पाण्यातून अनवाणी किंवा पायाला जखम असलेली व्यक्ती जेव्हा चालत जाते, त्यावेळेस त्याच्या शरीरात लेप्टोस्पायरा प्रवेश करतात.

सुरुवातीला याची लक्षणे सौम्य डोकेदुखी, स्नायू दुखणे, कडक ताप अशी असतात. रोगजंतू रुग्णाच्या शरीरात वाढू लागल्यावर, फुप्फुसातून रक्तस्राव किंवा मेंदूज्वर अशी गंभीर लक्षणे दिसू लागतात. पावसाळ्यात बॅक्टेरियामुळे पसरणारा लेप्टोस्पायरोसिस हा आजार इतर अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतो.

याचा प्रतिबंध करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पावसाळी गटारे तुंबू न देणे हा तर महत्त्वाचा उपाय आहेच, पण अशा तुंबलेल्या पाण्यातून चालत न जाणे श्रेयस्कर ठरते. समजा एखादवेळेस अशा पाण्यातून जावेच लागले, तर बाहेर येताच आपले पाय साबणपाण्याने त्वरित स्वच्छ धुवावेत. त्यानंतरच्या काही दिवसात ताप आल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून घ्यावे.

दूषित अन्नपाण्यातून होणारे आजार

विषमज्वर (टायफॉईड) : हा पावसाळ्यातील सर्वात घातक आजारांपैकी एक आहे. दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या या आजारामध्ये, खूप दिवस ताप येतो.

बरे झाल्यानंतरही या आजारामुळे होणारा संसर्ग रुग्णाच्या पित्ताशयात चालूच असतो, त्यामुळे आजार बरा झाला तरी त्याचा धोका कायम असतो.

संसर्गजन्य आजार असल्याने टायफॉईडच्या रुग्णाने लोकांपासून दूर राहावे. हा आजार टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत उपयुक्त ठरते. या आजारापासून बचाव करण्यासाठी शुद्ध पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते.

कॉलरा : पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पसरणारे आजार धोकादायक ठरू शकतात.

आजूबाजूला असलेली अस्वच्छता आणि त्यावरील माश्या हे कॉलरा पसरण्याचे सर्वात मोठे कारण असते. या आजारामध्ये पाण्यासारखे पातळ आणि पांढरट जुलाब होतात. पोटात तीव्र वेदना होतात, रुग्णाला खूप अस्वस्थ वाटू लागते.

त्याला तहान जास्त लागते. हे टाळण्यासाठी आजूबाजूची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. त्याच बरोबर पिण्याचे पाणी चांगला फिल्टर वापरून प्यावे. अन्यथा चौपदरी स्वच्छ फडक्याने गाळून आणि उकळून प्यावे.

या आजारापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण. कॉलरा रोगावरील लस अतिशय प्रभावी ठरते. या आजाराची लक्षणे दिसल्यावर, रुग्णावर वेळेवर उपचार करणे आवश्यक असते, कारण कॉलरा प्राणघातकदेखील ठरू शकतो.

उलट्या-जुलाब : पावसाळ्यात पाणी दूषित झाल्यामुळे त्यातील रोगजंतूंमुळे उलट्या, जुलाबांची साथ येते. या काळात माश्यांचा उपद्रवही खूप वाढतो.

या माश्या कचरा आणि घाणीवर बसतात. त्यानंतर त्या हातगाड्यांवरील आणि रस्त्यावर सर्रास विकल्या जाणाऱ्या उघड्या अन्नावर बसतात. त्यातून हा आजार पसरतो. साहजिकच पावसाळ्यात, पिण्याच्या पाण्याबद्दल काळजी घ्यावी. तसेच उघड्यावरील जंकफूड टाळावे.

उलट्या-जुलाब होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. खूप जुलाब किंवा उलट्या झाल्यावर शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण कमी होते. त्यासाठी ओआरएसची पावडर पाण्यात मिसळून घ्यावी किंवा रेडीमेड बॉक्समध्ये मिळणारे द्रावण घेतले तरी हरकत नसते.

कावीळ : यकृतामध्ये बिलीरुबिन नावाचे रासायनिक रंगद्रव्य तयार होते आणि ते पित्ताशयाच्या पिशवीमध्ये जमा होत असते. तेथून पित्तनलिकेवाटे लहान आतड्यात अन्नपचनासाठी वितरित होत असते, त्याचा उरलेला भाग मोठ्या आतड्यात अन्नाच्या चोथ्यामध्ये मिसळतो आणि त्यामुळे शौचाचा रंग पिवळा असतो.

मात्र यकृताला संसर्ग झाल्यावर, यकृताला येणाऱ्या सुजेमुळे हे बिलीरुबिन आतड्यात न जाता रक्तामध्ये जाऊन रक्तात त्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे डोळे, त्वचा पिवळी पडू लागतात. या स्थितीला कावीळ म्हणतात.

पण प्रत्यक्षात हा 'हिपॅटायटिस ए' हा विषाणूजन्य आजार असतो. दूषित पाणी प्यायल्याने, स्वच्छ न केलेल्या कच्च्या भाज्या खाल्ल्याने तो पसरतो. मळमळणे, पोट फुगणे, भूक न लागणे, उलट्या किंवा बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि थकवा ही त्याची प्रमुख लक्षणे असतात. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क साधावा. रक्ताच्या चाचणीत याचे निदान पक्के होते.

याच्या औषधोपचारासाठी त्वरित डॉक्टरांना दाखवावे. काविळीचा प्रतिबंधक उपाय म्हणजे पावसाळ्यात पाणी उकळून पिणे आणि दूषित पाण्याच्या आणि उघड्यावरील अन्नाच्या, जंकफूडच्या संपर्कात न येणे. प्रथिनेयुक्त अन्न खावे, ग्लुकोज घ्यावे.

कानाचे विकार

पावसात कानाच्या आतील भागात ओलसरपणा राहिल्यास कानाचा बुरशीजन्य विकार होतो. यात सुरुवातीला खाज किंवा वेदना होते. काळजी न घेतल्यास कानातून रक्त येऊ लागते. पावसाळ्यात सर्दी लांबत गेल्यास घशात जीवाणूंचा प्रादुर्भाव वाढतो, हा संसर्ग घशातून कानात गेल्यास कान फुटतात. यामध्ये कानाचा पडदा फाटून कानाच्या आतील भागातील पू बाहेर येतो. असे वरचेवर होत राहिल्यास बहिरेपण येऊ शकते. त्यासाठी कान दुखल्यास आपल्याच मनाने कानात तेल घालणे, कोणतेतरी थेंब टाकणे असे इलाज करू नयेत. कानातील पू वाढत गेल्यास तो मेंदूपर्यंत पोहचू शकतो.

डोळे येणे

पावसाळ्यात डोळे चुरचुरणे, लाल होणे, डोळे चिकट होणे, सूज येणे, पापण्या चिकटणे या समस्या वाढतात. दवाखान्यांमध्ये लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना हा त्रास जास्त करून होताना दिसतो. लहान मुले एकत्र खेळतात, एकमेकांच्या जवळ जाऊन मस्ती करतात, अशावेळी होणाऱ्या संपर्कामुळे हे संसर्ग वाढत जातात. डोळे आल्यावर थंड पाण्याने, दिवसभरात अगदी दर तासाला डोळे वारंवार धुवावेत. धुवायाला साधे नळाचे किंवा वॉशबेसिनचे पाणी वापरावे. डोळे धुतल्यावर ते स्वच्छ पंचाने किंवा टॉवेलने कोरडे करावेत. बाधित व्यक्तीचा टॉवेल, रुमाल आणि इतर वस्तू वापरणे टाळावे. मेडिकल स्टोअरमधून स्वतःहून अँटिबायोटिक्स किंवा डोळ्याचे थेंब (आय ड्रॉप) घेऊ नयेत. लहान मुलांनाही हात व्यवस्थित धुण्याची सवय लावावी.

त्वचा विकार (खाज सुटणे आणि पुरळ येणे)

मॉन्सूनचे आगमन होताच अंगाला खाज सुटणे, अंगावर लाल पुरळ येणे, गजकर्ण, चिखल्या या आजारांनी लोक हैराण होतात. ही समस्या कुटुंबातील एका सदस्याकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरते. अशा परिस्थितीत डॉक्टरांना भेटून उपचार करा.

स्वतःच स्वतःवर उपचार करू नका, संक्रमित व्यक्तीचे कपडे वापरू नका. पावसात भिजल्यावर अंग कोरडे करावे. ओले कपडे अंगावरच घालून फिरणे या गोष्टी टाळाव्यात. आजच्या युवकांना सदोदित जीन्स वापरण्याची सवय आहे.

जीन्स एकदा पावसात भिजल्याने ओली झाली की वाळायला खूप काळ घेते. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात सुती ट्राऊझर्स वापराव्यात. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत, विशेषतः अंतर्वस्त्रे वाळायला कधी कधी दोन-तीन दिवसही लागतात.

अशावेळेस ओली अंतर्वस्त्रे वापरण्याऐवजी, अंतर्वस्त्रांचे दोन-तीन जोड जास्त आणावेत. आणि पूर्ण कोरडीच अंतर्वस्त्रे वापरावीत. ओले कपडे घातल्याने जांघेत, काखेत आणि स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली गजकर्ण होते.

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे या पावसाळ्यात होऊ शकणाऱ्या आजारांबाबत प्रतिबंधक काळजी घेतल्यास, बहरलेल्या सृष्टीचे कौतुक जाणवेलच आणि आरोग्य आणखी द्विगुणित होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: मोदी 3.0 च्या शपथविधीनंतर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक... सेन्सेक्स पहिल्यांदाच 77 हजारांचा टप्पा पार, निफ्टी 23400 च्या वर

Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहुर्त ठरला? महायुतीत कोणात्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार?

Viral VIDEO: मक्कामधील पवित्र 'काबा'समोर बुरखा घातलेल्या महिलेचा डान्स; मुस्लिम जगतात संतापाची लाट

France Election: फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांच्याकडून तडकाफडकी संसद विसर्जित; निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर

Latest Marathi News Live Update : फुरसुंगीमध्ये सकाळपासून वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT