Rain-Water
Rain-Water 
पुणे

निसर्गाला किती काळ दोष? 

धनंजय बिजले

पुण्यात गेल्या बुधवारी पावसाने रौद्ररूप धारण केले. तीन तासांतच शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळल्याने अनेक सोसायट्या, ओढ्यालगतच्या वस्त्यांत दाणादाण उडाली. मात्र, गेल्या वर्षी आंबिल ओढ्याला पूर येऊन झालेल्या हानीतून प्रशासनाने कोणताही बोध घेतला नसल्याचे यंदा स्पष्ट झाले. आपण किती काळ केवळ निसर्गाला दोष देत बसणार? आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष कृतीची आणि विकासाच्या भाबड्या कल्पनांबाबत गांभीर्याने फेरविचार करण्याची.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात गेल्या बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता तासाभरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. तीन तासांतच शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळल्याने अनेक सोसायट्या, ओढ्यालगतच्या वस्त्यांत दाणादाण उडाली. गेल्या वर्षी २५ सप्टेंबरच्या रात्री असाच पाऊस कोसळून आंबिल ओढ्याला पूर आला होता. त्यातून जो हाहाकार उडाला होता, त्याच्या आठवणीने यंदा पुन्हा अनेकांच्या मनाचा थरकाप उडाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या जलप्रलयातून महापालिका; तसेच प्रशासनाने गांर्भीयाने कोणताच बोध घेतला नसल्याचे यंदा पुन्हा स्पष्ट झाले. 

या साऱ्या प्रकरणात केवळ निसर्गाकडे बोट दाखवून चालणार नाही. पुण्यात असा कधी पाऊस पडतच नाही, दोन तासांत इतका प्रचंड पाऊस कोसळला, तर असेच होणार असे सांगत महापालिकेच्या कारभाऱ्यांना, प्रशासनाला पळ काढता येणार नाही. यंदाचे सुदैव एवढेच, की नऊला सुरू झालेला रौद्र पाऊस अकराच्या सुमारास कमी झाला. तो आणखी काही काळ तसाच कोसळला असता, तर ‘न भूतो न भविष्यती’ अशा संकटला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागले असते. 

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम काय? 
आपत्ती होऊन गेल्यावर जर आपत्ती व्यवस्थापन विभाग जागा होणार असेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. हवामान विभागाने शहरात बुधवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. 

याचा अर्थ त्या दिवशी शहरात ६४.५ ते ११५.५ मिलिमीटर पाऊस कोसळणार हे हवामान खात्याने सांगितलेच होते. ‘ऑरेंज ॲलर्ट’ याचा अर्थच संबंधित यंत्रणांनी त्यावर पाऊले उचलणे असा अध्याहृत आहे; मात्र, प्रत्यक्षात पुण्यात त्यावर या आपत्ती व्यवस्थापन विभागाने काही ठोस कार्यवाही केल्याचे दिसले नाही. सखल भागात राहणाऱ्या लोकांना वेळीच सुरक्षित जागी हलवणे, जेथे ओढ्याला पूर येतो, तेथे सुरक्षारक्षक ठेवणे हे सोडाच; किमान नागरिकांना या धोक्‍याची पूर्वसूचना देण्याची तसदीही या विभागाने घेतल्याचे दिसले नाही. पावसाचे बदलते स्वरूप पाहता कागदोपत्री असलेला हा विभाग आता सक्षम करायला हवा. भविष्यात असे संकट दरवर्षी येणार हे गृहीत धरून या विभागाने ‘एसओपी’ तयार केली पाहिजे. 

आत्मपरीक्षण करण्याची वेळ 
गेल्या वर्षी आंबिल ओढ्याला (लांबी १६ किलोमीटर) पूर आला. यंदा या ओढ्याप्रमाणेच भैरोबा नाला (१७ किलोमीटर) व नागझरी नाल्याचेही (१० किलोमीटर) पाणी लगतच्या सोसायट्या व वस्त्यांत शिरले. याचा मध्यवर्ती भागातील पेठांनाही तडाखा बसला. आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या भागातील रहिवाशांना वारेमाप आश्‍वासने दिली होती. त्यातील किती पूर्ण केली याचे आता प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले तरी पुरेसे आहे. 

त्यावेळी सोसायट्यांच्या पडलेल्या भिंतीची पाहणी झाली. त्या बांधून देण्याचे आश्‍वासनही देण्यात आले. त्यासाठी साधारणपणे १२२ कोटी खर्च येणार होता; पण तो कोणी करायचा यावर महापालिका व राज्य सरकारचे एकमत झाले नाही. शेवटी कोणीच काही केले नाही. अखेर याचा भुर्दंड सोसायट्यांतील नागरिकांवर आला. ज्यांची ऐपत आहे त्या सोसायट्यांनी कशाबशा भिंती उभारल्या. यंदा यातील काही सोसायट्यांच्या भिंती पुन्हा कोसळल्या आहेत. 

रिंटेनिग वॉल हवीच 
महापालिकेने आंबिल ओढ्यात गेल्या वर्षी पडलेला राडारोडाही काही ठिकाणी अजून काढलेला नाही. ओढ्यात येणारी झाडेही तोडलेली नाहीत. जागोजागी फूटपाथ, त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणे, चौकांचे सुशोभीकरण करणे, ओपन जिम उभारणे अशा कामांवर कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या महापालिकेला किमान आंबिल ओढ्याच्या लगतच सीमाभिंत बांधणे अशक्‍य नाही. या ओढ्याच्या बाजून रिटेनिंग वॉल उभारण्यासाठी आता स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी रहिवाशांनीही नगरसेवकांवर दबाव आणला पाहिजे. त्याचप्रमाणे आंबिल ओढ्याची रुंदी २० मीटर करण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली पाहिजे. तसेच शक्‍य त्या ठिकाणी गाळ काढून खोली वाढवली पाहिजे. त्याचप्रमाणे नऱ्हे, आंबेगाव परिसरातील अनेक ठिकाणीचे ड्रेनेजचे पाणी थेट आंबिल ओढ्यात सोडले जाते. त्यावरही तातडीने उपाययोजन करायला हव्यात. ओढा हा पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी असतो. सांडपाणी सोडल्याने त्याची बारमाही गटार होत आहे. 

नाल्यांतील अतिक्रमणे हटवा 
शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या भैरोबा व नागझरी नाल्याच्या आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अनेक ठिकाणी तारेचे कुंपण तुटले आहे. काही ठिकाणी नाल्यांतच बांधकामे आहेत, स्लॅब टाकले आहेत. या भागात दाट लोकवस्ती आहे. यंदा या भागातही अनेकांच्या घरात पाणी शिरले, सामान वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे या नाल्यांतील अतिक्रमणे दूर करण्यासाठी व्यापक पाऊले उचलणे गरजेचे आहे. 

केवळ रस्ते चकाचक नकोत 
शहरात गल्ली- बोळांत सिमेंटचे रस्ते करण्याचा सपाटा लावल्याचे सहज जाणवते. मात्र, हे रस्ते करताना पावसाळी गटारांकडे साफ दुर्लक्ष होत आहे. एकीकडे अतिक्रमणाने नाले, ओढे आक्रसले आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवरचे पाणी जायला मोकळी वाट नाही. अशा दिखाऊ कामांमुळे काहीच साध्य होणार नाही, याचा बोध आता घेण्याची वेळ आली आहे. शहरातील किमान दहा ते पंधरा लाख लोकसंख्येला ओढे, नाल्यांना आलेल्या पुराचा थेट फटका दरवर्षी बसत आहे. दरवेळी अचानक कोसळणाऱ्या पावसाला दोष देऊन भागणार नाही. यावर वेळीच सावध होऊन यावर उपाययोजना केल्या नाहीत, तर हे भविष्यातील मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखेच होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT