पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. ३) दिवसभर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा आणि मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा कच्ची घरे, शाळा, अंगणवाड्या, किचन शेड, स्मशानभूमी शेड, झाडे, विजेचे खांब, फळबागा, भाजीपाला आणि ऊसाला बसला आहे. यामुळे तीन व्यक्ती आणि तीन जनावरांचा बळी गेला आहे.
पुणे जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. यामुळे १ हजार २५३ घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५०० ग्रामस्थांना निवाऱ्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हलविण्यात आले आहे. यामुळे शेतीचे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावरील फळबागा आणि पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक तडाखा हा खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव आणि भोर, वेल्हे या डोंगरी भागातील तालुक्यांना बसला असल्याचे पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.
दरम्यान, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला असून, आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. आंबा व केळीच्या बागा, फुलबागा, पाॅली हाउसेस, ग्रीन हाऊसेस मोठे नुकसान झाले आहे. शिवाय फुलांचा बहर आलेल्या डाळिंब व अंजीर बागांनाही याचा जोरदार फटका बसला असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नुकसानीची संक्षिप्त स्थिती
- कच्ची घरे, झाडे, विजेचे खांब, फळबागा आणि उसाचे मोठे नुकसान.
- नुकसानीत १२५३ कच्च्या व २० पक्क्या घरांचा समावेश.
- जिल्हा परिषदेच्या ३१ शाळा, ५७ अंगणवाड्या व ४ ग्रामपंचायतींवरील पत्रे उडाले.
- तीन जनावरे दगावली.
- जिल्ह्यात चक्रीवादळाचे तीन बळी.
- बळींमध्ये खेड तालुक्यातील मायलेकाचा समावेश.
- डोंगरी तालुक्यांमध्ये प्रचंड मोठे नुकसान.
- खेड तालुक्यातील पश्चिम डोंगरी भागातील अनेक शाळा, अंगणवाड्या स्मशानभूमी शेड उडाले.
- खेड तालुक्यातील शिवे गावात ५० हून अधिक घरांवरील पत्रे उडाले.
- शिवे गावातील २०० हून अधिक ग्रामस्थांना सार्वजनिक ठिकाणी हलवले.
...प्रसंगी विशेषाधिकार वापरा : बुट्टे पाटील
जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे घर उध्वस्त झाल्याने, त्यांचे प्रपंच रस्त्यावर आले आहेत. अशा कुटुंबांना तातडीने मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेने युद्धपातळीवर निर्णय घ्यावेत. या कुटुंबांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी प्रसंगी अध्यक्षांच्या विशेषाधिकाराचा वापर करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.