कडूस (पुणे) : कोरोना तपासणीच्या बाबतीत खासगी व सरकारी प्रयोगशाळांच्या परस्परविरोधी रिपोर्टच्या घोळाचे लोण आता खेड तालुक्यापर्यंत पोचले आहे. दोन दिवसांपूर्वी खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह निदान झालेल्या कडूस (ता. खेड) येथील कोरोना योद्धा असलेल्या हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या स्वॅबचा शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना एका बाजूला हायसे वाटले आहे, तर दुसऱ्या बाजूला मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
कडूस येथील तरुणाचा दोन दिवसांपूर्वी खासगी लॅबचा स्वॅब तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्याचा स्वॅब राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवला होता. पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे गावठाण कंटेन्मेंट झोन, तर आजूबाजूचा परिसर बफर झोन घोषित केले व संपर्कात आलेल्या घरातील सतरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवले होते. याचा अहवाल सोमवारी (ता. 16) सायंकाळी मिळाला. त्यात खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचा व त्याच्या संपर्कात आलेल्या सतरा, अशा एकूण अठरापैकी सतरा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर घरातील एका तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी दिली.
खासगी आणि शासकीय प्रयोगशाळेचे अहवाल परस्परविरोधी आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अहवाल नक्की पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे म्हणाले, 'सरकारी रिपोर्ट जरी निगेटिव्ह असला, तरी रुग्ण बरा होईस्तोवर त्याच्यावर उपचार केले जातील. त्यानंतर पुन्हा तपासणी केली जाईल.'
हा तरुण लॉकडाउनच्या काळात गावात कोरोना योद्धा म्हणून काम करत होता. हॉटेल व्यवसाय व कोरोना योद्धा म्हणून गावात पुढाकार असल्याने तरुणाच्या संपर्काची व्याप्ती मोठी आहे. खासगी लॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. ग्रामस्थ शासकीय लॅबच्या रिपोर्टकडे नजरा लावून बसले होते. राष्ट्रीय विषाणू संस्थेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना हायसे वाटले आहे, तर तरुणाच्या संपर्कात आलेल्या मित्र परिवार, नातेवाईक व राजगुरूनगर येथील उपचार केलेल्या खासगी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमधील परस्परविरोधी अहवालाच्या घटना वाढत आहेत. मागील आठवड्यात उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार झाला होता. परस्परविरोधी रिपोर्टच्या घोळाचे लोण आता खेड तालुक्यात पोचले आहे. त्यामुळे कोरोनाबाबत नागरिकांमध्ये आणखी संभ्रम पसरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.