जिल्ह्यातील १०० गावठाणांची मोजणी; पाच वर्षांचे काम शंभर दिवसांत
पुणे - गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात भूमी अभिलेख खाते उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १०० गावांच्या गावठाणांची मोजणी आत्तापर्यंत पूर्ण झाली आहे. पारंपरिक पद्धतीने प्रत्यक्षात या कामासाठी पाच वर्षे लागली असती; मात्र ड्रोनमुळे हे काम अवघ्या १०० दिवसांत झाले आहे. त्यामुळे या गावांतील सुमारे दीड लाखाहून अधिक नागरिकांना आता लवकरच मालकी हक्काचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. पुढील पाच महिन्यांत पुणे जिल्ह्यातील बहुतांश गावांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आता भूमी अभिलेख विभागाकडून ठेवण्यात आले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावी करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती.
सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणीसाठी १५ ते ३० दिवस लागतात; मात्र ड्रोनच्या साह्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता.
नागरिकांचे काय होणार फायदे
पुणे जिल्ह्यातील हवेली, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांतील सुमारे १०० गावांच्या गावठाणांच्या मोजणीचे काम ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. आता लवकरच या गावांतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे, साताऱ्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील गावांच्या गावठाणांच्या मोजणीचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे.
- किशोर तवरेज, उपसंचालक, भूमी अभिलेख विभाग
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.