पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने सुरूच आहे. आजही जिल्ह्यात ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडलेत. त्यामुळे अनेक रुग्णांना सध्या हाॅस्पीटलमध्ये जागाही मिळत नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना वाढविण्याची गरज निर्माण झालेली आहे.
दौंड : दौंड शहर व परिसरात आज तब्बल १३ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. सात महिला व सहा पुरूषांचा बाधितांमध्ये समावेश आहे. दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ७८ जणांचे घशातील स्त्राव (स्वॅब) तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार स्टेट बॅंक शाखा परिसर ४, महात्मा गांधी चौक २, शालीमार चौक २, सुतारनेट, गजानन सोसायटी, सरपंच वस्ती, पंडीत नेहरू चौक आणि गोपाळवाडी (ता. दौंड) येथील प्रत्येकी १, असे एकूण तेरा जणांना बाधा झाली आहे. बाधितांचे वय १४ ते ७३ या दरम्यान आहे. दौंड उप जिल्हा रूग्णालयाच्या वतीने १ मे ते १६ जुलै अखेर एकूण २०३५ नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २१५ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली तर तब्बल १४७ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. ०९ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ५९ बाधितांवर दौंड शहरातील दोन कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.
वेल्हे : वेल्हे तालुक्यात कोरोनाने दुसरा बळी घेतला असून, निगडे मोसे येथील एका ७४ वर्षीय जेष्ठाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, दापोडे येथील एका ४२ वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या पन्नाशीवर पोहचली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
वेल्हे तालुक्यातील बत्तीस जणांचे स्वॅब १५ जूलै रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन जणांचे रिपोर्ट येणे बाकी होते. या तीनही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, काल (ता. १६) २९ जणांना उशिरा तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दापोडे येथील एका ४२ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॅाझिटिव्ह आला आहे. उर्वरित २८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तालुक्याची एकूण बाधित रुग्णांची संख्या ५० वर पोहचली असून, ३६ जणांनी कोरोनावर मात केली असून, साखर येथील एका ज्येष्ठ महिलेचा व निगडे मोसे येथील एका ७४ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तालुक्यातील इतर बारा रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. रुळे व निगडे मोसे गावातील कोरोनाची साखळी तुटली आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचे शोध घेणे चालू होते. गेल्या तीन दिवसांत वेल्हे तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असल्याने प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलिस यंत्रणा अहोरात्र काम करत आहे.
इंदापूर : इंदापूर शहर व तालुका परिसरात १५ जुलै रोजी एकाच दिवशी १५ जणांचेकोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ६१ जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ जण कोरोना बाधित असल्याचे अहवाल आल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. या कोरोनाबाधितांमध्ये इंदापूर शहर दत्तनगर येथील ३ व शाहूनगर येथील १, असे एकूण ४, इंदापूर तालुक्यातील कळंब येथील १, निमगाव केतकी येथील ३, वरकुटे खुर्द येथील ५, अकोले येथील १, अशा एकूण १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण आज तीनशेच्या उंबरठ्यावर पोचले आहेत. आज तालुक्यात कोरोनाचे १७ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता २९४ झाली आहे. तालुक्यात आज सूसला सर्वाधिक म्हणजे आठ रुग्ण सापडले. आज सूसला आठ तर भुकूम, बावधन, पौड, उरवडे व मुळशी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये बारा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या १११ झाली आहे. आज तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली असून, तिघेजण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
शिरूर : शिरूर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज दोनशेपार गेला. आज शहरात एका डॉक्टरसह तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने शहराच्या भितीत भर पडली. तालुक्यातही आज सात जणांना कोरोनाची बाधा झाली.
शिरूर शहरात उद्या (ता. १८) संध्याकाळपासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, सुरवातीचे पाच दिवस कडक, तर नंतरचे पाच दिवस काही अटी शिथिल करून लॉकडाऊन पाळले जाईल, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. शिरूर शहराबरोबरच़ शिरूर (ग्रामीण) ग्रामपंचायतीमधील बाबूराव नगर, जाधव मळा, बालाजी एम्पायर, शिवरक्षा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओमरूद्रा सोसायटी, ओएसिस सोसायटी, सावता माळी नगर आणि तर्डोबाची वाडी ग्रामपंचायत हद्दीतील बाफणा मळा हा परिसर देखील मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याने तेथेही लॉकडाऊन असेल. गुरूवार (ता. २३) पर्यंत पूर्ण लॉकडाऊन असेल़. या काळात शहर शंभर टक्के बंद असेल़. दूध पुरवठा, दवाखाने, मेडीकल या काळात चालू असतील आणि कंपन्यांतून कामाला जाणारांना कामालाही जाता येईल. शुक्रवार (ता. २४) पासून पुढे बुधवारपर्यंत (ता. २९) अत्यावश्यक सेवा सकाळी आठ ते बारा या वेळेतच चालू राहतील.
दरम्यान, तालुक्यातील कोरोना बाधितांमध्ये आज नव्याने दहा जणांची भर पडली असून, त्यातील तिघे शहरातील आहेत. कोरेगाव भीमा येथील दोघांचा, शिक्रापूर येथील चौघांचा व तळेगाव ढमढेरे येथील एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आजअखेर २०४ झाली असून, आतापर्यंत सातजणांचा मृत्यु झाला आहे. बाधितांपैकी ६२ जण ठणठणीत झाले. तालुक्याच्या विविध भागातील २२ जणांवर येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार चालू असल्याचे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले. यापूर्वी सातजणांवर येथे उपचार करून बरे झाल्याने सोडून दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भोर : नागरिकांचा हालगर्जीपणामुळे भोर शहर आणि तालुक्यात कोरोनाग्रस्तांची सख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी कोरोनाचे आणखी १० रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५६ झाली आहे. तर शुक्रवारी सकाळी १२ जण उपचार घेवून घरी गेले आहेत. आजपर्यंत तालुक्यातील एकून ६७ रुग्णांनी कोरोनाच्या आजारावर मात करून घरी परतले आहेत. बुधवारी (ता.१५) सायंकाळी १९ जण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शुक्रवारी पुन्हा १० जण कोरोनाग्रस्त झाले असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे. शुक्रवारी सकाळी संगमनेर व वेळू येथील प्रत्येकी २, शिंदेवाडीमधील ४ आणि कांजळे व पोंबर्डी येथील प्रत्येकी १ असे १० रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत तालुक्यात १२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ६७ जण उपचार घेवून आपापल्या घरी पुन्हा गेले आहेत. तालुक्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
लोणी काळभोर : हवेली तालुक्यात सलग तिसऱ्या कोरोनाने आपली घौडदौड चालूच ठेवली असून मागिल चोविस तासात हवेलीत तब्बल कोरोनाचे ८४ नवीण रुग्ण आढळुन आले आहेत. हवेली तालुक्यामधील एकुण कोरोनाबाधित रुग्णांची संख्य़ा तेराशेवर पोचली असून सध्या तालुक्यात ७३६ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे.
मांजरी बुद्रुक (१२), मांजरी खुर्द (१), भिलारेवाडी (७), बिवरी (१), डोंगरगाव (४), कदमवाकवस्ती (१), देहु (३), गोगलवाडी (१), गुजर-निंबाळकरवाडी (३), खेड-शिवापुर (१), किरकिटवाडी (१), कोरेगाव मुळ (१), कुडजे (३), लोणी कंद (५),
लोणी काळभोर (२), मालखेड (४), नांदेड (९), नऱ्हे (२), शिंदेवाडी (२), श्रीरामनगर (१), उरुळी कांचन (१), वरदाडे (१), वडकी (३), वडगाव शिंदे (१) व वाघोली (१४), या ग्रामपंचायत हद्दीत एकूण ८४ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, आज दिवसभरात ४६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण दुपटीचा वेग नऊ दिवसांवर पोचला आहे.
राजगुरूनगर : खेड तालुक्यात कोरोनाबाधितांमध्ये गेल्या 24 तासांत 31 जणांची भर पडल्याने संख्या 568 वर पोचली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी दिली. गेल्या 24 तासांत चाकणला 3, आळंदीला 7, कुरुळीला 5, चऱ्होलीला 3, वडगाव घेनंदला 3, खराबवाडीला 2, वाकी बुद्रुकला 2, दावडीत 2 रुग्ण आढळले. नाणेकरवाडी, कुरकुंडी, वाडा, काळूस येथे प्रत्येकी एक कोरोनाबधित आढळला.
मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या 116 झाली असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 299 जणांचे नमुने पाठविले असून अहवाल प्राप्त होईपर्यंत नागरिकांची व प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये मंचर 6, निघोटवाडी 2, नारोडी एक, घोडेगाव 2, रांजणी एक. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 128 झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. 61 जणांवर उपचार सुरू आहेत. 63 जणांना उपचार करून घरी सोडले आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कोरोनाचा एकूण रुग्ण 239 असून बरे झालेले 83 आहेत 150 उपचार घेत असून 06 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील जोखमीच्या गटातील नागरीकांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याची सुविधा घरभेटी देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी येथे दिली. सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याऱ्या गोळ्यांचे वाटप जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आशिष हिंगे, रोहीदास गोरडे तसेच सावरगांव व येणेरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. भोर, डॉ. दीपाली भवारी, डॉ. हेमलता शेखरे व आशा सेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
Edited By : Nilesh J. Shende
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.