पुणे : भोर व वेल्हे तालुक्यातील नागरिकांना चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावे कालपासून अंधारात आहेत. घरांचे व सरकारी इमारतींचे पत्रे उडून झालेले नुकसान मोठे आहे. दोन्ही तालुक्यात पंचनाम्यांना सुरवात झाली आहे.
भोर : भोर तालुक्यात चक्रीवादळामुळे झाडे पडली, विजेचे खांब पडून तारा तुटल्या, घरांचे व मंदिरांचे छप्पर उडून गेले, तर काही ठिकाणी लोखंडी कमानीही तुटल्या. सुदैवाने वादळी पावसामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले.
भोर तालुक्यात वादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसलेला असून, २८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा
खंडित झाला होता. तालुक्यातील सर्वाधिक भाग हा दुर्गम असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात उशीर होत आहे. काल वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आज सकाळपासून महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाचे कर्मचारी गेलेले आहेत.
हिर्डोशी येथे प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. अंबाडे येथे ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी कमान कोसळली. शिरवली हिमा येथे विजय किसन दिघे यांच्या घरावरील छप्पर व कौले उडाली. कारुंगण येथे वादळामुळे महादेव रावजी गोडावळे, बाबूराव रावजी गोडावळे, बाळू जगू गोडावळे, दगडू धोंडू गोडावळे, कांशिराम गोडावळे, यशवंत जगू गोडावळे व शंकर जगू गोडावळे यांच्या घरांसह काळूबाई मंदिराचे छप्पर व कौले उडून गेली कुडली बुद्रुक येथे लक्ष्मण सखाराम इंदलकर यांच्या घराची कौले उडाली.
वादळामुळे भोर उपविभागात महावितरणच्या १४ उच्चदाबवाहिन्या व ७६८ रोहित्रे नादुरुस्त झाल्यामुळे २८ हजार ६०० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी गुरुवारी २ वाजेपर्यंत १३ उच्चदाब वाहिन्या, १११ गावे, ६२ रोहित्रे कार्यान्वित करून २५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. उच्चदाब वाहिनीचे १२ खांब व लघुदाब वाहिनीचे २८ खांब हे चक्रीवादळामुळे उन्मळून पडले. अद्यापही ३७ गावांतील ३ हजार ५०० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित आहे. भोरचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे गुरुवारी दिवसभर भोरमध्ये तळ ठोकून आहेत.
विजेचे खांब पडल्यामुळे कारी, रावडी, रायरेश्वर, नाटंबी, अंगसुळे, भावेखल, सांगवी, करंजे, चिखलावडे खुर्द चिखलावडे बुद्रुक, नाझरे, वडतुंबी, रावडी, वावेघर, धोंडेवाडी, कर्नावड, कोर्ले, ओहोळी, पाकिरे वस्ती, करंजेवाडी, चिखलगाव, म्हाकोशी, टिटेघर, पान्हवळ, आंबवडे, डेरे, भांड्रवली, सुतारवाडी, ब्राम्हणघर, नांद, उत्रौली, माळवाडी, जयतपाड, पांगारी, किकवी व उबंर्डे या गावांचा वीज पुरवठा अद्यापही बंद आहे.
वेल्हे : वेल्हे तालुक्यामध्ये काल झालेल्या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, तालुक्यातील शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यालगत असलेल्या गावांना बसला आहे. येथील गारजाईवाडी गावातील अनेक घरांची व गोठ्यांची छप्परे उडाली, तर भिंत कोसळुन आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केळद येथील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. निम्मापेक्षा अधिक तालुका अंधारात आहे. या परिसरात महावितरणकडून युद्ध पातळीवर विद्युत प्रवाह सुरु करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत.
वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी माहिती दिली की, तालुक्यामध्ये काल झालेल्या वादळामध्ये ७६६ घरांचे
नुकसान झाले असून, तालुक्यातील चार मंडलमधील अंबवणे मंडलमध्ये २११, वेल्हे मंडल १९७, पानशेत मंडल १९१, विंझर मंडलमध्ये १६७ घरांचे अंशता नुकसान झाले असून, आज सकाळी विंझर, मार्गासनी, साखर, वाजेघर, गुंजवणे, पानशेत परिसराची पाहणी केली असून, तत्काळ पंचनामे पंचनामे करण्यात सुरवात झाली आहे. तालुक्यातील हानी पोहचलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे व संतरंजी, ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाकडुन संयुक्त पंचनामे चालू आहेत. तालुक्यात 766 घरांचे नुकसान झाले आहे.
गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी सांगितले की, तालुक्यामध्ये मालवली, वडघर, सोंडे सरपाले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले.विठ्ठलवाडी, भोरडी, खामगाव येथील अंगणवाडींचे पत्रे उडाले. चिरमोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताचे पत्रे उडाले. रुळे, सिंगापूर, बालवड, खाटपेवाडी, पाल खुर्द या प्रशासकीय इमारतींचे पत्रे, तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. अंबवणे येथे काशिनाथ ननावरे यांची भिंत कोसळली. मार्गासनी येथे संपत रामचंद्र मोहिते यांच्या घराचे पत्रे उडाले. साखर येथे बाळकृष्ण गायकवाड यांच्या घरावरील पत्रे उडाले. वेल्हे येथील स्वप्निल पांगारे, पांडुरंग हिरवे, गंगूबाई कचरे, भाऊ बोरकर, विजय गालिंदे यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसेच, सौर ऊर्जेचे खांब पडले असून, अनेक झाडे पडली आहेत. अंत्रोली येथे शांताबाई सीताराम राऊत यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत. या गावातील इतर पंधरा ते वीस घरांचे नुकसान झाले आहे. धानेप येथे शंकर बबन चाळेकर यांच्या शेतघरावरील पत्रे उडाले, तर फळबागांचे मोठे नुकसान झाले.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते यांनी सांगितले की, उच्च वाहिनीचे १३, तर लघू वाहिनीचे १७ पोल पडलेले आहेत. पाबे, विंझर, अंत्रोली, जाधववाडी, पासली, बोपे, कुंबळे, गुहिनी, खुलशी, घेवंडे, घिसर, हारपूड, बालवड, भुतोंडे, भट्टी, कुरणवाडी, शेणवड, कोदापूर, केळद, निगडे खुर्द, वरोती, सिंगापूर, एकलगाव, बार्शीमाळ, वांगणी, वांगणीवाडी, मांगदरी, केतकावणे, कोळवडी, कातवडी, लव्ही खुर्द, आवळी, दादवडी, चिरमोडी, गुंजवणे आदी गावांमध्ये विजेचे खांब पडले असून, अनेक ठिकाणी तारा तुटल्या असून, वीज पुरवठा खंडित आहे.
वेल्हे तालुक्यात आज सकाळपासून पाऊस व वा-याचा जोर कमी होता. अनेक ठिकाणी ऊन पडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. आज सकाळी अकरा वाजल्यानंतर तालुक्याच्या अनेक भागात
पावसाने सुरवात केली होती, परंतु कोठेही वादळ वारे नाही. आज कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
तालुक्यातील मार्गासनी, मालवली, साखर, कोंढवली, लव्ही, आवळी, दादवडी, वाजेघर, गुंजवणे या परिसरात तहसीलदारांनी भेटी देऊन पाहणी केली, तर नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व मंडलाधिकारी यांना दिले.
तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना सतरंजी व ब्लॅंकेटचे व जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काल झालेल्या वादळी वा-यामुळे महावितरण कंपनीचे नुकसान झाले असून, तालुक्यामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत होणेसाठी युद्ध पातळीवर काम सुरु असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते यांनी दिली. तालुक्यातील प्रशासकिय इमारतीचे झालेले नुकसान पाहणीसाठी गटविकास अधिकारी विशाल शिंदे हे अनेक गावांना
भेटी देत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.