Cyber_Crime
Cyber_Crime 
पुणे

कॉसमॉस बॅंक प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार मुंबईचा; इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा कॉसमॉस बॅंकेवरील 94 कोटी 42 लाख रुपयांच्या सायबर हल्ला प्रकरणाच्या टोळीचा मुख्य सुत्रधार हा मुंबईचा असून त्याने भारतातून पलायन करत दुबई गाठल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संबंधीत प्रकरणात इंटरपोलने 11 ऑगस्ट रोजी मुख्य सुत्रधाराविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावल्याने पुणे पोलिसांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. 

कॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयात 11 ते 13 ऑगस्ट 2018 या कालावधीमध्ये मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून सायबर गुन्हेगारांनी तीन दिवसात 94 कोटी रुपये 42 लाख रुपये लुटले होते. त्यापैकी बहुतांश रक्कम भारतासह जगभरातील 28 देशांमधील एटीएममधून काढण्यात आली होती. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेममधील ए.एल.एम ट्रेडिंग लिमिटेड या खात्यावर 13 कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. 

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे आणि त्यांच्या पथकाने दुसऱ्या महिन्यातच मुंबईतील भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोघांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून तब्बल 18 जणांना अटक करुन त्यांच्याकडून 22 लाखांहून अधिक रक्कम मिळविली होती. तर हॉंगकॉंगच्या हेनसेंग बॅंकेत वर्ग झालेल्या 13 कोटी रुपयांपैकी पाच कोटी रुपये परत मिळविण्यात सायबर पोलिसांना नुकतेच यश आले आहे. 

सायबर पोलिसांनी केला नेपाळ सीमेपर्यंत पाठलाग 
या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील आहेत. तर टोळीचा मुख्य सुत्रधारदेखील मुंबईचाच असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्यास अटक करण्यासाठी सापळा रचला होता. दरम्यान, त्याने पोलिसांना गुंगारा देत उत्तर प्रदेश गाठले. त्यानंतर पायगुडे व त्यांची टीम त्याच्या मागावर उत्तर प्रदेशात पोचली. मात्र पोलिसांची कुणकुण लागताच तो तेथून निसटून नेपाळला पोचला. तेथून त्याने दुबई गाठली. मुख्य सुत्रधारानेच रुपे कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे कार्ड क्‍लोनींग तयार केले. त्याच क्‍लोनिंग कार्डचा वापर करुन त्याच्या साथीदारांनी भारतासह 28 देशांमधील बॅंका व एटीएममधून पैसे काढले होते.

* बनावट कार्ड - 423 
* भारतातील एटीएममधून काढलेली रक्कम - अडीच कोटी 
* झालेले व्यवहार - 2 हजार 800 
* व्हिसा कार्ड - 78 कोटी (व्यवहार 12 हजार) 
* रुपे - अडीच कोटी (व्यवहार 2449) 
* स्विफ्ट ट्रान्झॅक्‍शन 13 कोटी 92 लाख (व्यवहार 3) 

* भारतासह 28 देशातून एकाचवेळी काढले पैसे 
* देशातील 41 शहरांमधील 71 एटीएम केंद्रातून काढले पैसे 
* कोल्हापुरमधून सर्वाधिक 89 लाख रुपये काढण्यात आले 
* आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या - 18 

''कॉसमॉस सायबर हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा मुंबईचा आहे. त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा सायबर हल्ला केला होता. आत्तापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. तर मुख्य सुत्रधार हा दुबईत असल्याचे समजल्यानंतर 11 ऑगस्ट रोजी इंटरपोलने त्याच्या अटकेसाठी रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.''
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT