पुणे : ""सिग्नल लागल्यावर गाडी किती वेळ बंद करायची, कधी सुरू करायची, हे टाईमर असल्यामुळे समजण्यासाठी सोपे जाते. पण, शहरातील सर्वच चौकांत असे टाईमर असतील, तर आणखी सोपे जाईल. पेट्रोलही वाचेल,'' सांगत होतो दुचाकीचालक प्रशांत शेवडे. काही चौकांमध्ये लावलेल्या टाईमरमुळे दुचाकी चालविण्याचा ताण काही क्षण तरी कमी होतो, असे त्यांना वाटते. दुचाकीस्वारांची ही प्रातिनिधिक इच्छा महापालिका आता पूर्ण करणार असून शहरातील सर्वच सिग्नलवर 15 सप्टेंबरपर्यंत डिजिटल टाईमर बसविण्यात येणार आहेत.
पुणे हे दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रमुख चौकांमध्ये वाहनचालकांना लाल दिवा लागल्यावर 40 ते 120 सेकंद थांबावे लागते. लाल दिवा लागल्यावर टाईमरमुळे किती वेळ थांबावे लागणार हे वाहनचालकांना समजते. त्यामुळे ते त्यांची दुचाकी अथवा चारचाकी वाहनाचे इंजिन बंद करतात. त्यामुळे इंधनाचीही बचत होते, असेच वाहनचालकांचे म्हणणे आहे.
दररोज सुमारे सहा-सात किलोमीटर दुचाकी चालविणाऱ्या मोना देव-जोध म्हणाल्या, ""सध्या प्रमुख चौकांत बसविण्यात आलेले हे टाईमर शहरातील सर्वच चौकांत बसविणे गरजेचे आहेत. त्याचा वाहन चालविताना उपयोग होतो. तसेच सिग्नलची वेळ संपत असेल तर, वाहन थांबविता येते. मात्र, काहीजण त्यातही वाहन पुढे नेतात, हे धोकादायक आहे.''
याबाबत महापालिकेच्या विद्युत विभागातील मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल म्हणाले, ""देशातील अनेक शहरांतील सिग्नलवर डिजिटल टाईमर आहेत. त्या धर्तीवर पुण्यातही बसविण्यास यापूर्वीच प्रारंभ केला आहे. मध्यंतरीच्या काळात काही पोलिस अधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे बसविलेले टाईमर काढून टाकले होते. मात्र, आता पुन्हा टाईमर बसविण्यास सुरूवात केली आहे. त्याला वाहनचालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सर्वच सिग्नलवर लवकरच टाईमर बसविले जातील.''
सिग्नलला डिजिटल टाईमर आवश्यक आहेच. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास काही प्रमाणात मदत होते. मात्र लाल, पिवळा आणि हिरवा दिव्यानुसार टाईमर हवेत. चौकाच्या गरजेनुसार त्यात काही प्रमाणात बदल केल्यास पादचाऱ्यांनाही सुविधा मिळेल. याबाबत काही सूचना महापालिकेच्या सिग्नल विभागाला देण्यात आल्या आहेत.
- सुरेंद्रनाथ देशमुख, सहायक पोलिस आयुक्त
पुण्यातील स्थिती
- वाहनांची संख्या : सुमारे 40 लाख
- दुचाकी वाहने : सुमारे 30 लाख
- शहरातील एकूण सिग्नल : 248
- डिजिटल टाईमर : 110 चौकांमध्ये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.