editorial-articles

भाष्य : अस्मानी संकट, की कर्माची फळं?

युरोपात महापुराने सरकारे आणि जनतेची दाणादाण उडवली आहे.

डॉ. सतीलाल पाटील

युरोपात महापुराने सरकारे आणि जनतेची दाणादाण उडवली आहे. हे अस्मानी संकट आहे, की प्रदूषणाकडे केलेल्या दुर्लक्षाची परिणती आहे? दुसऱ्याच्या भूमीचा विनाश करणाऱ्या युरोपीय देशांना त्यांच्याच कृत्याची फळे भोगावी लागत आहेत.

गेल्या काही दिवसांत युरोपमधील पुराच्या बातम्या आपण ऐकतोय. जवळपास २०० लोकांचा बळी गेला. पुरामुळे युरोपीय देशात हाहाकार माजलाय. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम, इटली, लक्सम्बर्ग, नेदरलँड, स्वित्झर्लंड, ब्रिटन या देशांना पुराचा फटका बसला आहे. जर्मनीत सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. दोनशेपैकी १६० बळी एकट्या जर्मनीत गेले आहेत. आपल्याकडे उत्तराखंडमधील पुरात ७२ जण दगावले होते. आपल्या लोकसंख्येची घनता युरोपपेक्षा जास्त आहे. यावरून युरोपतील पुराची तीव्रता लक्षात येईल. शिवाय, आपल्यासारखी पूर संकटांची सवय युरोपला नाही. त्यांच्याकडे यापूर्वी १९८५ मध्ये ‘व्हाल डी साटा’ धरण फुटल्याने आलेल्या पुरात २६८ लोक मरण पावले होते. १९८५ नंतर जन्माला आलेल्यांनी असा महापूर पहिल्यांदाच अनुभवलाय. (Bhashya azure crisis or impact of karma aau85)

आता प्रश्न हा आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पूरसंकट कसे आले. १४-१५ जुलैला अचानक १००-१५० मिलीमीटर पाऊस कोसळला. एवढा पाऊस या देशांत २-३ महिन्यांतही पडत नाही. लहानलहान नद्या-नाले फुगले आणि गावा-शहरात पाणी घुसले. मोठ्या शहरात प्रमुख नद्यांसाठी पूरनियंत्रक यंत्रणा भक्कम होत्या. तथापि, लहान नद्या-नाले ज्या गावातून आणि छोट्या शहरातून जायचे, ते जलमय झाले. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, तेथील पुराचा इशारा देणाऱ्या ‘फ्लड अलर्ट सिस्टीम’ने दगा दिला.

लोक, पर्यावरणाचे शोषण

हे झाले रोगाचे लक्षण. पण त्याचे मूळ आहे पर्यावरण बदलात. जगभरातल्या पर्यावरणाच्या हानीमुळे जागतिक तापमानवाढीचा वेग वाढतोय. सहाजिकच पृथ्वीचे तापमानही वाढतंय. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, धरतीला ताप आलाय. तिच्या घामामुळे वाढलेल्या बाष्पीभवनामुळे जास्तीची पाण्याची वाफ ढगात पोहोचते. अचानक अतिवृष्टीचा धोका वाढला. हा ताप जेवढा चढेल, तेवढा मानवाच्या डोक्याचा ताप वाढणार. तो उतरवण्यासाठी हव्या असणाऱ्या थंड पाण्याच्या जंगलांच्या पट्ट्या आपण ओरबाडून काढतो आहे. तिच्या स्वास्थ्यासाठीची शुद्ध हवा औद्योगिक धुराड्यांनी हिरावून घेतली आहे.

भारत, चीनसारखे देश जास्त प्रदूषण करतात. आम्ही सर्वात कमी प्रदूषण करतो, हरितवायूंचे आमचे उत्सर्जन सर्वात कमी आहे, असा डांगोरा पाश्चिमात्य देश पिटतात. पण या पापाचे मोठे वाटेकरी स्वतः आहोत, हे सत्य झाकून ठेवतात. वसाहतवादाच्या काळात युरोपीय देशांनी, आपल्या मंडलिक देशातील लोकांचे आणि पर्यावरणाचे शोषण केले. मंडलिक देशातून कच्चा माल आपल्या देशातील कारखान्यांना पुरवला. तेथील रोजगार बंद पाडून, आपल्या देशातील कामगारांना दिला. पुढे उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणाची जाणीव झाली. मग ज्या उत्पादनांच्या निर्मितीने जास्त प्रदूषण होते, त्यांचे उत्पादन देशात करायचंच नाही. कशाला हवेत ते धुराडे आपल्या देशात? त्यापेक्षा असे उत्पादन इतर गरीब देशांना करायला सांगून तेथून आयात करायचे. आपले हवापाणी स्वच्छ ठेऊन इतर देश प्रदूषित करायचे. या युरोपीय देशांनी गरीब देशांचे पर्यावरणीय स्वास्थ्य हिरावून घेतले. युरोपीयनांनी सुरवातीला जगभरातील संपत्ती लुटली, उपभोगली. त्याच संपत्तीने पर्यावरण विकत घेण्याचाही प्रयत्न केला.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब वापरला आणि मोठमोठ्या देशांनी या अणुस्पर्धेत उडी मारली. जसे गावात दादागिरी करायला ‘दादा’कडे हत्यार महत्वाचे असते तसेच जगात दादागिरीसाठी अणुबॉम्ब आवश्यक होता. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन यांनी कित्येक चाचण्या घेतल्या. चीन, भारत, पाकिस्तान या यादीत नंतर आले. बहुतांश देशांनी आपल्याच भूमीवर अणुचाचण्या केल्या. पण अणुचाचणी म्हणजे किरणोत्सर्ग आणि पर्यायाने प्रदूषण. मी नाही त्यातली म्हणत कडी लावणाऱ्या युरोपीय देशांनी नामी शक्कल लढवली. आपल्या देशाऐवजी अन्य देशात अणुचाचण्या घडवून आणल्या.

विनाशकारी अणुचाचण्या

सुरवातीला फ्रान्सचे उदाहरण घेऊया. फ्रान्सने एकूण २१० अणुस्फोट केले. त्यातील एकही चाचणी स्वतःच्या भूमीवर केली नाही. त्यांच्या मंडलिक देशात, हजारो किलोमीटर दूर केल्या. सुरवातीच्या चाचण्या सहारा वाळवंटातील अल्जेरियात केल्या. तेथील युद्धावेळी त्यांनी संधी साधली. त्यानंतर १९३ चाचण्या फ्रेंच पॉलिनेशियामध्ये केल्या. हा भूभाग म्हणजे फ्रान्सच्या ताब्यातील परदेशस्थ प्रदेश. नंतर जरासे स्वातंत्र्य देत, स्थानिक लोकांना स्वतःचे सरकार चालवायची मुभा दिली. मात्र परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि लष्करी तळ वगैरेसारख्या बाबी स्वतःकडे ठेवल्या. थोडक्यात, फ्रेंच पॉलिनेशिया ही फ्रान्सची वसाहतच. फ्रान्सच्या दाव्यानुसार, तेथील लोक फ्रेंच नागरिकच आहेत. पण फ्रान्सचे हे प्रेम बेगडी आहे. जेव्हा अणुबॉम्बच्या चाचण्या घ्यायच्या तेव्हा फ्रेंच पॉलिनेशियात गेले आणि तिथे तब्ब्ल १९३ वेळा अणू चाचण्या घेतल्या. त्यामुळे दक्षिण प्रशांत महासागराचा मोठा भाग किरणोत्सर्गाने प्रदूषित झाला. समुद्री जीवांचा घात झाला.

फ्रेंच पॉलिनेशियाची लोकसंख्या पावणेतीन लाख आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के किरणोत्सर्गाने बाधित झाले. कित्येक कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने बळी गेले. किरणोत्सर्गाने बाधित मासे खाल्ल्यानेही लोक आजारी पडून मृत्युमुखी पडले. किती समुद्री जीवाची आहुती गेली त्याची गणतीच नाही. शेजारच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आंदोलने झाली. त्यांनी फ्रान्सला जाब विचारल्यावर, काही लोकांना त्रास झाला, पण हा अणुकार्यक्रम आमच्यासाठी महत्वाचा आहे, असे उर्मट त्यांनी उत्तर दिले. तीव्र विरोधानंतर १९९४ मध्ये फ्रान्सने या चाचण्या बंद केल्या. या गुन्ह्यासाठी फ्रान्सने भरपाई द्यावी, माफी मागावी अशी मागणी आहे.

आता फ्रान्सचा वसाहतवादी भाऊ, ब्रिटनचे (यूके) उदाहरण पाहूया. ब्रिटनने १९५२ ते १९५७ दरम्यान पश्चिम ऑस्ट्रेलियातील मारालिंगा, इमू फिल्ड आणि मोन्टे बेलो बेटांवर १२ अणुस्फोट केले. त्यानंतर १९५७-५८ मध्ये मध्य प्रशांत महासागरातील ख्रिसमस आणि माल्डेन बेटांवर ९ चाचण्या केल्या. यातील काही हिरोशिमा नागासाकीवरील अणुबॉम्बपेक्षाही मोठ्या होत्या. त्यानंतरच्या २४ चाचण्या अमेरिकेबरोबर संयुक्तरित्या अमेरिकेतील नेवाडा इथे केल्या. एवढ्या सक्षम देशांनी आपल्या देशात या चाचण्या का नाहीत केल्या? कारण एकच, आपला देश प्रदूषणविरहीत ठेवायचा!

तथापि जो देश त्यांनी लुटला, त्याच देशातील गीतेत सांगितलेला कर्माचा सिद्धांत ते विसरले. आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट, बुमरँगप्रमाणे आपल्याकडे परतते, हे त्यांच्या गावीही नव्हते. देशांना सीमा आहेत. पण पर्यावरण, हवापाण्याला नाहीत. एका देशातील प्रदूषणाचा फटका हजारो किलोमीटर लांबवरच्या देशाला बसतो. दुसऱ्याचं घर जळतंय, त्याचं मला काय? असं म्हणणाऱ्याला हे माहीत हवे की, आज ना उद्या ही आग आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहे. इतर कोणत्या नात्याने आपण जोडलेले असू किंवा नसूही, पण पृथ्वीतलावरील जीवमात्र हवा आणि पाण्याच्या धाग्याने एकमेकांशी बांधलेले आहेत. म्हणूनच सत्तेच्या लालसेने निसर्गावर अग्निअस्त्र सोडणाऱ्यांवर, निसर्गाने पर्जन्यास्त्र डागले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

(लेखक ग्रीनव्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीचे संचालक आणि ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT