संपादकीय

भाष्य : हवा ऑनलाइन-ऑफलाइनचा मेळ

नामदेव माळी namdeosmali@gmail.com

ऑनलाइन शिकवणं आणि शिकणं अनुक्रमे शिक्षक व विद्यार्थी यांच्या वाट्याला अनपेक्षितरित्या आले. तंत्रसाक्षरता मिळवली तरी समक्ष शिकणे, त्यातील एकाग्रता यात साधेलच असे नाही. त्यामुळे राहणाऱ्या उणीवा कशा भरून काढता येतील, याचा विचार आवश्‍यक आहे

टाळेबंदी जाहीर झाली आणि कोरोनाची भयावहता कळू लागली. दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला. त्यावेळेपासून कोरोनाने शिक्षणालाही विळख्यात घेतल्याचे जाणवू लागले. कोरोना काळात अंतर ठेवून शिकणेही अवघड होते. एकमेव पर्याय दिसला तो ऑनलाइन शिक्षणाचा. त्यामुळे शिक्षण तग धरून आहे. काही शिक्षक स्मार्ट टीव्ही, एलसीडी प्रोजेक्‍टर, मोबाईल इत्यादी साधनांचा अध्यापनात वापर करत होते; परंतु काळच असा आला, की सर्वांनाच ऑनलाइन शिकवण्याला पर्याय उरला नाही. पाण्यात पडल्यानंतर पोहता येते असा हा प्रकार. जी गोष्ट आदेश काढून, नोटिसा देऊन वर्ष-दोन वर्षात झाली नसती ती काही महिन्यांत चुकतमाकत का असेना करायला शिक्षकांनी सुरुवात केली.

शासनाकडून ‘टिलीमिली‘, ‘गली गली सीम सीम'' हे दूरदर्शनवरचे कार्यक्रम मदतीला आले. दिक्षा ऍपचा अध्यापनासाठी उपयोग झाला, इझीटेस्टच्या माध्यमातून प्रशिक्षण मिळण्यास मदत झाली. काही तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ तसेच लिंक व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना पाठवल्या. संगणकाला हात लावण्याची भीती किंवा चुकून कुठलं बटण दाबलं तर महाभयंकर काहीतरी घडेल असं वाटणाऱ्या शिक्षकांपासून ते स्वतः क्‍यूआर कोड तयार करणं, फिल्म बनवणं अशा शिक्षकांपर्यंत विविधता आहे. या सर्वांना जमेल, पचेल, रुचेल आणि राबवता येईल असं काही एकावेळी देता आलं नाही. संकट अचानक आलं. असं काही होईल अशी कल्पनाही केलेली नव्हती.

तथापि, समाजमाध्यमातून आणि वर्तमानपत्रातून मिळालेल्या बातम्यांवरूनही ऑनलाइन शिक्षणामधून फारसं हाताला लागलं नाही हे लक्षात येतं. विशेषतः इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांच्या बाबतीत हे दुधाची तहान ताकावर भागविल्यासारखं आहे. ऑनलाइन मूल्यमापनामध्ये प्रतिसाद घेणं आणि दीर्घोत्तरी प्रश्‍न सोडविणं, ते तपासणं ही खूप वेळखाऊ आणि कठीण गोष्ट आहे. ते कसं सोपं करता येईल याचं तांत्रिक ज्ञान माहीत होणं आवश्‍यक आहे. स्वाध्याय परीक्षा घेण्यामध्ये घेणाऱ्याला आनंद असला तरी प्रश्‍न विचारलेला भाग शिकवला आहे का? शिकवला असेल तर तो कितपत समजलाय याकडे लक्ष देता आलेले नाही. कारण शिकविणारा आणि प्रश्‍न तयार करणारे वेगळे आहेत. काही वेळा गटात आलेले स्वाध्याय पुढे मुलांच्या गटात पाठवण्याचं काम झाल्यानं शिकवलेला भाग आणि स्वाध्याय याचा ताळमेळ घालताना शिकवलं आहे आणि शिकले आहेत असं मानल्यासारखं आहे. यासाठी ओपन बुक टेस्ट हा पर्याय होऊ शकतो. त्यासाठी उच्च दर्जाचे प्रश्‍न काढावे लागतील यामध्ये मुलांचं शिकणं होण्यास मदत होईल.

हवी गोडी, आत्मविश्वास

जी मुलं ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत किंवा कुटुंबाची गरज म्हणून कामधंद्याला लागली आहेत. पूर्वीपासूनच अभ्यासात पाठीमागे असलेली मुले त्यांचं अधिक विस्मरण झालं असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या पेचपर्वातून मार्ग काढण्याचं काम करावं लागणार आहे. त्या त्या वर्गाचे शिकवण्याबरोबरच विविध अध्ययन स्तरावर असलेल्या मुलांच्या शिकण्याचा विचार करावा लागेल. प्रत्येक विषयातील मूलभूत भाग उदा. लेखन, वाचन, बेरीज, वजाबाकी इत्यादी पक्का करावा लागेल. शाळा आणि शिकणे यापासून दुरावलेल्या मुलांच्या मनामध्ये आत्मविश्‍वास आणि शिकण्याची गोडी निर्माण करावी लागेल. शिक्षकांना पाठ्यपुस्तक संपवण्याचा ताण न घेता ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाला ऑफलाइन शिक्षणाची जोड द्यावी लागेल. खेडेगावातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी कल्पकतेने हे केलेलं आहे. सराव चाचण्यांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना देणे, अभ्यास देणे, अभ्यास पाहणे, मर्यादित मुलांना सर्व नियम पाळून शिकण्याची सुविधा या गोष्टी केल्या आहेत. त्याची काही उदाहरणे बघता येतील. सांगली जिल्ह्यातील कृष्णात पाटोळे यांनी घरची शाळा हा उपक्रम राबवला. मुलांना शिकविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन केलं, चर्चा केली. साहित्याचा वापर करून, मुलांना साहित्य वापरायला देऊन मुली कशा शिकतात हे दाखवून दिलं. त्यांची इयत्ता पहिली ते चौथीची शाळा आहे. प्रत्येक इयत्तेच्या चार-पाच मुली एका घरात जमतील. तेथील पालक मुलांना शिकवतील. शिक्षक सातत्यानं भेटीद्वारे आढावा घेतील, असं नियोजन केले. 2020-21 मध्ये त्यांच्या वीस घरातल्या शाळा होत्या. याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील धनवडेवाडी शाळेत अब्जल काझी यांनीही पालकांना शिकवण्यासाठी प्रशिक्षत केलं. स्वयंसेवकांचीही मदत घेतली. अशा प्रकारे इतरही काही शाळांमध्ये अभ्यासासाठी, स्वाध्याय सोडविण्यासाठी पालकांचे सहकार्य घेतले जाते. फक्त कोरोना काळातच नव्हे तर कायमस्वरूपी पालकांचा सहभाग घेतल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील सालपे, ता. लांजा येथील श्रीकांत पाटील यांनी शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके पालक व विद्यार्थ्यांना दिली. पालक गोष्टीची पुस्तके वाचत असल्याने विद्यार्थीही वाचतात. शासनामार्फत गोष्टीचा शनिवार हा उपक्रम सुरू झाला. यामध्ये गोष्टी आणि त्यावर आधारित कृती देण्यात येत होत्या. यापेक्षा वेगळ्या कृती निवडण्याचं स्वातंत्र्य शिक्षकांना होते. याप्रकारे गोष्टी सांगणे, वाचून दाखविणे, लिहिणे हे फक्त एकाच दिवशी न करता पालकांच्या मदतीने नियमित करता येईल. प्रवरासंगम, जि. नगर येथील शीतल झरेकर यांनी नकाशे तयार करणे, भेटकार्ड तयार करणे, नाट्यीकरण, रांगोळी काढणे अशा हाताला व मेंदूला काम देणाऱ्या कृती मुलांकडून करून घेतल्या आहेत. अरविंद गुप्ता यांच्या वेबसाईटवर मुलांना पाहून वैज्ञानिक खेळणी तयार करता येतात. याप्रमाणे कृती करत पालकांच्या मदतीने शिकण्याची संधी देता येईल.

ऑफलाईनचाही वापर करावा

हे सर्व करत असताना शिक्षकांना कोरोनायोद्‌ध्याचीही भूमिका पार पाडावी लागत आहे. गृहभेटीपासून चेकपोस्ट, कॉलसेंटर अशा विविध ठिकाणी काम करावे लागत आहे त्याचाही ताण आहे. वाडी, वस्तीपासून ते शबर, मुंबईसारखे महानगर अशा ठिकाणच्या शाळांमध्ये, तिथल्या सामाजिक, आर्थिक इत्यादी वातावरणामध्ये भिन्नता आहे. विद्यार्थ्यांचा कोंडमारा होत आहे. काही वेळा त्यांनाही समुपदेशनाची गरज आहे आणि बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे. ऑनलाइन शिकवताना विविध ॲपमधील सुविधांचा वापर करून अधिकाधिक आंतरक्रिया घडवाव्या लागतील. शिकवण्याच्या पाठाचा वेगळ्या पद्धतीने विचार करून (लेसन प्लान) नियोजन करावे लागेल. मुलांकडून काही कृती करून घ्यावयाच्या असल्यास साहित्य आणि इतर पूर्वतयारीविषयी किमान दोन दिवस अगोदर मुलांना कल्पना द्यावी लागेल. म्हणजे मुले ऑनलाइन शिकत कृती करतील.

ऑनलाइन शिक्षणाची यानिमित्ताने तोंडओळख झाली आहे. भविष्यात सारे सुरळीत झाले तरी या माध्यमाच्या वापरामध्ये सातत्य ठेवावे लागेल. आजच्या काळाची गरज म्हणून ऑनलाइन शिक्षणाकडे बघावे लागेल. ऑनलाइन शिकण्या-शिकवण्यामध्ये पारंगत होण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना ही संधी आहे. प्राप्त परिस्थितीचा विचार करून ऑनलाइन शिक्षणाला ऑफलाइन शिक्षणाची जोड द्यायला हवी, म्हणजे शिकणे थोडे सुलभ होईल.

(लेखक शिक्षणक्षेत्रातील प्रयोगशील अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT