मराठी
मराठी Sakal
संपादकीय

मराठीचा नवा ‘प्रांत’

सकाळ वृत्तसेवा

नाशिकच्या ९५व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे सूप वाजून काही दिवस उलटले नाहीत, तोवर नव्या संमेलनाध्यक्षाचा शोध सुरु होऊन संपलादेखील, हे एकाअर्थी बरेच झाले. संमेलनाचा अध्यक्ष ‘कैसा दिसे, कैसा बोले, राही कैसा’ याच चिकित्सेत आणखी वेळ वाया न दवडता अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ठरल्याप्रमाणे अध्यक्ष ताबडतोब मुक्रर केला.

तो ‘हिंडता फिरता’, किंवा ‘चालता बोलता’ असावा, अशी अपेक्षा महामंडळाचे अध्यक्ष रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केली होती. ती पूर्ण करतानाच उदगीरच्या संमेलनासाठी मराठवाड्यातील अध्यक्ष मिळवण्याची हातोटीही त्यांनी दाखवली! विहीत वेळेत संमेलनाचा कार्यक्रम पार पाडायचा, तर चार महिन्याच्या अंतराने दोन सोहळे होणे क्रमप्राप्त होते.

कोरोनाने आणलेल्या प्रदीर्घ विघ्नामुळे नाशिकनजीकच्या आडगावी झालेले संमेलन डिसेंबराच्या पहिल्या आठवड्यात पार पडले, आणि (पुढले संमेलन येत्या चार महिन्यात घेण्याचे तेव्हाच घाटत असल्याने ) लातुर जिल्ह्यातील उदगीर येथे ९५वे साहित्य संमेलन पार पडेल, असे जाहीर करण्यात आले होते.

नवा अध्यक्ष रा. भारत जगन्नाथ सासणे यांच्या रुपाने गवसला. सासणे यांचा कथा-कादंबरीकार म्हणून मराठी साहित्यात यथोचित लौकिक आहेच. ऐंशीच्या दशकापासूनच सासणे यांचे नाव मराठी सारस्वतांच्या मांदियाळीत अग्रणी मानले जाते. उत्कृष्ट बीजाच्या कथा लिहिणारी त्यांची प्रतिभा गेली चाळीस वर्षे अथकपणे मराठीच्या आभाळात तळपते आहे. संमेलनाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली, हे चांगलेच झाले. सात वर्षांपूर्वी पंजाबातील घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांनी निवडणूक लढवलीही होती.

त्यानंतरही अनेकदा त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चिले गेले होते. सासणे यांची चाळीसेक वर्षांपूर्वीची ‘जॉन आणि अंजिरी पक्षी’ ही वेगळ्याच धाटणीची कथा जुन्याजाणत्या वाचकांच्या स्मरणात नक्की असेल. तो काळ जीए कुलकर्णी, कमल देसाई, नंतरच्या काळात मेघना पेठे आदींच्या कथांनी स्तिमित होण्याचा होता. भावे-गाडगीळ- माडगूळकरांचा साठोत्तरी काळ केव्हाच मागे पडला होता आणि मराठी कथा-कादंबऱ्यांचे जग प्रस्फुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे विलगत-उलगडत- विस्तारत होते. एकीकडे प्रस्थापित साहित्याला दणके देत अवतरलेला मराठी साहित्यातला ‘नेमाडपंथ’ही ऐसपैस सतरंजी पसरुन ‘सेटल’ झाला होता.

अशा प्रस्फोटाच्या काळात भारत सासणे हे नाव रसिक वाचकांनी पहिल्यांदा ऐकले. त्यानंतर आलेल्या ‘कॅम्पा बाबीचे दु:ख’, ‘लाल फुलांचे झाड’, ‘चिरदाह’, ‘अस्वस्थ’, ‘विस्तीर्ण रात्र’ आदी वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कथांसंग्रहांमध्ये त्यांच्या कथेची सर्व वैशिष्ट्ये लखलखीतपणे दिसतात. गूढगहन छटा, व्यामिश्रतेचे रंग, व्यक्तिरेखांचे असांकेतिक व्यवहार आणि कथाकथनाची ‘अलिप्त’ शैली यामुळे त्यांच्या कथांचे वेगळेपण नजरेत भरते. कथेला मिळालेला हा ‘सासणेस्पर्श’ चिरपरिचित झाला.

सासणेंच्या सुरवातीच्या कथांवर ‘जीएं’च्या गूढवादाची छाया होती, असे त्यांचे काही टीकाकार म्हणतात. वास्तव आणि दृष्टांताच्या सरहद्दीवरल्या या कथांचा बाज खरे तर काहीसा ‘अमराठी’ होता, हे त्याचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर पाठोपाठ सासणे यांचे अनेक कथासंग्रह आणि कादंबऱ्या वाचकांच्या भेटीला येत गेल्या. त्यांच्या एखाद-दोन कथांवर आधारित चित्रपटांचीही योजना झाली. परंतु, सासणे यांची कथावस्तु आणि त्यात उमटणारा अवकाश हे सारे चित्रपटाच्या पडद्यावर आणणे खरोखर आव्हानात्मकच आहे. कथा, कादंबरी, नाटक आणि बालसाहित्य अशा अनेक रुपबंधांमधले त्यांचे साहित्य रसिकमान्य ठरले.

सासणे हे स्वत:च्या लेखनाबद्दल सतत प्रयोगशील राहिले, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. वास्तविक एखाद्या ढाच्यातील लेखन रसिकांकडून स्वीकारले गेले, की पुढे त्याच प्रकारच्या आवृत्त्या काढत जाण्याचा मोह लेखकाला होऊ शकतो. काही प्रमाणात ते घडणे स्वाभाविकही म्हटले पाहिजे, कारण तोच कदाचित त्या लेखकाचाही सहजभाव (कम्फर्ट झोन) होऊन जातो. सासणे या मोहात अडकले नाहीत. त्यांच्या काही कथांमध्ये तर नाट्यखंडही आढळतात. असे काही प्रयोग करुनच सासणे यांनी त्यांच्या परीने मराठी कथेचा परीघ वाढवण्याच्या कामात मोलाचे योगदान दिले. ‘चालता बोलता’चा अर्थ ‘लोकांमध्ये मिसळणारा’ असा खुद्द सासणे यांनीच लावला आहे. त्यादृष्टीने पाहू गेल्यास, प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ काळ काढून निवृत्त झालेल्या सासणे यांनी आता मराठी साहित्याचे ‘प्रांत’ म्हणून काही बदल घडवून आणावेत, अशी अपेक्षा मराठी लेखकांनी केली, तर ती ‘लई’ म्हणता यायची नाही.

अभिजात भाषेचा दर्जा, मराठी भाषेची गळचेपी, नव्या वाङमयीन प्रवाहांचे वहन सुघड करणे, वाचन-संस्कृतीचा जीर्णोद्धार अशी कितीतरी कामे अध्यक्षाच्या खुर्चीवरुन करता येण्याजोगी आहेत. सरकारी आणि साहित्यिक अशा दोन्ही भाषांना परिचित असलेल्या सासणेसाहेबांनी हे घडवून दाखवले तर संमेलाध्यक्ष नुसता ‘चालता बोलता’ नव्हे, तर ‘कर्ता करविता’ आहे, असे प्रशस्तीपत्र मराठी रसिक मुक्तकंठाने देतील, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT