Books
Books esakal
सप्तरंग

काव्य नव्हे, हा अमृतसंचय !

- डॉ. नीरज देव

रसिका ! ४ जुलै २०२१ ते २८ जाने २०२४ अशी सुमारे अडीच वर्षे या सदराच्या माध्यमातून तुला काव्यामृत पान करविले. या सदराचा कर्तृत्वपणा केवळ माझ्या एकट्याचा नाही तर संपादकांचा पण आहे.

त्यांनी वेळोवेळी स्मरण देऊन लेख लिहवून घेतले, शब्दांच्या मर्यादेत अडकवले नाही. त्यामुळे हा सारा पसारा मला तुझ्यापुढ्यात सादर करता आला. त्यांच्या आभारास मी जसा उत्सुक आहे, तसाच तू ही असशील.

सदरास आरंभ करताना इतकेच कवी व इतक्याच कविता घ्याव्यात अशी योजना नव्हती; केवळ काळनिश्चिती होती. साधारणतः १८५० ते १९३० पावेतो जन्मलेल्या मोजक्या कवींच्या मोजक्या कविता घ्यायच्या.

त्यामुळे आरंभी एकेका कवीच्या दोन-दोन कविता घेतल्या. क्वचित प्रसंगी दोनाहून अधिक कवितांचेही रसग्रहण केले. यात सर्वाधिक पाच कविता केशवसूत, सावरकर, भा. रा. तांबे अशा बिनीच्या कवींच्या होत्या.

कवींची मुबलक संख्या बघता शेवटी असे निश्चित केले की, एका कविची एकच कविता घ्यावी. त्यामुळे अधिकाधिक कवींना घेता येईल. सरते शेवटी, या १३१ लेखांतील प्रस्तावनेचा पहिला अन् समारोपाचा हा शेवटचा लेख वगळला तर सुमारे १२९ लेखांतून सुमारे १०० कवी + संत ज्ञानेश्वरांचे पसायदान असे १०१ कवी घेतले.

(saptarang latest marathi article by dr neeraj deo on marathi Poet Narayan Ramchandra More nashik news)

या कवीत कुंटे, महाजनी, मोगरे, लेंभे यांसारखे केशवसूत पूर्वकालीन कवी होते. केशवसूत, दत्तकवी, विनायक, गोविंदाग्रज, बालकवी, कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर, नारायण सूर्वे इ सारखे प्रख्यात कवी जसे होते तसेच प्रतिभावंत असूनही फारसे परिचयात नसलेले भालचंद्र लोवलेकर, रा. अ. काळेले, श्रीनिवास बोबडे, श्रीनिवास पाटणकर, साधुदास, गु. ह. देशपांडे इ कवी होते.

स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग असलेले स्वा. सावरकर, स्वातंत्र्यशाहिर गोविंद, सेनापती बापट, कुंजविहारी, साने गुरुजींसारखे कृतीशूर कवीही होते.

कवयित्रींचा विचार करता बहिणाबाई्र चौधरी, लक्ष्मीबाई टिळक, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे, इंदिरा संत इ कवयित्री होत्या. नाते संबंधाचा विचार करता; बहिणाबाई-सोपानदेव चौधरी ही मायलेकरांची जोडी होती.

तसेच श्रीधर-मनोरमा रानडे, पुरुषोत्तम - विमल देशपांडे हे कवी दांपत्य होते. पु. य. देशपांडे विचारवंत लेखक म्हणून महाराष्ट्राला ज्ञात आहेत, पण कवी म्हणून त्यांच्या काव्याचा करुन दिलेला परिचय नक्कीच नवा असावा.

नाशिकचे कवी अशोक, नाथ निफाडकर, सरस्वती कंठाभरण, यशवंत कोरेकल, ना. ग. जोशी इ कवींच्या कवितांवरील लेख तर मराठीतील पहिलेच लेख असावेत.

स्थानांचा विचार करता महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र असा जवळपास साऱ्या महाराष्ट्रातील कवी स्थानभेद न करता घेतले. याशिवाय गोवा ते ग्वाल्हेर, जबलपूर नि हैद्राबाद ते बडोदा असे महाराष्ट्राबाहेरील मराठी कवीही घेतले.

हे सारे करताना उपरोक्त कालखंडातील काही कवी मात्रं सुटून गेले, याची हळहळ मनाला आहे. त्यात प्रामुख्याने अनंत पोतदार, आरती प्रभू, मंगेश पाडगांवकर, वामन रावजी ढवळे, वि. भि. कोलते, म. म. देशपांडे, श्रीकृष्ण पोवळे, रोहिणी खरे, सातारचे नाथ घाणेकर, नारायण रामचंद्र मोरे उर्फ कवी अशोक, जळगांवचे पळशीकर, केशवसूतांचे भडगाव येथील सहकारी रहाळकर इ कवी आहेत. यातील काही कवींविषयी थोडेफार लिहिण्याचा मोह आवरत नाही. 

कवी नारायण रामचंद्र मोरे यांनी सुमारे ८२७६ काव्यांचा समावेश असलेले शिवायन नावाचे महाकाव्य लिहिले आहे. ते काव्य पाहिल्यावर आचार्य अत्र्यांनी मुक्तकंठाने कवीचे नि काव्याचे कौतुक केले होते. कवी नागेश हे रेंदाळकरांप्रमाणेच निर्यमक कवितेचा पुरस्कार करणारे होते. ‘चंडोलगायन’ या कवितेत ते लिहितात,

ठायी ठायी नव दिव्यता ।
पसरुनी सत्वर जीर्ण जगी या ।
नवजीवन रस उसळू द्या ।

ही नव दिव्यता नि नवजीवन रस केशवसूतांच्या ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’चाच नवा सूर होता. कवी स्वतःला केशवसुतांचा चेला म्हणवून घेत असे. विदर्भातील कवी म. म. देशपांड्यांच्या कवितेतील गेयता, प्रासादिकता खूपच मोहक होती, सोबतच आशयसंपन्न आहे. 

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण

कवितेत येणारा ‘अंधार’ अज्ञान, असत्य, अंधःकार अशा साऱ्यांचेच प्रतिनिधीत्व करणारा असून त्याला ग्रासण्याची कवीची ओढ दिव्यच म्हणावी. ‘अशी तहान लागणे’ ही मानव्याची महत्वाची पायरी आहे. ती साधली तर सत्य जीवनाचा पाया बनतो, ध्येय बनते. कवीची ही कविता ज्ञानेश्वराच्या जातकुळीतील आहे, म्हटल्यास वावगे ठरु नये. कवीच्या या पंक्ती वाचताना माळव्यातील कवयित्री रोहिणी खरे यांच्या

मनाचिया आरशांना
मनःश्चक्षूंनी बघावे
निर्मळत्वाला जपावे आयुष्यभर

या पंक्ती आठवतात. खरेच मनच आरसा आणि मनच डोळे झाले तर? तर सारे प्रश्न अलगद सुटतील. सत्य प्रतिबिंब न राहता बिंबच होईल. कारण मन निर्मळतेचे प्रतीक बनलेले असेल. येथे आरती प्रभूंच्या ‘मी नव्हे कि बिंब माझें, मी न माझा आरसा’ या आशयघन पंक्ती अचानक तरळून जातात. त्यांनाही ओढ त्या उत्कट तत्वाची होती. ते लिहितात,

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

माणसाला नेहमी आपली दुःख नि व्यथाच डाचत असतात. क्वचित केव्हातरी स्वार्थ आपसूक गळतो, ‘मी’पणा लोपतो नि मग कृतकृत्यतेचा भाव जागा होतो. घरदार म्हणजे मीपणाचा पसारा होय. ज्यावेळी हे घडते त्यावेळी,

पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

अर्थ लावून शब्द जुळवणे म्हणजे फूकाचा व्यापार होय. तो तर सारेच करतात. पण कधीतरी अर्थ शब्दाला शोधत धावत येतो. तो अनाहूतपणे आलेला अर्थ गहन, गंभीर नि सत्याची कास धरुन येणारा असतो. त्यामुळे तो दिव्य असतो.

तो आपल्या कवनात उतरावा. ही आरती प्रभूंची आंस कोणाला बरे रुचणार नाही. यात कितीही सत्य, निःस्पृहता असली तरी जगाचे गणित काही वेगळेच असते. कवयित्री रोहिणी खरे लिहितात,

खुळा ध्येयवादी इथे
भोगी नित्यांचे मरण
जीवनाची अपुर्वाई
स्वार्थ साधूंना शरण

जीवनातील ऐहिक सुखापावेतो ज्यांची कल्पना असते, तेच दुसऱ्या गटात येतात. जगात त्यांचेच प्राबल्य असल्याने कवयित्रीला दिसलेले हे दृष्य आपल्याला ही दिसते. तिला वाटणारी व्यथा आपल्यालाही सलते.

त्यामुळे तिची ही व्यथा कालनिरपेक्ष आहे, म्हटल्यास वावगे ठरु नये. हीच खंती व्यक्त करताना, माळव्याच्या मातीची थोरवी गाणारे नि आहुती या महाकाव्यात सेनापती तात्या टोपेंचे चरित्र रचणारे अनंत पोतदार ‘गर्दी आणि एकांत’ कवितेत लिहितात

रानामाळातून दऱ्या-खोऱ्यातून फिरताना
जाणीव कधीच झाली नाही
एकलेपणाची

पण या प्रचंड गर्दीच्या शहरातून फिरताना
माणसालाही असंख्य माणसात
एकाकीपण सारखे बोचते - टोचते

किती प्रामाणिक वेदना आहे ही ! कवीला जाणवलेली ही टोचणी सिमेंटच्या जंगलांत राहणाऱ्या आजच्या माणसाला नित्याचीच झाली आहे. इतकी नित्याची की ती टोचणी आहे हे ही तो विसरला.

मात्र, एखाद्यावेळी एखादी अस्सल ग्रामीण थाटाची कविता दिसली की माणूस थोडाफार हळवा होतो, आणि ती टोचणी त्यालाही लागते. पांडुरंग श्रावण गोरे यांची कविता त्याच आहे. त्यांची ‘अम्ही तर जंगलची पाखरे’ ही कविता सुजाण रसिकांना माहिती असेलच. त्यातील

बाजरीची ती गोड शिळी भाकरी
लसूण कांदा चटणी मग तीवरी
मारित मिटक्या यथेच्छ खाता सुधा तुच्छ बापुडी !

या पंक्ती वाचताना लसणाच्या चटणी सोबत बाजरीची शिळी भाकरी नि कांदा आपणच सेवन करतोय, असा भास रसिकाला झाला नाही नि त्यातील अमृत रस त्याच्या जिभेला आला नाही, तरच नवल म्हणावे.

यशवंत देव संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच तितक्याच ताकदीचे कवी होते. एका कवितेत ते लिहितात,

हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
आहे फुलात काटा, तोही पसंत आहे

यातील प्रीतिची भावना किती अलवार आहे ! तिने दिलेले फूल जितके त्याला पसंत आहे तितकाच फुलासोबतचा काटा ही प्यारा आहे. फूल म्हणजे प्रीत तर काटा म्हणजे विरह, व्यथा नि वेदना हे वेगळे सांगायची गरज नसावी. याच भावनांचा उत्कर्ष करताना ते लिहितात,

कधी सांगता न आल्या शब्दांत प्रेमगोष्टी,
श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे

खरेच उत्कट भावना, उदात्त ध्येये, उत्फुल्ल सत्य शब्दांत कधीच पकडता येत नाहीत. म्हणून तर वेदांत दर्शने ‘नेति नेति’ ची भावना व्यक्तवितात. तीच भावना कवी श्रीमंत अक्षरांची खंत मधून व्यक्तवितो. तीच खंत प्रस्तुत लेखकाचीही आहे की या नि या समान कित्येक कवी नि कवितांना स्पर्श करायचा राहूनच गेला.

यशवंत देवांना फुल नि फुलातला काटा दोन्ही मिळाले. पण या सदरा दरम्यान लेखकाला केवळ फुले अन् फुलेच मिळाली, अर्थात त्याचे श्रेय लेखकाचे नसून लेखकाने ज्या ज्या कवींचे माधुर्य, प्रासादिकता नि सहजोक्त भाव भावना रसिकांप्रत पोहोचवली त्यांचे आहे.

याची लेखकाला पूर्ण जाणीव आहे. रसिकांनी उधळलेल्या या फुलांत तांबे, सावरकर, तिवारी, गडकरी, बी, कुंजविहारी, शरदचंद्र मुक्तीबोध इ कवींच्या कविता अधिक होत्या.

भालचंद्र लोवलेकर या माळव्यातील प्रतिभासंपन्न कवीच्या काव्याविषयी त्यांच्या मुलाने (जे ८५ वर्षांचे आहेत) दिलेली प्रतिक्रिया प्रोत्साहनपर होती.

स्वतः काव्यविषय झालेल्या बी रघुनाथांच्या कन्या व कवयित्री सुधा नरवाडकर यांची त्यांच्याच संबंधी असलेल्या कवितेवर दिलेली प्रतिक्रिया सुखावणारी होती. कुणीतरी रसिकाने वामन भार्गव पाठक यांच्या विकीपीडियावरील माहितीत लेखकाच्या रसग्रहणाचा अंश वापरला ही बाब आनंददायी वाटली.

तर प्रस्तुत लेखाचे हिंदी नि इंग्रजी भाषांतरेही इंटरनेटवर वाचायला मिळाली. त्या भाषांतराची भाषा जरी ओबडधोबड असली तरी मराठी काव्याबद्दल रसिकांना किती गोडी आहे, तेच यातून दिसून येते. कित्येकांनी प्रस्तुत सदरातील लेख पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याची सूचना केली ते कसे नि केंव्हा जमते ते पाहू.

हे सारे लिखाण करताना हळुहळू मी ही त्यात गुंतत गेलो. पुढच्या आठवड्यात कोणता कवी घ्यायचा? त्याची कोणती कविता घ्यायची? याचा विचार चालायचा. तो आता थांबणार आहे. त्यामुळे थोडीशी हळहळ नि बरेचसे हायसे वाटत आहे.

येथे हे ही नमूद करणे गरजेचे की, कवींचरित्राविषयी वाचताना बहुतेक कवींचे हालपेष्टांनी भरलेले जीवन, आर्थिक चणचण इ नी माझे मन विचलित होत होते. पण त्यांचे सकस काव्य बघताना त्यात त्या हालपेष्टा लेशभरही उतरलेल्या नाहीत.

उलट देशाचे दैन्य, पारतंत्र्य, जनतेतील दुःखे, व्यथा, उपेक्षितपणा व निसर्गाचे उत्फुल्ल वर्णन इ. दिसत होते. ते वाचताना मन हळवे होई नि क्षणात अभिमानाने भरुन येई की, अरे ! असे खंबीर कवी माझ्या मराठीत जन्मले किती समर्थ आहे माझी मराठी !

रसिका ! पाहता पाहता हा प्रवास सरला. तसा केव्हातरी संपायचाच असतो. पण संपता संपता या प्रवासाने मनांत उर्मी निर्माण झाली. जसे हे १०० कवी पाहिले, तसे हाल राजापासूनचे पुराण कवी पाहावेत का? निदानपक्षी मुकुंदराज, ज्ञानेश्वर, तुकारामादी संत नि वामनपंडित, मोरोपंतादी, पंत कवी, लावणीकार, शाहिर आदी प्रकारचे काव्य तुजपाशी पोहोचवावे काय?

एखाद्या कवीचा एखादा सकस काव्यसंग्रह, खंडकाव्य घेऊन त्याचे रसग्रहण करावे का? तशी संधी नि तशी शक्ती आपल्याला लाभेल काय? काव्य रसग्रहणातील हा पूर्णविराम राहिल की अर्धविराम? इ इ खरेतर या प्रश्नाचे उत्तर मलाही ज्ञात नाही.

रसिका ! आजपावेतो आपण पाहिलेले कवी, त्यांचे काव्य यांचा विचार करताना सहजच जाणवते की, हे सारे काव्य, काव्य नव्हतेच तर तो होता अमृतसंचय ! गदीमा रामायणाबाबत म्हणतात, तीच बाब मराठी अभिजात काव्यालाही लागू होते.

त्यामुळेच म्हणावेसे वाटते ‘अमृतातेही पैंजा जिंके’ पासून आरंभलेला आपला काव्यप्रवास आज ‘काव्य नव्हे हे; अमृतसंचय!’ या प्रतितीपर्यंत येऊन थांबला. रसिका ! हा अमृतसंचय हृदयात धारण कर. तो तुझ्या सुखात तुला सुखवेल आणि अतीव संकटांत नि दुःखात सन्मित्रासारखा फुंकर घालायला धावून येईल.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT