जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सातारा: जिल्हास्तरावर जागेच्या उपलब्धतेअभावी रेंगाळलेले आयुष्य रुग्णालय आता कोरोनाच्या तडाख्यात सापडले आहे. कोरोना संसर्गामुळे राष्ट्रीय आयुष अभियानातून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे आयुष रुग्णालय होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाने प्राचीन आरोग्य पद्धतींचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी आयुष विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेतला. २००९ मध्ये आघाडी शासनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात आयुष विभागाला सुरवात झाली. त्यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी व युनानी उपचारपद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून तशा लांब असलेल्या या सुविधा केवळ केसपेपरच्या खर्चामध्ये उपलब्ध होऊ लागल्या. आज सुमारे १५० ते २०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात या सुविधांचा लाभ घेत आहेत.
भाजप सरकारच्या काळात या विभागाकडे अधिक लक्ष देण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी या सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाचीही स्थापना केलेली आहे. त्या माध्यमातून केवळ बाह्यरुग्ण विभाग असलेल्या आयुष्य विभागात आंतररुग्ण (रुग्ण दाखल करून उपचार करण्याची) सुविधाही सुरू करण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र आयुष्य रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० बेडचे हे रुग्णालय होणार होते. त्याबाबतचे पत्रही जिल्हा प्रशासनानाला मिळाले होते.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हे रुग्णालय जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच बांधावे, अशी तरतूद आहे. तिथे जागा उपलब्ध नसल्यास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, जनतेला सोईस्कर ठरेल, अशा ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेचाच विचार व्हावा, असे स्पष्टपणे निर्देशित करण्यात आले आहे. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांना साताऱ्यामध्ये त्यासाठी जागा उपलब्ध करणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे रुग्णालय फलटणला नेण्याची चाचपणी सुरू झाली होती. त्याआधी ते महाबळेश्वरला नेण्याचा विचारही पुढे आला होता. परंतु, वेळेत निर्णयाअभावी ते रखडले गेले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालय साताऱ्यात सुरू होऊ शकले नाही. राज्यातील अन्य तीन जिल्ह्यांमध्ये या रुग्णालयाच्या कामाला सुरवात झाली आहे. परंतु, कोरोनाच्या संसर्गापासून सर्व चित्रच बदलले आहे.
तीन खासदारांनी प्रयत्न करणे गरजेचे
राष्ट्रीय आयुष अभियानातून रुग्णालयासाठी सध्या निधी उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये आयुष रुग्णालयाला कधी मुहूर्त सापडणार, असा प्रश्न निर्माण होतो आहे. जिल्ह्याला तीन खासदार मिळालेले आहेत. त्यांनी आयुष रुग्णालयासाठी तातडीने निधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.