zero shadow day in Maharashtra
zero shadow day in Maharashtra सकाळ
विज्ञान-तंत्र

शून्य सावली म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या तुमच्या शहरात कधी असेल 'Zero Shadow Day'

सकाळ डिजिटल टीम

आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ असे म्हटले जाते. (Do you know about zero shadow day check zero shadow day in maharashtra)

आज आपण या शून्य सावलीचे रहस्य जाणून घेणार आहोत. शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्क वृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकर वृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो.

कसे अनूभवाल शून्य सावली?

निरभ्र आकाशात सूर्य असतांना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असतांना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमीत कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडे जाऊ लागतो तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जातांना दिसते.

वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्याने भर दुपारीही आपली थोडीतरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर असतो त्यामुळे आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे आपणास ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.

शून्य सावलीची संकल्पना आपण समजून घेऊया

शून्य सावलीचे रहस्य समजून घेतांना आपणास लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकलेला भूगोल परत आठवावा लागेल. पाच प्रमुख वृत्ते आहेत.

(१) आर्क्टिकवृत्त - ज्याच्या पलिकडील उत्तरेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसू शकतो.

(२) कर्कवृत्त - हे विषुवृत्त्ताच्या २३ अंश, २६ कला, २२ विकला ( सुमारे साडेतेवीस अंश ) उत्तरेकडे आहे. याच्या उत्तरेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. भारतातील गुजरात, राजस्थान , मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम , छत्तीसगड , त्रिपुरा व झारखंड या राज्यातून कर्कवृत्त जाते.

(३) विषुववृत्त

(४) मकरवृत्त - हे विषुववृत्ताच्या २३ अंश, २६ कला, २२ विकला ( सुमारे साडेतेवीस अंश ) दक्षिणेकडे आहे. याच्या दक्षिणेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही.

(५) अंटार्क्टिकवृत्त- याच्या दक्षिणेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसतो. आपण उत्तर गोलार्धात राहतो. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशानी कललेला आहे.

सूर्य २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोनच दिवस विषुववृत्तापाशी येतो. २१ जूनला तो जास्तीत जास्त उत्तरेकडे कर्कवृत्तापाशी दिसतो तर २२ डिसेंबरला सूर्य जास्तीतजास्त दक्षिणेकडे मकरवृत्तापाशी दिसतो. तारका व ग्रह वैषविक वृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे असतात. तारका व ग्रह यांच्या या कोनात्मक अंतराला ‘ क्रांती ‘ म्हणतात.

मुंबईपरिसराचे उत्तर अक्षांश सुमारे १९ अंश आहेत. सूर्याची क्रांती ज्यादिवशी उत्तर १९ अंश होईल त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून असा सूर्य दोनदा बरोबर डोक्यावर दिसतो. त्यामुळे या दिवशी माध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही म्हणून या दिवसाना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ म्हणतात. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने ‘शून्य सावली ‘आपणास अनुभवता येते. पण दुसरा दिवस २८ जुलै हा पावसाळ्यात येत असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही.

महाराष्ट्रातील शून्य सावलीचे दिवस

महाराष्ट्रातील काही ठिकाणचे शून्य सावलीचे दिवस येथे देत आहे.

(१) रत्नागिरी ११ मे

(२) सातारा, सोलापूर १२ मे

(३) उस्मानाबाद १३ मे

(४) रायगड, पुणे, लातूर १४ मे,

(५) अंबेजोगाई, केज १५ मे

(६) मुंबई, नगर, परभणी, नांदेड १६ मे

(७) ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण , पैठण १७ मे

(८)संभाजीनगर , जालना, हिंगोली, चंद्रपूर १९ मे

(९) नाशिक, वाशीम, गडचिरोली २० मे

(१०) बुलढाणा, यवतमाळ २१ मे

(११) वर्धा २२ मे

(१२) धुळे, अकोला, अमरावती २३ मे

(१३) भुसावळ , जळगांव, नागपूर २४ मे

(१४) नंदुरबार २५ मे

या दिवशी शून्य सावली योग आहे. सूर्याची क्रांती आपल्याकडील मोठ्या पंचांगातून दिलेली असते. स्थानिक अक्षांशाएवढी ती ज्या दिवशी असेल तो दिवस शून्य सावलीचा मानावा. वेळ दुपारी सूर्य आकाशात डोक्यावर आल्याची समजावी. सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा करावी. त्या कालावधीचा अर्धा भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवावा म्हणजे सूर्य आकाशात डोक्यावर येण्याची वेळ समजेल. मुंबईत ही वेळ दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांची आहे. त्यावेळी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT